जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला जिल्हा बाल संरक्षण व बालविवाह प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा
हिंगोली, दि. २५ सप्टेंबर (जिमाका) : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे जिल्हा बाल संरक्षण कक्ष, प्रायोजकत्व व प्रतिपालकत्व, दत्तक विधान, बालकल्याण समिती तसेच बालविवाह प्रतिबंधक कृती दलाच्या कामकाजाची आढावा बैठक संपन्न झाली.
बैठकीत जिल्ह्यातील बाल संरक्षणाच्या अनुषंगाने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रम, चाईल्ड हेल्पलाईन १०९८, दत्तक विधान प्रक्रिया, बालकल्याण समितीचे कामकाज तसेच बालविवाह प्रतिबंधासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संतोष दरपलवार यांनी पॉवरपॉईंट सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील बाल संरक्षणाची सद्यस्थिती, करण्यात आलेली कार्यवाही, जनजागृती कार्यक्रम तसेच बालविवाह प्रतिबंधक उपाययोजनांची माहिती सादर केली.
बालकांच्या संरक्षणासाठी विविध विभागांमध्ये प्रभावी समन्वय ठेवून शासनाच्या योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या. बालविवाहास प्रतिबंध करण्यासाठी गावपातळीपासून जिल्हास्तरापर्यंत व्यापक जनजागृती करणे, प्राप्त तक्रारींवर तातडीने कार्यवाही करणे तसेच संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी (बा.क.) विजय बोराटे, संबंधित विभागांचे अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, चाईल्ड हेल्पलाईन जिल्हा प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे, जिल्हा बाल संरक्षण कक्षातील अधिकारी व कर्मचारी तसेच चाईल्ड हेल्पलाईनचे कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment