महाबीज कार्यालयात जनसंवाद कार्यक्रम संपन्न
प्रमाणित व गुणवत्तापूर्ण बियाण्यांचीच खरेदी करण्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे आवाहन
हिंगोली, दि. 24 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज), जिल्हा कार्यालय हिंगोली येथे गणेशोत्सवानिमित्त आज जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद हिंगोली अतुल एस. वायसे, कृषी विज्ञान केंद्र, तोंडापूरचे शास्त्रज्ञ राजेश भालेराव, महाबीजचे भागधारक सतीश सोमानी, बबनराव पतंगे यांच्यासह जिल्ह्यातील शेतकरी व महाबीजचे विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी शेतकऱ्यांनी केंद्र शासनाच्या विकसित साथी पोर्टलद्वारे निर्मित क्यूआर कोड असलेले महाबीजचे प्रमाणित बियाणेच खरेदी करण्याचे आवाहन केले. प्रमाणित बियाण्यांच्या वापरामुळे शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे उपलब्ध होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. तसेच जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवून जमिनीची सुपीकता टिकविण्यासाठी भाभा अणुसंशोधन केंद्राच्या तंत्रज्ञानावर आधारित निमास्त्र, निंबोळी पावडर, कचरा विघटनासाठी महास्पीड, जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा तसेच जैविक द्रवरूप खतसंघ महाजैविक यांचा शेतीमध्ये वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कृषी विकास अधिकारी अतुल एस. वायसे व कृषी विज्ञान केंद्र, तोंडापूरचे शास्त्रज्ञ राजेश भालेराव यांनी उपस्थित शेतकऱ्यांना विविध शेतीविषयक बाबींवर सखोल मार्गदर्शन केले. महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक आर. आर. राठोड यांनी महाबीजची नवीन उत्पादने, ध्येय-धोरणे तसेच रब्बी हंगामासाठी हरभरा, गहू व करडई बियाण्यांच्या उपलब्धतेबाबत माहिती दिली. हिंगोली जिल्ह्याने जैविक उत्पादनांच्या विक्रीमध्ये महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक विक्री केल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर अनुदानित बियाणे मिळण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. डी. मुंगल यांनी केले. पी. डी. बोकारे, कृषी क्षेत्र अधिकारी यांनी प्रास्ताविक केले, तर व्ही. आर. घुले, कृषी क्षेत्र अधिकारी यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाबीज जिल्हा कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शेतकरी तसेच महाबीजचे विक्रेते उपस्थित होते.

No comments:
Post a Comment