बालकांच्या सुरक्षित, आनंदी आणि उज्ज्वल भविष्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन
हिंगोली दि.१४ नोव्हेंबर : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या बालदिनानिमित्त हिंगोली येथील सरस्वती मुलींचे निरीक्षणगृह व बालगृह, सावरकर नगर तसेच श्री स्वामी समर्थ बालगृह, खानापूर चित्ता येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातून बालकांना त्यांचे हक्क, अधिकार, बालसंरक्षण आणि सर्वांगीण विकासाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी बालकांना भारतीय संविधानाने दिलेला समानतेचा व सन्मानाने जगण्याचा अधिकार, शिक्षण, आरोग्य, पोषण, संरक्षण, विकास आणि सहभागाच्या अधिकारांची माहिती देण्यात आली. बालकांना भेदभाव, शोषण, अत्याचार, बालमजुरी व बालविवाह यांपासून संरक्षण मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क असल्याचे सांगण्यात आले. तसेच स्वतःचे मत व्यक्त करणे, निर्णय प्रक्रियेत सहभागी होणे आणि सुरक्षित वातावरणात शिक्षण घेऊन स्वप्ने साकार करण्याची संधी मिळणे आवश्यक असल्याचे अधोरेखित करण्यात आले.
बालकांच्या हक्कांचे संरक्षण करणे ही शासनासोबतच पालक, बालसंगोपन संस्था आणि समाजातील प्रत्येक घटकाची सामूहिक जबाबदारी आहे. बालकांना कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी चाइल्ड हेल्पलाइन १०९८ या टोल फ्री क्रमांकावर मदत मागता येते, याबाबतही माहिती देण्यात आली. प्रत्येक बालकाला प्रेम, आपुलकी, सुरक्षितता, शिक्षण आणि सन्मान मिळावा, तसेच संस्थेतील बालकांचा आत्मविश्वास वाढवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमास बाल कल्याण समितीचे अध्यक्ष सुधाकर इंगोले, सदस्य बाली भोसले, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, सामाजिक कार्यकर्ते रामप्रसाद मुडे, चाइल्ड हेल्पलाइन १०९८ चे पर्यवेक्षक श्रीकांत वाघमारे, केस वर्कर तथागत इंगळे, निरीक्षणगृह व बालगृह अधीक्षक शंकर घ्यार, काळजीवाहक संगीता भांदुर्गे व रमेश पवार यांच्यासह दोन्ही बालगृहांतील बालक व बालिका मोठ्या उत्साहाने उपस्थित होते.
बालकांच्या हक्कांविषयी जनजागृती करणे, त्यांना आनंदी व सुरक्षित बालपणाचा अनुभव देणे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करणे, या उद्देशाने आयोजित हा बालदिन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
No comments:
Post a Comment