25 September, 2026

नात्याअंतर्गत दत्तक प्रक्रियेतील दोन प्रकरणांना अंतिम आदेश

नात्याअंतर्गत दत्तक प्रक्रियेतील दोन प्रकरणांना अंतिम आदेश

हिंगोली, दि. २५ (जिमाका) : जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मान्यतेने नात्याअंतर्गत दाखल दत्तक प्रक्रियेतील दोन प्रकरणांमध्ये आज, २५ सप्टेंबर २०२६ रोजी अंतिम आदेश पारित करण्यात आले. कायदेशीर प्रक्रियेद्वारे दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पालकांना बालक दत्तक मिळाल्याने त्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला आहे.

जिल्हा महिला व बाल विकास विभागांतर्गत कार्यरत जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत ही संपूर्ण दत्तक प्रक्रिया पार पाडण्यात आली. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे व बाल संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) जरीबखान पठाण यांनी दत्तक घेणारे व दत्तक देणारे पालक तसेच साक्षीदार यांच्या आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून प्रक्रिया पूर्ण केली.

यानंतर संबंधित प्रकरणे बाल कल्याण समिती, हिंगोलीचे अध्यक्ष सुधाकरराव इंगोले व सदस्यांसमोर सादर करण्यात आली. समितीची मान्यता मिळाल्यानंतर दत्तक नियमावली, २०२२ नुसार संबंधित प्रकरणांसाठी SARA व त्यानंतर CARA कडून पूर्वमंजुरी पत्र प्राप्त झाले. त्यानंतर जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत दत्तक नियमावली, २०२२ नुसार प्रकरणांची पुढील कार्यवाही करण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या दालनात सुनावणी घेऊन दोन्ही प्रकरणांमध्ये अंतिम आदेश पारित करण्यात आले.

ही संपूर्ण दत्तक प्रक्रिया जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संतोष दरपलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

*नात्याअंतर्गत दत्तक प्रक्रियेसाठी नोंदणीचे आवाहन*

नात्याअंतर्गत बालक दत्तक घेण्यास इच्छुक पालकांनी कायदेशीर दत्तक प्रक्रियेसाठी www.missionvatsalya.wcd.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा.

No comments: