10 January, 2025

नेहरू युवा केंद्रातर्फे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न

हिंगोली (जिमाका), दि. 10 : युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय,भारत सरकार व नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने येथील तालुका क्रीडा संकुलामध्ये तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी क्रीडा स्पर्धेचे प्रमुख उद्घाटक जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत, कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, प्रमुख पाहुणे तालुका क्रीडा अधिकारी श्री.बोथीकर तसेच प्रमुख मार्गदर्शक दत्ताराव बांगर, संजय भुमरे, राष्ट्रीय खेळाडू गजानन आडे, रवि हनवते उपस्थित होते. जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत यांनी युवकांच्या क्रीडा गुणांना वाव मिळण्याकरिता तसेच युवकांना क्रीडा स्पर्धेत व्यासपीठ उपलब्ध करण्याकरिता नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये मुलांकरिता सामूहिक खेळ कबड्डी तसेच मुलींकरिता सामूहिक खेळ खो- खो व मुले आणि मुलींकरिता वैयक्तिक खेळ गोळा फेक व 100 मीटर धावणे स्पर्धा घेण्यात आल्याचे सांगून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. युवक कबड्डी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आदर्श स्पोर्ट्स क्रीडा मंडळ हिंगोली, द्वितीय क्रमांक अंधारवाडी कबड्डी टीम, तृतीय क्रमांक एकता स्पोर्ट्स अकादमी हिंगोली यांना मिळाला आहे. युवती खो-खो मध्ये प्रथम क्रमांक सरजू देवी भिकूलाल आर्य कन्या विद्यालय हिंगोली, द्वितीय क्रमांक शासकीय अनुसूचित जाती मुलींची शाळा कळमनुरी, तृतीय क्रमांक सरजुदेवी क्रीडा मंडळ हिंगोली यांना मिळाला आहे. युवक गोळा फेकमध्ये प्रथम क्रमांक अभिषेक शिंदे, द्वितीय क्रमांक तेजस काकडे, तृतीय क्रमांक किरण पोटे यांना मिळाला आहे. युवती गोळा फेक प्रथम क्रमांक वैशाली चव्हाण, द्वितीय क्रमांक दुर्गा काळे, तृतीय क्रमांक भाग्यश्री कांबळे यांना मिळाला आहे. 100 मीटर रनिंग युवक प्रथम क्रमांक अक्षय वानखेडे, द्वितीय सुरज काळे, तृतीय क्रमांक शुभम पाईकराव यांना मिळाला आहे. 100 मीटर रनिंग युवती प्रथम क्रमांक शुभांगी राठोड, द्वितीय क्रमांक दुर्गा काळे, तृतीय क्रमांक शिवानी सावळे यांना मिळाला आहे. या सर्व युवक व युवतींना स्पोर्ट्स किट, सुवर्ण पदक, रौप्य पदक व कांस्य पदक देऊन सन्मानित करण्यात आले. क्रीडा स्पर्धा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण पांडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन गजानन आडे यांनी केले. तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धाचे आयोजन एकता स्पोर्ट्स अकादमी व वाटसरु फाउंडेशन हिंगोली यांच्या सहकार्याने आयोजन करण्यात आले होते. *****

No comments: