शासनाच्या विविध योजनाचा लाभ घ्यावा
--- शाम मदनुरकर
हिंगोली, दि.9:- राज्य शासनाच्या विविध विभागामार्फत कल्याणकारी योजना राबविण्यात येतात या शासनाच्या विविध योजनांचा
लाभ घ्यावा, असे आवाहन औंढा तालूक्यातील तहसीलदार श्री. श्याम मदनुरकर यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, जिल्हा माहिती कार्यालय आणि जिल्हा प्रशासन हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने 'संवादपर्व' उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत औंढा नागनाथ येथे नागरिकांना मार्गदर्शन करतांना तहसिलदार श्री. मदनुरकर हे बोलत होते. यावेळी गट विकास अधिकारी, डॉ. सुधीर ठोंबरे, महिला व बालविकासचे श्री. भाऊराव पंडित, बीओ सुभाष बगाटे, पोलीस
उपनिरीक्षक श्री. केंद्रे तसेच विश्वास गणेश मंडळाचे अध्यक्ष रामराव पाटील यांची उपस्थिती होती.
सदर कार्यक्रम विश्वास गणेश मंडळ, औंढा नागनाथ
येथे आयोजित करण्यात आला यावेळी श्री. मदनुरकर म्हणाले की, शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी शासनामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहे. महसूल प्रशासन अधिक लोकाधिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्याच्या दृष्टीने मागील 4 वर्षात सुवर्ण जयंती राजस्व अभियान यशस्वीरीत्या राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत शिबिरे घेऊन विविध दाखले प्रदान करणे, विस्तारित समाधान योजना राबविणे, महसूल अधिकाऱ्यांकडे 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ प्रलंबित असणारे सर्व अर्धन्यायीक प्रकरणे अंतिम निर्णय देवून निकालात काढणे, एका महिन्यावर प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणे व त्याकरिता मंडल मुख्यालयी फेरफार अदालत घेणे, ई-फेरफार सुविधा प्रत्येक गावात उपलब्ध करुन देणे, भूसंपादन केलेल्या प्रकरणी कमी जास्त पत्रके तयार करुन गाव दप्तर अद्ययावत करणे, गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले गाडी रस्ते/पाणंद/शेतरस्ते/शिवार रस्ते/ शेतावर जाण्याचे पायमार्ग मोकळे करणे, जमिनीच्या अनधिकृत अकृषक वापराच्या प्रकरणांची शोध मोहीम घेऊन कारवाई करणे, शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे काढणे आदी उपक्रम राबवून नागरिकांना सेवा प्रदान करण्यात येत आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी अन्न सुरक्षा योजनेतंर्गत माफक दरात धान्य पुरवठा करण्यात येत आहे.
तसेच गट विकास अधिकारी डॉ. ठोंबरे, म्हणाले की, शासनामार्फत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गृहभेटीतून स्वच्छतेकडे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. स्वछता अभियान सर्व देशभर सुरु असून आपल्या गावची स्वच्छता ग्रामस्थानी करुन शंभर टक्के पाणंदमुक्त करणे आवश्यक आहे. स्वच्छतागृहाचा वापर केला पाहिजे. प्रत्येक ग्रामस्थाने आपल्या गावाच्या आणि कुटूंबाच्या सोयीसाठी हे प्राधान्याने करण्याची गरज असून यामुळे सर्वांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होणार आहे. आपले व आपल्या गावाचे आरोग्य आपल्या हातात असल्याचे सांगून त्यांनी ग्रामविकास, नरेगा विविध योजनांची माहिती दिली.
मुलांच्या तुलनेत मुलींचे जन्माचे प्रमाण कमी होत असल्याने सगळीकडे चिंता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात प्रशासनाने पीसीपीएनडीटी (PCPNDT) या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले आहेत. मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी जनजागृतीचे काम हाती घेण्यात आले आहे. याकरीता बेटी बचाओ...बेटी पढाओ, माझी कन्या भाग्यश्री या सारख्या क्रांतीकारी योजना शासनामार्फत राबविण्यात येत असल्याचे माहिला बाल विकास विभागाचे श्री. भाऊराव पंडित यांनी सांगुन या योजनाची सविस्तर माहिती दिली. तसेच मुलगा-मुलगी असा भेदभाव न करता मुलींनाही सर्वांनी समान व सन्मानाची वागणुक द्यावी, असे अवाहन ही याप्रसंगी केले.
गणेशोत्सव काळात शासनाच्या योजनांची माहिती देण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाने ‘संवादपर्व’ हा उपक्रम हाती घेतला असल्याचे सांगुन या उपक्रमातंर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी आयोजन करुन योजनाची माहिती देण्यात येत आहे. तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने प्रकाशित होणारे 'लोकराज्य' महाराष्ट्र शासनाच्या
मुखपत्रास गौरवशाली परंपरा लाभलेली असनू राज्याच्या कानाकोपऱ्यात शासनाच्या विविधि कल्याणकारी योजनाची माहिती देणारे हे राज्यातील एकमेव मासिक आहे. या मासिकाचे वर्गणीदार होऊन आपण विविध योजनाची व घडामोडीची माहिती प्राप्त करुन घेण्याबाबत जिल्हा
माहिती कार्यालयाच्यावतीने उपस्थितांना माहिती दिली.
यावेळी संवादपर्व कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.
****
No comments:
Post a Comment