जनजातीय गौरव सेवा सप्ताहानिमित्त कळमनुरीत विविध उपक्रम
प्रकल्प अधिकारी डॉ. सुनील बारसे यांच्या हस्ते धनादेश प्रदान
हिंगोली, दिनांक १४ (जिमाका) : भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त आयोजित जनजातीय गौरव सेवा सप्ताहांतर्गत आदिवासी महिला बचत गटांना आर्थिक सक्षमीकरणासाठी धनादेशांचे वितरण (ता. १३) करण्यात आले.
कळमनुरी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी डॉ. सुनील बारसे यांच्या हस्ते बचत गटांच्या प्रतिनिधींना धनादेश प्रदान करण्यात आले.यावेळी लेखाधिकारी श्री. हिबारे आणि कार्यालय अधीक्षक श्री. भानुपारे उपस्थित होते.
आदिवासी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि आर्थिक स्वावलंबनाला चालना देणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. बचत गटांच्या माध्यमातून महिलांना उद्योग व व्यवसायासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.
क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान हिंगोली जिल्ह्यात जनजातीय गौरव सेवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहांतर्गत कळमनुरी प्रकल्प कार्यालयाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये आदिवासी स्मारकांची स्वच्छता व दीपोत्सव, जात प्रमाणपत्रांचे वाटप, वनहक्क पट्टेधारकांना योजनांचे लाभ आणि आरोग्य तपासणी शिबिरांचा समावेश आहे.
भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त रविवारी विविध कार्यक्रम
भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त रविवार, १५ नोव्हेंबर रोजी प्रभातफेरी, व्याख्यान, पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम आणि शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहाचे ऑनलाइन उद्घाटन होईल. सप्ताहाच्या माध्यमातून आदिवासी समाजाचे योगदान, संस्कृती, परंपरा आणि हक्कांविषयी जनजागृती करण्यासह विविध शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात येत आहे, असे श्री. बारसे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment