01 July, 2017

पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते वृक्ष लागवड उपक्रमाचा शुभारंभ

  • जिल्ह्यात होणार 7 लाख 66 हजार वृक्षांची लागवड
                                             
हिंगोली,दि.1: राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास वक्फ राज्यमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते येथील स्व. उत्तमराव पाटील जैव विविधता वन उद्यान, एस.आर.पी.एफ. कॅम्प येथे वृक्षारोपण करुन 4 कोटी वृक्ष लागवड उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.  
यावेळी पालकमंत्री श्री. दिलीप कांबळे म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने 2017 ते 2019 पर्यत या तीन वर्षांच्या कालावधीत वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. सन 2017 मध्ये 4 कोटी वृक्ष लागवड करण्यात आली होती. यावर्षी 2018 मध्ये 13 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार असून, पुढील वर्षी 2019 मध्ये 33 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्यामुळे तीन वर्षात एकूण 50 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प राज्यासाठी करण्यात आला आहे. यावर्षी राज्यात 4 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प असताना 1 ते 7 जूलै या कालावधीत जिल्ह्यात 7 लाख 66 हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. सदर वृक्ष लागवडीचे उद्दिष्टपूर्तीसाठी प्रशासनाने पुर्ण तयारी केली आहे. स्व. उत्तमराव पाटील जैव विविधता वन उद्यान, एस.आर.पी.एफ. कॅंम्प येथील परिसरात सुमारे दोन हजाराहून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. प्रत्येक नागरिकांनी किमान एक वृक्ष लावून त्याची निगा राखल्यास राज्यातील वृक्ष लागवडीखालील क्षेत्र वाढण्यास नक्कीच मदत होईल. लोकप्रतिनीधी यांच्यासह पदाधिकारी, महाविद्यालयीन-शालेय विद्यार्थी तसेच नागरिकांनी पुढील पिढीसाठी व निसर्गाचे समतोल राखण्यासाठी जास्तीत-जास्त वृक्ष लागवड करण्याचे आवाहन पालकमंत्री कांबळे यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, सर्वश्री आमदार तान्हाजी मुटकूळे, डॉ. जयप्रकाश मुंदडा, रामराव वडकुते, नगर परिषदेचे नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, राज्य राखीव पोलिस बलाचे प्रभारी समादेशक श्री. तडवी, सामाजिक वनीकरण विभागाचे वन उपसंचालक केशव वाबळे, यांच्यासह विविध विभाग प्रमुख आणि कर्मचारी यांची उपस्थिती होती.

*****


 

No comments: