हिंगोली, दि. 21 (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या लोकसंवाद उपक्रमांतर्गत हिंगोली शहरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चिंतामणी गणपती मंदिर परिसरात लोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन आज करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत देण्यात येणाऱ्या सुविधा व आर्थिक मदतीबाबत तसेच चाईल्ड लाईन 1098, बाल संगोपन योजना, बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 संदर्भात नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे वैद्यकीय समन्वयक सोमनाथ पांडुरंग वानखेडे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून गरजू रुग्णांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीची माहिती दिली. योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी कुठे संपर्क साधावा, अर्ज कसा करावा, आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत, तसेच अर्जावर झालेल्या कार्यवाहीची माहिती कशी मिळवावी, याबाबत त्यांनी नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन केले.
सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यपूर्ण जीवन जगता यावे आणि आर्थिक अडचणींमुळे कोणताही गरजू रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष कार्यरत आहे. हिंगोली जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे. गंभीर आजार, अपघात किंवा अन्य आरोग्यविषयक संकटामुळे कुटुंबावर अचानक आर्थिक भार पडल्यास पात्र रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत मिळू शकते. त्यामुळे पैशाअभावी रुग्णांना वेळेत उपचार घेण्यात अडचण येऊ नये, यासाठी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पात्र रुग्णांना दुर्धर व गंभीर आजारांवरील उपचारासाठी अर्थसहाय्य करण्यात येते. रुग्णांना मदतीसाठी मुंबईला जाण्याची आवश्यकता राहू नये, यासाठी 1 मे 2025 पासून प्रत्येक जिल्हास्तरावर मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे पात्र रुग्णांना त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यातूनच उपचारासाठी आर्थिक मदतीसाठी अर्ज करता येतो. तसेच अर्जावर झालेल्या कार्यवाहीची माहितीही जिल्हास्तरावरील कक्षातून मिळू शकते, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी चाईल्ड लाईन 1098, बाल संगोपन योजना, बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 बाबत उपस्थित भाविक व नागरिकांना सविस्तर माहिती दिली. संकटात असलेल्या बालकांना मदत, संरक्षण व आवश्यक सेवा मिळवून देण्यासाठी उपलब्ध असलेल्या या सुविधेबाबत जनजागृती करण्यात आली. बालकांच्या सुरक्षिततेसाठी नागरिकांनी सतर्क राहून बालकांशी संबंधित कोणतीही अडचण किंवा गरज भासल्यास संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती कार्यालयाच्या उपसंपादक अलका पाटील यांनी केले. यावेळी कौशल्य विकास अधिकारी श्रीराम बा. मगर, चिंतामणी गणपती देवस्थानचे अध्यक्ष सतिश लोहिया, सचिव दिलीप बांगर, संस्थानचे पदाधिकारी, जिल्हा माहिती कार्यालयाचे मनोहर भारती, मानसी राऊत, महिला व बाल विकास विभागाचे कर्मचारी तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000

No comments:
Post a Comment