प्रलंबित सर्व महसुली दाव्यांचा अभियानात समावेश
आतापर्यंत 13 प्रकरणे तडजोडीने निकाली
नागरिकांनी अभियानात सहभागी होण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन
हिंगोली, दिनांक 14 (जिमाका): समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय आणि हक्क पोहोचविणे क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या विचारांचे मूळ सूत्र होते. शेतकऱ्यांसाठी त्यांनी केलेले काम अमिट आहे. त्यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणे जलद गतीने, तडजोडीने निपटारा करण्यासाठी महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. तरी आपापसातील तडजोडीने, सहमतीने प्रकरणे निकाली काढण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
अभियान 01 सप्टेंबर 2026 पासून सुरू झाले आहे. मार्च 2027 पर्यंत ते राबविण्यात येणार आहे. मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) व अपर जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी यांच्या अर्धन्यायिक न्यायालयांत प्रलंबित सर्व महसुली दाव्यांचा, समावेश करण्यात आलेला आहे. तडजोडी, आपापसातील संमतीने जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 13 प्रकरणे निकाली निघाली आहेत. यामध्ये अपर जिल्हाधिकारी यांच्या अर्धन्यायिक न्यायालयात चार, हिंगोली तहसील अंतर्गत पाच आणि कळमनुरी येथे चार असे एकूण 13 प्रकरणे होती.
डिग्रसवाणी येथील शेख नसीर शेख सत्तार विरुद्ध शेख बब्बी शेख हबीब, सेनगाव तालुक्यातील सुलदलीतील ज्ञानबा शिंदे विरुद्ध श्रीराम शिंदे, लक्ष्मीबाई बलखंडे विरुद्ध कोंडबा बलखंडे, सेनगाव तालुक्यातील उटी पूर्णा येथील त्र्यंबक गडदे विरुद्ध बाबाराव गडदे यांची प्रकरणे तडजोडीच्या आधारे निकाली काढण्यात आल्याचे अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी सांगितले.
रस्त्यांच्या प्रकरणांमध्ये हिंगोली तहसीलदार यांच्याकडून तडजोडीअंती पाच प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामध्ये वरुड गवळी येथील प्रकाश जगताप विरुद्ध साहेबराव शिंदे व इतर, प्रकाश बेंगाळ व शशिकलाबाई बेंगाळ व इतर, कनेरगाव नाका येथील गट क्रमांक सात मधील प्रकाश इंगोले विरुद्ध गौतम भिसे, चारठाणा येथील धम्मपाल कांबळे विरुद्ध प्रेमनाथ कांबळे, साटंबा येथील वहिवाटीचा रस्ता खुला करून देण्याबाबतचा सोपान तपासे विरुद्ध रुस्तुमा घ्यार यांची प्रकरणे तडजोडीअंती अंतिम निकाली काढल्याचे तहसीलदार श्रीकांत भूजबळ यांनी सांगितले.
कळमनुरी येथील अर्धन्यायिक प्रकरणात कळमनुरी तहसील कार्यालयांतर्गत सुरेश अमिलकंठवार विरुद्ध बापुराव हेंद्रे, राजू हेंद्रे, रमेश हेंद्रे तर वाकोडी मंडळ विभागांतर्गत येहळेगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक विरुद्ध प्रवीण मुधोळ, स्वाती मुधोळ, श्रुधा मुधोळ, बापुराव मुधोळ, चक्रधर मुधोळ ही तीन वेगवेगळी प्रकरणे तडजोडीअंती निकाली काढण्यात आल्याचे तहसीलदार जे.के कांबळे म्हणाले.
अशी आहे अभियानाची कार्यपद्धती
अर्धन्यायिक न्यायालयात, कार्यालयात महसुली दावा प्रलंबित असेल तेथे दोन्ही पक्षकार यांनी किंवा त्यांच्या वकिलांमार्फत विहित नमुन्यात तडजोडीसाठी अर्ज सादर करावा. प्राप्त अर्जांची छाननी करुन दोन्ही पक्षांच्या संमतीची खात्री केली जाईल व त्यांच्याकडून कायदेशीर तडजोडनामा प्राप्त करून घेण्यात येते. निश्चित केलेल्या लोक अदालतीच्या दिवशी दोन्ही पक्षांच्या सहमतीने प्रलंबित दाव्यावर अंतिम आदेश पारित करून प्रकरण कायमस्वरूपी निकाली काढण्यात येते.
*****
No comments:
Post a Comment