16 January, 2025

पीएम गती शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन पोर्टलबाबत शासकीय यंत्रणांचे एकदिवसीय प्रशिक्षण संपन्न

हिंगोली, दि.16,(जिमाका): जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांनी प्रधानमंत्री गतीशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन पोर्टलचा सुलभ आणि सहजरित्या वापर व त्यावर अपलोड करावयाच्या माहितीबाबत जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्यामार्फत आज गुरुवार (दि.16) रोजी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय येथे एकदिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमास जिल्ह्यातील संबंधित यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी जी. जी. चितळे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी प्रदीप नळगीरकर यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या एकदिवशीय प्रशिक्षण कार्यशाळेत नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन यांची स्वायत्त संस्था ‘महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र, नागपूर’ येथील सहयोगी शास्त्रज्ञ एस. व्ही. बलमवार यांनी मार्गदर्शन केले आहे. प्रधानमंत्री गती शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन पोर्टलच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल होणार असून, प्रशासकीय यंत्रणेतील सर्व सेवा प्राप्त होण्याला गती मिळावी, यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 13 ऑक्टोबर 2021 रोजी पीएम गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन या पोर्टलचे उद्घाटन केले होते. हे पोर्टल केंद्र शासनाचे जीआयएस-आधारीत प्लॅटफार्म आहे. या उपक्रमाद्वारे केंद्रीय मंत्रालय, राज्य व केंद्रशासित प्रदेशांमधील डेटा एकत्रित करून पायाभूत सुविधांच्या नियोजनामध्ये समन्वय साधला जाणार आहे. रेल्वे, महामार्ग, बंदरे व विमानतळ यांसारख्या पायाभूत सुविधा सोबतच या योजनेत आरोग्य केंद्र, शाळा व बँक यासारख्या सामाजिक व आर्थिक सुविधा विकसित करण्यावरही भर देण्यात येणार आहे. हे पोर्टलवर जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांच्या अधिनस्त सुरू असलेल्या पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात येणार असल्याचे सहयोगी शास्त्रज्ञ एस. व्ही. बलमवार यांनी सांगितले. *****

No comments: