माणिक स्मारक आर्य माध्यमिक विद्यालयात कायदेविषयक शिबिर संपन्न
बालस्नेही कायदेशीर सेवा योजनेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
हिंगोली, दि. 24 (जिमाका) : तालुका विधी सेवा समिती व वकील संघ, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने माणिक स्मारक आर्य माध्यमिक विद्यालय, हिंगोली येथे आज रोजी कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हिंगोली तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात विद्यार्थ्यांना ‘बालकांसाठी बालस्नेही कायदेशीर सेवा योजना, 2024’ याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वि. म. मानखैर, समन्वयक, तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, हिंगोली हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. एस. आर. घुगे, अध्यक्ष, वकील संघ, हिंगोली तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक के. एस. राठोड उपस्थित होते. ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. एन. एस. घुगे यांनी विद्यार्थ्यांना बालस्नेही कायदेशीर सेवा योजनेबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी मार्गदर्शन करताना वि. म. मानखैर यांनी बालकांना विधी सेवेमार्फत उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या विविध सुविधा तसेच बालकांशी संबंधित कायद्यांची माहिती सोप्या भाषेत दिली. बालवयात गुन्हेगारी व व्यसनांपासून दूर राहणे आवश्यक आहे. लहान वयात नकळत झालेली चूक भविष्यात गंभीर परिणाम घडवू शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चुकीच्या मार्गापासून दूर राहून शिक्षण व करिअरकडे लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन त्यांनी केले.
अॅड. एन. एस. घुगे यांनी नागरिकशास्त्र व भारतीय राज्यघटनेतील तरतुदी यांचा कायद्याशी असलेला संबंध स्पष्ट करत विद्यार्थ्यांना बालकांसाठी उपलब्ध असलेल्या बालस्नेही कायदेशीर सेवांबाबत सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी आपल्या हक्कांसोबतच कर्तव्यांचीही जाणीव ठेवावी, असे त्यांनी सांगितले.
शिबिरास विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. एम. ए. कांबळे, सचिव, वकील संघ, हिंगोली यांनी केले, तर सहशिक्षक ए. एम. गोरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तालुका विधी सेवा समितीचे वरिष्ठ लिपिक डी. बी. हनवते व कनिष्ठ लिपिक एन. एस. दिंडे यांनी विद्यालयातील कर्मचारीवर्गाच्या सहकार्याने परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment