07 September, 2026

महात्मा फुले विद्यालय कनेरगाव नाका येथे बाल संरक्षण, बालविवाह प्रतिबंध व बालकायदे विषयक जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

 महात्मा फुले विद्यालय कनेरगाव नाका येथे बाल संरक्षण, 

बालविवाह प्रतिबंध व बालकायदे विषयक जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न


हिंगोली, दि. 7 (जिमाका) :  इसार संस्था व जिल्हा बाल संरक्षण कक्ष हिंगोली व चाईल्ड हेल्पलाइन 1098 कक्ष हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले विद्यालय, कनेरगाव नाका ता. जि. हिंगोली येथे बाल संरक्षण, बालविवाह प्रतिबंध व बालकायदे विषयक व्यापक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


विद्यार्थ्यांमध्ये बालहक्कांविषयी जागरूकता निर्माण करणे, बालविवाहास प्रतिबंध घालणे तसेच बालकांच्या संरक्षणासाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय यंत्रणांची माहिती पोहोचविणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. 


कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्रीमती सरस्वती कोरडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बालविवाह प्रतिबंध अधिनियम, 2006 मधील महत्त्वाच्या तरतुदी सविस्तरपणे सांगितल्या. बालविवाहामुळे बालकांच्या शारीरिक, मानसिक, शैक्षणिक व सामाजिक विकासावर होणारे दुष्परिणाम स्पष्ट करून बालविवाह हा कायद्याने दंडनीय गुन्हा असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, 2015 अंतर्गत संरक्षण व काळजीची गरज असलेल्या बालकांना मिळणाऱ्या सुविधा, बालकांचे मूलभूत अधिकार, शिक्षणाचा अधिकार, संरक्षणाचा अधिकार व सहभागाचा अधिकार याविषयी सखोल मार्गदर्शन केले. 


जिल्ह्यात बालकांच्या हितासाठी कार्यरत असलेल्या विविध यंत्रणा, सेवा व योजनांची माहितीही त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. यानंतर बाल कल्याण समिती, हिंगोलीचे सदस्य पी. आर. हेंबाडे यांनी विद्यार्थ्यांना लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण (POCSO) अधिनियम, 2012 विषयी मार्गदर्शन केले. त्यांनी बालकांवरील लैंगिक अत्याचाराचे प्रकार, अशा घटनांची तक्रार करण्याची प्रक्रिया, कायद्यांतर्गत उपलब्ध संरक्षण तसेच बालकांच्या सुरक्षिततेसाठी घ्यावयाची काळजी याबाबत माहिती दिली. याशिवाय बाल कल्याण समितीचे कार्य, समितीमार्फत दिली जाणारी मदत व संरक्षणात्मक उपाययोजना यांची माहिती विद्यार्थ्यांना समजावून सांगितली.



चाईल्ड हेल्पलाइन 1098 चे केसवर्कर सुरज इंगळे यांनी चाईल्ड हेल्पलाइन 1098 ही भारत सरकार मान्यताप्राप्त, 24x7 मोफत, गोपनीय व आपत्कालीन बालसहाय्य सेवा असल्याचे सांगितले. संकटग्रस्त, बेवारस, हरवलेले, शोषणग्रस्त, बालमजुरी, बालविवाह अथवा इतर कोणत्याही प्रकारच्या अडचणीत असलेल्या बालकांना मदत मिळवून देण्यासाठी 1098 वर त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच बालकांच्या संरक्षणासाठी समाजातील प्रत्येक घटकाची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.चाईल्ड हेल्पलाइन 1098 हिंगोलीचे समुपदेशक अंकुर पाटोडे यांनी विद्यार्थ्यांना बालविवाह प्रतिबंधाची सामूहिक प्रतिज्ञा दिली. 


बालविवाह करणार नाही, होऊ देणार नाही तसेच अशा घटना आढळल्यास संबंधित यंत्रणांना माहिती देऊन त्यांना प्रतिबंध करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रतिज्ञेत सहभाग नोंदविला. कार्यक्रमा दरम्यान अनिता भगत (जिल्हा समन्वयक) त्रिरत्न पतोडे तालुका समन्वयक इसार संस्था उपस्थित होते. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. तसेच बालहक्क, बाल संरक्षण, बालविवाह प्रतिबंध, पोक्सो कायदा व चाईल्ड हेल्पलाइन 1098 या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण होऊन बाल संरक्षणासाठी सकारात्मक दृष्टिकोन विकसित झाला. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयाच्यावतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे अभिनंदन करून त्यांचे आभार मानण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व सुरक्षित भविष्यासाठी अशा प्रकारचे जनजागृती उपक्रम अत्यंत उपयुक्त असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

00000

No comments: