05 August, 2026

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून जिल्हा संसाधन व्यक्ती पदासाठी 31 ऑगस्‍टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 5 : आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (पीएमएफएमई) राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत राज्य नोडल एजन्सीमार्फत जिल्हास्तरावर लाभार्थ्यांना पाठपुरावा व हाताळणी सहाय्य देण्यासाठी जिल्हा संसाधन व्यक्ती यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दि. 31 ऑगस्ट 2026 पर्यंत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, कळमनुरी रोड, हिंगोली येथे प्रत्यक्ष अथवा पोस्टाने सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे यांनी केले आहे.

या पदासाठी उमेदवार हा सर्व प्रकारच्या पदाधिकाऱ्यांना व जटिल प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे ज्ञान व अनुभव असलेला असावा. अन्न प्रक्रिया उद्योगातील तंत्रज्ञान विकास, नवीन उत्पादन विकसित करणे, उत्पादनाच्या गुणवत्तेची हमी, अन्न सुरक्षा याबाबतचे ज्ञान असणे आवश्यक आहे. संबंधित उमेदवारास अन्न प्रक्रिया उद्योगातील किमान 3 ते 5 वर्षांचा अनुभव किंवा बँकिंग क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. याची  एकूण 12 पदे भरावयाची आहेत.

निवड झालेल्या संसाधन व्यक्तींमार्फत प्रत्येक लाभार्थ्यांना बँक कर्ज मिळवून देण्याच्या दृष्टीने सहाय्य करण्यात येणार आहे. त्यांनी केलेल्या सहाय्यानुसार मोबदला देण्यात येईल. मंजुरीनंतर प्रत्येक बँक कर्जासाठी 20 हजार रुपयापर्यंत मोबदला देण्यात येणार असून, त्यापैकी 50 टक्के रक्कम बँक कर्ज मंजुरीनंतर आणि उर्वरित 50 टक्के रक्कम संबंधित उद्योगास उद्योग आधार, जीएसटी नोंदणी, आधार नोंदणी, एफएसएसएआयची उत्पादन मानके पूर्ण करणे, उद्योगाची कार्यवाही तसेच लाभार्थ्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर अदा केली जाणार आहे.

योजनेच्या मार्गदर्शक सूचना, सविस्तर पात्रता, पारिश्रमिक व इतर अटी व शर्ती www.pmfme.mofpi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. इच्छुक पात्र उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे. 

******

04 August, 2026

भारत सरकार शिष्यवृत्तीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्याध्यापक व प्राचार्यांची कार्यशाळा संपन्न

 

• महाडीबीटीवरील अडचणी दूर करून पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देण्याच्या सूचना


हिंगोली (जिमाका), दि. 4 : हिंगोली जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सन 2026-27 या शैक्षणिक वर्षात भारत सरकार शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यासाठी महाडीबीटी संकेतस्थळावर अर्ज करताना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील सर्व विद्यालये, कनिष्ठ महाविद्यालये व वरिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांची कार्यशाळा आज (दि. 4) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, हिंगोली येथील सभागृहात आयोजित करण्यात आली होती.

या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपअधीक्षक डॉ. अभिजीत पाटील, पोलीस निरीक्षक श्रीमती सुनिता शिंदे, सहायक संचालक तथा सहायक सरकारी अभियोक्त्या श्रीमती देवयानी सरदेशपांडे, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक प्रदीप धर्माधिकारी आणि बार्टीचे जिल्हा प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोवंदे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सहाय्यक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे यांनी भारत सरकार शिष्यवृत्तीची शंभर टक्के प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संस्थास्तरापासून जिल्हास्तरापर्यंत नियोजनबद्ध कार्यवाही करण्याची आवश्यकता व्यक्त केली. यासाठी पात्र लाभार्थ्यांचे मॅपिंग व नोंदणी, आधार व बँक खाते संलग्नता, संस्थास्तरीय उत्तरदायित्व, जनजागृती व मदत केंद्रे, त्रुटी निवारण तसेच नियमित देखरेख व आढावा या बाबींवर विशेष भर देण्यात आला.

पात्र विद्यार्थ्यांचे 100 टक्के मॅपिंग व नोंदणी

सर्व शासकीय, अनुदानित व खासगी शाळा-महाविद्यालयांमधील युडायस+ नुसार प्रवेशित अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचा आधार आधारित डेटाबेस तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मागील वर्षी शिष्यवृत्ती न मिळालेल्या अथवा अर्ज करता न आलेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांचा यावर्षी शंभर टक्के समावेश करण्याचे निर्देश देण्यात आले.

आधार व बँक खाते संलग्नतेवर भर

विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, बँक खाते व एनपीसीआय मँपींग किंवा आधार संलग्न करण्यासाठी भारतीय पोस्ट बँक तसेच स्थानिक बँकांच्या सहकार्याने विशेष शिबिरे आयोजित करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला तसेच बँक खात्याशी संबंधित त्रुटींमुळे विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित राहणार नाहीत, यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या.

शाळांचे मुख्याध्यापक, गट शिक्षण अधिकारी आणि महाविद्यालयांचे प्राचार्य यांच्यासाठी तालुका व जिल्हास्तरावर अनिवार्य कार्यशाळा आयोजित करण्यावर भर देण्यात आला. संस्थास्तरावर शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित ठेवणाऱ्या शाळा व महाविद्यालयांबाबत शिस्तभंगाची कारवाई तसेच एसएलए निश्चित करण्याबाबत माहिती देण्यात आली.

ग्रामीण, दुर्गम व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांपर्यंत शिष्यवृत्तीची माहिती पोहोचविण्यासाठी दवंडी, माहितीपत्रके तसेच डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. प्रत्येक महाविद्यालयात ‘शिष्यवृत्ती मदत केंद्र’ व हेल्पलाइन कार्यरत करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

महाडीबीटी पोर्टलवरील तांत्रिक अडचणी ओळखून त्यांचे तातडीने निराकरण करण्याबरोबरच मागील वर्षी अर्ज बाद झालेल्या कारणांचे वर्गीकरण करून त्या त्रुटींची पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.

शिष्यवृत्ती अर्जाच्या प्रगतीचा जिल्हास्तरावर दर सोमवारी आढावा घेण्यात येणार आहे. सर्व मुख्याध्यापक व प्राचार्यांनी शिष्यवृत्ती अर्जांची अद्ययावत माहिती दर सोमवारी सकाळी 10.30 वाजेपर्यंत समाज कल्याण कार्यालयास सादर करावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समतादूत सुरेश पठाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन वरिष्ठ लिपिक राजू ससाणे यांनी केले. कार्यशाळेस हिंगोली जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य तसेच महाविद्यालयातील शिष्यवृत्तीचे कामकाज पाहणारे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

****** 




शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आरोग्य सुविधांची जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केली पाहणी

 

मॉड्युलर ओटी, क्रिटिकल केअर ब्लॉक व कॅथ लॅबमधील कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना



हिंगोली (जिमाका), दि. 4 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज मंगळवार, (दि. 4) रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, हिंगोली येथे भेट देऊन रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांनी अत्याधुनिक शस्त्रक्रिया कक्ष, क्रिटिकल केअर ब्लॉक तसेच कॅथ लॅबच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाच्या प्रगतीची माहिती घेतली.

या पाहणीदरम्यान काही कामे व आवश्यक दुरुस्तीची बाब निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश जोशी यांना संबंधित कामांमध्ये आढळलेल्या त्रुटींची तातडीने दुरुस्ती करून घेण्याचे निर्देश दिले. रुग्णालयातील वैद्यकीय सुविधा सुरळीतपणे आणि सुरक्षितपणे कार्यान्वित होण्यासाठी आवश्यक ती कामे विलंब न करता पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.


कॅथ लॅब व क्रिटिकल केअर ब्लॉकसाठी विद्युत सुविधांना प्राधान्य


कॅथ लॅब तसेच क्रिटिकल केअर ब्लॉकच्या कार्यान्वयनासाठी अखंडित व पुरेसा विद्युत पुरवठा अत्यंत आवश्यक असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतही संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले. कार्यकारी अभियंता, विद्युत विभाग यांना कॅथ लॅब व क्रिटिकल केअर ब्लॉक येथे तातडीने ट्रान्सफॉर्मर बसविण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

या सुविधांमुळे जिल्ह्यातील रुग्णांना हृदयविकार तसेच गंभीर स्वरूपाच्या आजारांवर आवश्यक उपचार स्थानिक पातळीवर उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार व अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा वेळेत पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

****** 








महाडीबीटी 2.0 पोर्टलवर शिष्यवृत्ती अर्जासाठी विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी

 

विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट शिष्यवृत्तीची रक्कम जमा होणार


हिंगोली (जिमाका), दि. 4 : महाराष्ट्र राज्यातील विविध विभाग तसेच इतर मागास विभागामार्फत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यासाठी महाडीबीटी 2.0 ही नवीन प्रणाली शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार असून, शिष्यवृत्तीची लाभाची रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. 

महाडीबीटी 2.0 पोर्टलवर मॅट्रिकोत्तर व मॅट्रिकपूर्व अशा विविध शिष्यवृत्ती व शुल्क प्रतिपूर्ती योजनांचा समावेश करण्यात आला आहे. मॅट्रिकोत्तर योजनांमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी निर्वाह भत्ता, तसेच विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण व परीक्षा शुल्क योजनांचा समावेश आहे.

मॅट्रिकपूर्व योजनांमध्ये इयत्ता 5 वी ते 9 वीमधील इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, इयत्ता 8 वी ते 10 वीतील विद्यार्थ्यांसाठी तसेच अनुसूचित जाती व विमुक्त जाती-भटक्या जमाती प्रवर्गातील मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, सैनिक शाळेतील प्रशिक्षण योजना, माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिष्यवृत्ती, तसेच पीएम-यशस्वी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती यांचा समावेश आहे.

महाडीबीटी 2.0 पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी महा आयडी नव्याने तयार करणे बंधनकारक आहे. मागील पोर्टलवरील युजर आयडी व पासवर्ड यापुढे ग्राह्य राहणार नाही. विद्यार्थ्यांनी आधार क्रमांकासोबत आधार पोर्टलवर नोंदणीकृत मोबाईल क्रमांक, ई-मेल व बँक खात्याची अद्ययावत माहिती ठेवावी. तसेच जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र व शैक्षणिक गुणपत्रके आदी आवश्यक कागदपत्रे पीडीएफ स्वरूपात तयार ठेवावीत. 

नूतनीकरणाच्या तसेच नवीन अर्जासाठी नवीन महा आयडी आधार लॉगिन करणे आवश्यक असून, नूतनीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी लॉगिन केल्यानंतर ‘माझा अर्ज नूतनीकरण करा’ हा पर्याय निवडावा.

महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना महाडीबीटी 2.0 पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी व अर्ज करण्यासाठी आवश्यक सहकार्य करावे. विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या वेळी आकारण्यात येणारे शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क, पात्र योजनांनुसार शासनाकडून मिळणाऱ्या शुल्क प्रतिपूर्तीच्या रकमेच्या अनुषंगाने आकारावे.

महाविद्यालयांनी आपले नाव, अभ्यासक्रम, अभ्यासक्रमांची मान्यता, प्रवेश क्षमता तसेच विविध आदेश शुल्क रचना इत्यादी माहिती पोर्टलवर अचूकपणे मॅप करून घेणे आवश्यक आहे. 

महाडीबीटी 2.0 पोर्टलवर महाविद्यालयांसाठी उपलब्ध असलेल्या एकमेव लॉगिनद्वारे महाविद्यालयाच्या प्रणालीमध्ये प्रवेश करता येणार आहे. जुन्या लॉगिन पासवर्डबाबत अडचण असल्यास संबंधित शैक्षणिक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर आधार आधारित लॉगिन करून आवश्यक माहिती भरावी. लॉगिन केल्यानंतर पात्र योजनांची यादी उपलब्ध होईल. विद्यार्थ्यांनी संबंधित योजनेसमोरील 'अप्लाय'वर क्लिक करून शैक्षणिक व आवश्यक कागदपत्रांची माहिती भरून अर्ज ऑनलाइन सादर करावा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्जाची प्रत प्रिंट अथवा पीडीएफ स्वरूपात जतन करून ठेवावी. 

विद्यार्थ्यांनी आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, शैक्षणिक गुणपत्रिका तसेच आधार संलग्न बँक खात्याची माहिती अद्ययावत ठेवावी. विशेषतः शिष्यवृत्तीची रक्कम थेट आधार संलग्न बँक खात्यात जमा होणार असल्याने एनपीसीआय मँपींग वा आधार संलग्न पूर्ण असणे आवश्यक आहे.

महाडीबीटी 2.0 पोर्टलच्या वापराबाबत अडचण आल्यास विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयाशी संपर्क साधावा. तांत्रिक अथवा प्रशासकीय अडचणींसाठी पोर्टलवर लॉगिनमधून स्क्रीनशॉटसह तक्रार नोंदविण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

महाडीबीटी 2.0 पोर्टलवर विद्यार्थ्यांनी वेळेत नोंदणी करून पात्र शिष्यवृत्ती योजनांसाठी अर्ज करावा, असे आवाहन सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, हिंगोली यांच्यामार्फत करण्यात आले आहे. 

******

प्रस्तावित एमआयडीसी क्षेत्रांच्या विकासासाठी तातडीने पाठपुरावा करा- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 

100 हेक्टर क्षेत्रावर लॉजिस्टिक पार्क उभारणीची शक्यता तपासण्याच्या जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या सूचना


हिंगोली (जिमाका), दि. 4 : जिल्ह्यात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी प्रस्तावित एमआयडीसी क्षेत्रांच्या विकासाबाबत आवश्यक तो पाठपुरावा करून प्रक्रिया गतिमान करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्ह्यातील प्रस्तावित अतिरिक्त हिंगोली एमआयडीसी अंतर्गत मौजे वारंगा फाटा, दाभाडी व कुर्तडी येथील सामायिक क्षेत्रातील 432.26 हेक्टर जमीन प्रस्तावित आहे. तसेच मौजे कामठा, येलकी, जरोडा व डोंगरगाव पूल येथील सामायिक क्षेत्रातील 205-79 हेक्टर जमीन एमआयडीसीसाठी प्रस्तावित आहे. या दोन्ही प्रस्तावित क्षेत्रांच्या विकासासाठी आवश्यक ती कार्यवाही व पाठपुरावा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या.

यासोबतच जिल्ह्यातील औद्योगिक विकासाच्या दृष्टीने सुमारे 100 हेक्टर क्षेत्रावर लॉजिस्टिक पार्क उभारता येईल का, याची शक्यता तपासून त्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी नांदेड येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विभागीय अधिकाऱ्यांना दिल्या. प्रस्तावित दोन्ही एमआयडीसी क्षेत्रांबाबत संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करून नियमित पाठपुरावा करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

या पाहणी दौऱ्यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अनिल कदम, व्यवस्थापक रविंद्र पत्की, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाच्या भूमापक श्रीमती एस. व्ही. फड तसेच संबंधित गावांचे तलाठी उपस्थित होते.


येलकी येथील सशस्त्र सीमा दलाच्या बटालियनला भेट


या दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी कळमनुरी तालुक्यातील येलकी येथील 16 वी बटालियन सशस्त्र सीमा दलाला भेट देऊन पाहणी केली.

त्यानंतर त्यांनी कळमनुरी येथील नमो गार्डनला भेट देऊन वृक्षारोपण केले. तसेच ढोलक्याची वाडी येथील व्यायामशाळेला भेट देऊन पाहणी केली. कळमनुरी ते ढोलक्याची वाडी या रस्त्याचीही त्यांनी पाहणी करून रस्त्याच्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

जिल्ह्यात औद्योगिक पायाभूत सुविधा विकसित करण्यासोबतच विविध विकासकामांना गती देण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी दिले.

****** 








वसमत येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कंत्राटी शिल्प निदेशक पदांसाठी 10 ऑगस्टपर्यंत अर्जाचे आवाहन

 


हिंगोली (जिमाका), दि. 4 : स्वातंत्र्यसेनानी गंगाप्रसाद अग्रवाल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वसमतनगर, जि. हिंगोली येथे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप योजनेअंतर्गत तसेच संस्था व्यवस्थापन समितीमार्फत नव्याने संलग्नता प्राप्त झालेल्या व्यवसायांमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी कंत्राटी पद्धतीने 11 महिन्यांच्या सेवा करारावर शिल्प निदेशकांची पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

या भरतीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग आणि कॉस्मेटोलॉजी या व्यवसायांसाठी शिल्प निदेशकांची पदे उपलब्ध आहेत. 

इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक पदासाठी संबंधित क्षेत्रातील अभियांत्रिकी पदवी व अनुभव, तीन वर्षांची इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन किंवा संबंधित पदविका व अनुभव अथवा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक ट्रेडमधील एनटीसी/एनएसी तसेच संबंधित अनुभव अशी शैक्षणिक व अनुभवाची पात्रता नमूद करण्यात आली आहे.

कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट पदासाठी कॉम्प्युटर सायंस, आयटी किंवा संबंधित क्षेत्रातील पदवी/पदव्युत्तर पदवी, पदविका, पीजीडीसीए तसेच संबंधित अनुभव किंवा कोपा (COPA) अथवा आय-आयटीज क्षेत्रातील संबंधित ट्रेडमधील एनटीसी/एनएसी व अनुभव अशी पात्रता निश्चित करण्यात आली आहे.

रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग पदासाठी मेकानिकल इंजिनिअरींग मधील पदवी अथवा पदविका व संबंधित अनुभव किंवा मेकानिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर ट्रेडमधील एनटीसी/एनएसी आणि संबंधित अनुभव आवश्यक आहे. कॉस्मेटोलॉजी पदासाठी संबंधित क्षेत्रातील पदवी किंवा ब्युटी कल्चरल/ कॉस्मेटोलॉजी मधील पदविका व संबंधित अनुभव अथवा संबंधित ट्रेडमधील एनटीसी/एनएसी व अनुभव आवश्यक आहे.

सर्व पदांसाठी डीजीटी अंतर्गत नॅशनला क्रॉफ्ट इन्स्ट्रक्चर सर्टीफिकेट (एनसीआयसी) ची संबंधित रेग्यूलर/आरपीएल आवृत्ती ही आवश्यक पात्रता असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

ही पदे तात्पुरत्या स्वरूपाची असून 11 महिन्यांच्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात येणार आहे. उमेदवारास संगणकीय ज्ञान असणे आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवारास रुपये 100 च्या बॉण्डवर विहित नमुन्यात सेवा करारनामा करून द्यावा लागणार आहे. विभागाकडून विहित मार्गाने नियमित उमेदवार उपलब्ध झाल्यास कंत्राटी नियुक्ती रद्द करण्यात येईल.

उमेदवाराची रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राकडे नोंदणी असणे आवश्यक आहे. पदे भरणे अथवा न भरणे तसेच पदांची संख्या कमी किंवा अधिक करण्याचा अधिकार संस्था व्यवस्थापन समितीने राखून ठेवला आहे. 

इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज (बायोडाटा), शैक्षणिक पात्रता व अनुभवाच्या मूळ कागदपत्रांच्या स्वाक्षांकित दोन प्रती आणि दोन पासपोर्ट आकाराचे फोटो यांसह दि. 10 ऑगस्ट 2026 पर्यंत अध्यक्ष तथा सचिव, संस्था व्यवस्थापन समिती, स्वातंत्र्यसेनानी गंगाप्रसाद अग्रवाल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वसमतनगर, जिल्हा हिंगोली येथे विहित वेळेत अर्ज सादर करावा. 

विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. अर्ज प्राप्त झालेल्या पात्र उमेदवारांना दि. 11 ऑगस्ट 2026 रोजी मुलाखतीसाठी बोलाविण्यात येणार आहे. 

अधिक माहितीसाठी संबंधित शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वसमतनगर येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य एस.एल. कोंडावार यांनी केले आहे.

******

खरीप हंगाम पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करावेत

 


मूग व उडीद पीक स्पर्धेसाठी अर्ज करण्यास 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ


हिंगोली (जिमाका), दि. 4 : राज्यात पीक उत्पादकता वाढविण्यासाठी विविध प्रयोग करणाऱ्या व उत्कृष्ट उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागामार्फत दरवर्षी पीक स्पर्धा आयोजित करण्यात येते. खरीप हंगाम 2026 साठी अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांची पीक स्पर्धा जाहीर करण्यात आली असून, शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

खरीप हंगाम 2026 पासून पीक स्पर्धेचे अर्ज स्वीकारण्यासाठी स्वतंत्र ऑनलाइन संगणक प्रणाली सुरू करण्यात आली आहे. प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि गतिमानता आणण्याच्या उद्देशाने ही ऑनलाइन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या स्पर्धेत तालुका, जिल्हा आणि राज्य अशा तीन स्तरांवर स्पर्धक शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.

खरीप हंगामातील भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल या एकूण 11 पिकांसाठी पीक स्पर्धा घेण्यात येणार आहे. सर्वसाधारण तसेच आदिवासी गटातील शेतकऱ्यांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.

पीक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावावर जमीन असणे व तो स्वतः त्या जमिनीची लागवड करीत असणे आवश्यक आहे. एका वेळी एका पिकासाठीच स्पर्धेत सहभागी होता येईल. तसेच संबंधित पिकाखाली स्वतःच्या शेतात किमान 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.


मूग व उडीदसाठी 10 ऑगस्टपर्यंत अर्जाची संधी


मूग व उडीद पिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख यापूर्वी  31 जुलै 2026 निश्चित करण्यात आली होती. मात्र, यावर्षी प्रथमच पीक स्पर्धेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येत असल्याने ‘एक वेळची विशेष बाब’ म्हणून मूग व उडीद पिकांसाठी अर्ज करण्यास 10 ऑगस्ट 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल या पिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 ही आहे.

पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी प्रवेश शुल्क 300 रुपये, तर आदिवासी गटासाठी 150 रुपये राहणार आहे. स्पर्धेत विजेत्या शेतकऱ्यांना तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर बक्षिसे देण्यात येणार आहेत.

तालुकास्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे 5 हजार, 3 हजार व 2 हजार रुपये, जिल्हास्तरावर 10 हजार, 7 हजार व 5 हजार रुपये, तर राज्यस्तरावर अनुक्रमे 50 हजार, 40 हजार व 30 हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.

पीक स्पर्धेसाठी अर्ज करताना जमीन ओळखपत्र, निर्धारित प्रवेश शुल्क भरल्याची चलन/पावती, जात प्रमाणपत्र (आदिवासी असल्यास) आणि बँक खाते चेक/पासबुक तपशील आवश्यक आहे.

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कृषी विभागाच्या संकेतस्थळावरील ‘पीक स्पर्धा’ टॅबवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. पीक स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. 

*****