01 January, 2025

“ वाचन संकल्प महाराष्ट्राचा’’ उपक्रमाअंतर्गत शासकीय जिल्हा ग्रंथालयात वाचन कौशल्य कार्यशाळा व ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन

हिंगोली (जिमाका), दि. 01 : “वाचन संकल्प महाराष्ट्राचा”उपक्रमाअंतर्गत शासकीय जिल्हा ग्रंथालयात वाचन कौशल्य कार्यशाळेचे, सामुहिक वाचनाचे व ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन आज जिल्हा सांख्यिकी उपसंचालक एस. एम. रचावाड यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी सहायक संशोधन अधिकारी ए. ए. करेवार, मराठवाडा विभागीय ग्रंथालय संघाचे अध्यक्ष खंडेराव सरनाईक, विभागीय ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह संतोष ससे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, मिलिंद सोनकांबळे, शंभोनाथ दुभळकर, दिगांबर झुंजारे, फारुक शेख, ग्रंथालय पदाधिकारी व विद्यार्थी यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी वाचनाचे महत्व, वाचन कौशल्य कसे विकसीत करावे, तसेच वाचन करताना सुरुवात कशाप्रकारे करुन पुस्तकांशी मैत्री कशी याबाबत उपस्थित विद्यार्थी व उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर लगेच सर्व उपस्थितांनी आपापल्या आवडीनुसार पुस्तके निवडून एक तास वाचन केले व आपले अनुभव कथन केले. वाचन संस्कृतीच्या विकासाने तरुणांच्या व्यक्तीमत्वाचे भरणपोषण होण्यास तसेच सामाजिक प्रबोधन होण्यास मदत होते. तरुण पिढीला प्रत्यक्ष ग्रंथ वाचनाकडे आकर्षित करण्याकरिता “वाचन संकल्प महाराष्ट्राचा”उपक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम 15 जानेवारीपर्यंत वाचन पंधरवाडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीत सामूहिक वाचन, वाचन कौशल्य कार्यशाळा, वाचन संवाद, पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धा इतर आयोजित करण्यात येणार आहेत. “वाचन संकल्प महाराष्ट्राचा”उपक्रमाअंतर्गत शासकीय जिल्हा ग्रंथालयात दि. 1 जानेवारी ते 15 जानेवारी, 2025 पर्यंत विशेष वाचक सभासद नोंदणी मोहीम सुरु करण्यात येत आहे. हिंगोली जिल्हयातील सर्व ग्रंथप्रेमी, वाचकांनी मोठ्या प्रमाणात सभासद होऊन सहभाग नोंदवावा व वाचनाचा आनंद घ्यावा. याकरिता जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नेहरु नगर, रिसाला नाका, हिंगोली (सपंर्क क्रमांक. 9403067267) येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. हे ग्रंथ प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नेहरु नगर, रिसाला नाका, हिंगोली येथे येऊन लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले आहे. ******

No comments: