30 January, 2025

पैलपाडा येथील महाबीज उत्कृष्टता केंद्रावर रब्बी शिवार फेरीचे आयोजन

हिंगोली (जिमाका), दि. 30 : दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित अकोला अर्थात महाबीजमार्फत महाबीज उत्कृष्टता केंद्र, पैलपाडा येथे मंगळवार, दि. 4 फेब्रुवारी 2025 पर्यंत शिवार फेरी रबी 2024-25 चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या शिवार फेरीचे उद्घाटन दि. 28 फेब्रुवारी रोजी महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते झाले. यावेळी महाबीजचे ज्येष्ठ संचालक वल्लभराव देशमुख, संचालक डॉ. रणजित सपकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर यांनी अध्यक्षीय भाषणात महाबीज बियाणे संशोधनाची पुढील दिशा शेतकरीभिमुख राहील याची ग्वाही देऊन महाबीजच्या नवीन उपक्रमाबद्दलची माहिती उपस्थितांना दिली. तसेच महाबीज बिजोत्पादन कार्यक्रम कसा फायदेशीर आहे, याचे महत्त्व विशद करुन राज्यातील शेतकरी बांधवांनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन महाबीजचे ज्येष्ठ संचालक वल्लभराव देशमुख यांनी याप्रसंगी केले. महाबीजचे संचालक डॉ. रणजित सपकाळ यांनी महाबीज जैविक उत्पादनांच्या गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त करुन याचा लाभ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी घ्यावा, असे आवाहन केले. या शिवार फेरी कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाव्यवस्थापक (गुण नियंत्रक व संशोधन) डॉ. प्रफुल्ल लहाने यांनी केले. यावेळी सदर प्रक्षेत्रावर महाबीज वनौषधी उद्यानाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बीज परीक्षण अधिकारी राजेश पाटील यांनी तर आभारप्रदर्शन जिल्हा व्यवस्थापक गणेश डहाळे यांनी केले. या कार्यक्रमास अकोला विभागातील शेतकरी बांधव, महाबीजचे सन्माननीय भागधारक, बिजोत्पादक, महाबीज विक्रेते, महिला शेतकरी, महिलांचे विविध बचत गट तसेच महाबीजचे विभाग प्रमुख व इतर अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित अकोला अंतर्गत महाबीज उत्कृष्टता केंद्र, पैलपाडा येथे 57 एकर विस्तीर्ण प्रक्षेत्र आहे. रब्बी शिवार फेरीमध्ये महाबीज विपणन साखळीमधील तसेच अधिक उत्पादनशील गहू (33 वाण) व हरभरा (38 वाण) या प्रमुख पिकांसह संकरित ज्वारी, संकरित मका, जवस, संकरित बाजरी, सूर्यफुल व महाबीज संशोधित भाजीपाला पिकांच्या नवीन वाणांचा समावेश आहे. महाबीजव्दारे आयोजित शिवार फेरीस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून याप्रसंगी शेतकरी बांधवांनी शिवार फेरीच्या शेतकरीभिमूख उपक्रमाचे नियोजनबद्ध आयोजनाचे कौतुक केले. शेतकरी बांधवांना रब्बी/उन्हाळी पिकांच्या विविध वाणांचे गुणधर्म एकाच ठिकाणी प्रत्यक्ष अनुभवता येऊन पुढील हंगामात त्यांना त्यांच्या जमिनीस अनूकुल वाणांची निवड करणे सोईचे व्हावे हेच या शिवार फेरीचे प्रमुख उद्दिष्ट आहे. दिनांक 29 जानेवारी रोजी शिवार फेरीस जळगाव, जालना व पुणे विभागातील पुरुष व महिला शेतकरी बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली असून दिनांक 4 फेब्रुवारी रोजी परभणी व नागपूर विभागातील शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत या शिवार फेरीची सांगता होणार आहे. या शिवार फेरीत जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी भेट देऊन विविध रब्बी, उन्हाळी पिक/वाण व त्यांचे गुणधर्म, महाबीज जैविक उत्पादने, उत्ती संवर्धीत केळी यासंदर्भातील बहुमोल माहिती व प्रत्यक्ष अनुभव घेण्याचे आवाहन महाबीजव्दारे करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता महाबीजच्या अधिकारी, कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेत आहेत. ******

No comments: