03 September, 2026

शासकीय वसतिगृह, आधार व स्वयंम योजनेच्या प्रवेशासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ इमाव, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा

 शासकीय वसतिगृह, आधार व स्वयंम योजनेच्या प्रवेशासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ


इमाव, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा


हिंगोली, दि. 3 (जिमाका) : इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासनामार्फत शासकीय वसतिगृह, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना राबविण्यात येतात. इयत्ता 12 वी नंतर व्यावसायिक व अव्यावसायिक उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या योजनांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी 15 सप्टेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.


या योजनांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यासाठी शासकीय वसतिगृह, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम प्रवेश प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी रिक्त जागांवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahait.org/ या संकेतस्थळावर 12 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2026 या कालावधीत ऑनलाईन अर्ज करावा.


ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट तसेच आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयात विहित मुदतीत सादर करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्ग (इमाव), विमुक्त जाती-भटक्या जमाती (विजाभज) व विशेष मागास प्रवर्गातील (विमाप्र) विद्यार्थ्यांनी या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक प्रदीप धर्माधिकारी यांनी केले आहे.


अधिक माहितीसाठी गृहपाल, मुला-मुलींचे शासकीय वसतिगृह, हिंगोली यांच्याशी संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

No comments: