14 September, 2017

स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत स्वच्छता हीच सेवा अभियानाचे आयोजन

          हिंगोली, दि. 14 :  स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) ची अंमलबजावणी दि. 15 मे, 2015 पासून संपुर्ण राज्यात सुरु झालेली आहे. जिल्हयातील सर्व नगरपालिका/नगर पंचायत मार्फत दि. 15 सप्टेंबर 2017 ते दि. 2 ऑक्टोबर 2017 या कालावधीत ‘स्वच्छता हिच सेवा’ अभियान राबविण्यात येणार आहे. त्यानुसार दि. 02 ऑक्टोबर 2017 रोजी राज्याचा संपुर्ण नागरी भाग हगणदारीमुक्त म्हणुन घोषित करण्यात येणार आहे. जिल्ह्यामध्ये 3 नगरपालिका व 2 नगर पंचायत आहेत. त्या सर्व राज्यस्तरीय समितीकडुन हागणदारीमुक्त घोषित करण्यात आलेल्या आहेत.  3 नगर पालिकांची केंद्रीय पथकाकडुन तपासणी करण्यात आली असून त्यामुळे त्या पात्र आहेत. जिल्ह्यामध्ये 71.18 टक्के वैयक्तीक शौचालय पुर्ण झाले आहे.
            या माहिमेअंतर्गत दि. 15 सप्टेंबर 2017 रोजी स्वच्छता हि सेवा या मोहिमेचा औपचारिकरित्या प्रारंभ करण्यात येणार असून दि. 17 सप्टेंबर 2017 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 12.00 वाजेपर्यंत श्रमदान करुन सेवा दिवस साजरा करण्यात येणार आहे. तसेच दि. 24 सप्टेंबर 2017 रोजी समाजातील सर्व घटकांना श्रमदानात सहभागी करुन घेऊन समग्र स्वछता करणे. दि. 25 सप्टेंबर 2017 रोजी शहरातील हॉस्पीटल, उद्याने, पुतळे व स्मारके, बसथांबे, तलाव आणि स्वच्छता गृहाची व्यापक प्रमाणात सफाई करुन सर्वत्र स्वच्छता करणे आणि दि. 1 ऑक्टोबर 2017 रोजी शहरातील प्रसिध्द स्थळांच्या ठिकाणी व्यापक श्रेष्ठ स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.
नागरिकांनी उघडयावर शौचास जाऊ नये म्हणुन व्यापक प्रमाणात जनजागृती करुन नागरिकांना उघडयावर शौचास जाण्यास परावृत्त करण्यात येत आहे. तसेच हिंगोली जिल्हयातील सर्व नगर पालिका/पंचायतीने दि. 01 सप्टेंबर, 2017 पासुन गुड मॉर्निंग व गुड इव्हिनिंग पथके कार्यरत केलेली आहेत. सार्वजनिक शौचालयाचा परिसर स्वच्छ करण्यात येणार आहे. सार्वजनिक शौचालयास विजेची व मुबलक पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सार्वजनिक शौचालयाची देखभाल व दुरुस्तीसाठी कर्मचाऱ्यांची नेमणुक करण्यात आलेली आहे. ओ.डी. स्पॉटचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे.
            ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानाच्या कालावधीत नागरिक, सेवाभावी संस्था, व घटकांनी शक्य त्या ठिकाणी दररोज श्रमदानाने स्वच्छता करावी जेणेकरुन शहरातील प्रत्येक कानाकोपरा स्वच्छ झाल्याचे दृश्य पहावयास मिळेल, असे आवाहन जिल्हा प्रशासन अधिकारी (नपाप्र), हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

*****

No comments: