23 September, 2026

जात पडताळणीसाठी 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत विशेष शिबिराचे आयोजन

 

        हिंगोली, दि. 23 सप्टेंबर (जिमाका) : सेवा संकल्प अभियानांतर्गत इयत्ता 11 वी व 12 वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेले विद्यार्थी तसेच सन 2026-27 मध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रलंबित प्रकरणातील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत विशेष अभियान राबविण्यात येत आहे.

        या अभियानांतर्गत अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग तसेच सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग या आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी 28,29 व 30 सप्टेंबर 2026 रोजी कार्यालयीन वेळेत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, हिंगोली येथे उपस्थित राहावे.

        आरक्षित प्रवर्गातून व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या वेळी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. विशेष बाब म्हणून अशा विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी प्रवेश घेतल्याच्या दिनांकापासून तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. या कालावधीत जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे प्रकरणे सादर केलेली आहेत; मात्र प्रकरणातील त्रुटींमुळे अद्याप जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झालेले नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

        संबंधित विद्यार्थी किंवा त्यांच्या पालकांना प्रकरणातील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी समितीसमोर उपस्थित राहता येणार आहे. नियमानुसार त्रुटींची पूर्तता झालेल्या प्रकरणांमध्ये पात्र विद्यार्थ्यांना तत्काळ जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येत आहे.

        अद्याप जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त न झालेल्या विद्यार्थ्यांनी या विशेष शिबिराचा लाभ घेऊन आपल्या प्रकरणातील त्रुटींची पूर्तता करावी, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य अमोल यावलीकर यांनी केले आहे.

                                                                                                                    ***

No comments: