15 September, 2017

‘महाराष्ट्र मिशन वन मिलियन’ उपक्रमास जिल्ह्यात उत्स्फुर्त प्रतिसाद
·  हिंगोली जिल्हा फुटबॉलमय
·  जिल्ह्यातील 239 शाळांचा सहभाग, 726 फुटबॉलचे वितरण

            हिंगोली,दि.15: जागतिक फुटबॉल महासंघाची (फिफा) वर्ल्डकप स्पर्धा 6 ते 24 ऑक्टोबर या कालावधीत भारतात होत आहे. या ऐतिहासिक स्पर्धेच्या निमित्ताने देशभरात क्रीडासंस्कृती रुजविण्याचा ड्रीम प्रोजेक्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला आहे. या स्पर्धेत सहभागी होत असलेल्या भारतीय संघाला शुभेच्छा देण्यासाठी आणि राज्यातील मुला-मुलींमध्ये फुटबॉलची आवड निर्माण व्हावी यासाठी राज्य शासनाने ‘महाराष्ट्र मिशन वन मिलियन’ हा फुटबॉलचा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. 
            हिंगोली येथील जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथे जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत आयोजित ‘महाराष्ट्र मिशन वन मिलियन’ उपक्रमाचे उद्घाटन आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या हस्ते झाले. यावेळी नगराध्यक्ष बाबारावजी बांगर, आमदार डॉ. संतोष टारफे, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार शिक्षणाधिकारी दिपक चवणे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
            जिल्ह्यातील 239 शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थ्यींनी, जिल्हा फुटबॉल संघटना, विविध क्रिडा मंडळे, क्रिडा प्रेमी  यांनी सहभागी होत फुटबॉल खेळून ‘महाराष्ट्र मिशन वन मिलियन’ या फुटबॉलच्या अनोख्या उपक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. याकरीता जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय यांच्यामार्फत जिल्ह्यातील शाळांना 726 फुटबॉलचे वितरण करण्यात आले होते.

*****

No comments: