03 July, 2017

वस्तू व सेवा कर कायद्याविषयी मार्गदर्शन
          हिंगोली, दि. 3 : प्रस्तूत वस्तू व सेवाकर कायद्याचे स्वागत करण्यासाठी दि. 1 जुलै, 2017 रोजी वस्तू व सेवाकर कार्यालय हिंगोली येथे कार्यक्रम संपन्न झाला.
                याप्रसंगी सहाय्यक राज्य कर आयुक्त निलेश शेवाळकर यांनी जीएसटी बद्दल व्यापाऱ्यांच्या मनातील भीती काढून त्यांना सखोल मार्गदर्शन केले. यावेळी रमेशचंद्र बगडीया, अशोक डुब्बेवार व मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गणेश थोटे यांनी केले व आभार प्रदर्शन श्री. तपासे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जीएसटी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
                1 जुलै, 2017 पासून संपुर्ण देशात वस्तू व सेवाकर कायदा लागु झाला आहे. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये अप्रत्यक्ष कर प्रणाली मधील हा सर्वात मोठा व सर्वसमावेशक बदल आहे. जगभरात अंदाजे 165 देशात ही कर प्रणाली राबविली जाते. भारतासारख्या लोकशाही सरकार असलेल्या संघीय देशामध्ये या कर प्रणाली आमलात आणणे हे अत्यंत आव्हानात्मक होते कितेक वर्षापासून केंद्र व सर्व राज्याच्या स्तरावर ही कर प्रणाली अंमलात आणण्याचे प्रयत्न चालु होते. केंद्र व राज्यामधील विविध स्तरावरील व्यक्तीच्या अथक परिश्रमानंतर ही कर प्रणाली लागु करणे शक्य झाले आहे. 1 जुलै हा दिवस अप्रत्यक्ष कराशी संबंधीत भागधारक तसेच सर्व नागरिकांसाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे.
                देशातील अप्रत्यक्ष कर प्रणाली मध्ये अमुलाग्र बदल करणारी ही वस्तू व सेवा कर प्रणाली आहे. सदर कर प्रणाली ही राष्ट्रीय सकल उत्पन्नात वृध्दी करणारी आहे. संपूर्ण देशात अप्रत्यक्ष कराची एकच पारदर्शक पध्दत हा वस्तू व सेवा कर प्रणालीचा मुळ गाभा आहे. उद्योजक व व्यापाऱ्यासाठी ही कर पध्दत सोपी असून त्यातील तरतुदीमुळे वस्तू व सेवांच्या किंमतीत घट होऊन ग्राहकांना त्यांचा फायदा होईल. सदर कर पधदतीबाबत माहिती देण्यासाठी तसेच त्याबाबतच्या शंकाचे निरसन करण्यासाठी वस्तू व सेवा कर विभागातील (पूर्वीचा विक्रीकर विभाग) अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रात जवळपास 425 ठिकाणी कार्यशाळा घेतलेल्या आहेत. तसेच व्यापाऱ्यांना नोंदणी, विवरणपत्र दाखल करणे इत्यादी बाबत येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी वस्तू व सेवाकर विभागाच्या महाराष्ट्रातील सर्व कार्यालयांमध्ये जीएसटी सुविधा केंद्र उभारण्यात आलेले आहेत.
                सर्व करदात्यांना आवाहन करण्यात येते की, या कर प्रणालीबाबत दडपण घेऊ नये. कर प्रणाली लागू करताना काही कायदेशीर तरतूदी प्रक्रिया यामध्ये अडचणी असतील तर त्या लवकरात लवकर सोडवल्या जातील कापड उद्योगबाबतीत व्यापाऱ्याप्रमाणे जे करदाते नव्यानेच कर भरण्यास पात्र होत आहेत. त्यांना दि. 30 जुलै, 2017 पर्यंत अर्ज करण्यासाठी वेळ आहे. शासनाने सर्व करदात्यांच्या खऱ्या अडचणी एकत्रीत करून वस्तू व सेवाकर विभागाकडे अथवा शासनाकडे सादर कराव्यात, त्याबाबत विचारविनिमय करुन कार्यवाही केली जाईल. ज्या करदात्यांना नव्याने नोंदणीसाठी अर्ज करावयाचा आहे, त्यांनी वस्तू व सेवाकर विभागातील जीएसटी सुविधा केंद्र तसेच शासनमान्य ई-सेवा केंद्रातून मदत घेऊन सुध्दा ऑनलाईन अर्ज करता येईल. वस्तू व सेवाकर कायद्याखाली सुरुवातीचे दोन महिने जीएसटीआर 3 बी या नमुन्यात विवरण पत्र तयार करण्यासाठी युटीलीटी वस्तू व सेवाकर विभागांतील उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
                या दिवसाचे औचित्य साधून विक्रीकर भवन या कार्यालयाचे नाव वस्तू व सेवाकर भवन असे बदलण्यात येत आहे.

*****

No comments: