03 March, 2025
पारंपरिक क्रीडा महाकुंभाचे आयोजन
हिंगोली (जिमाका), दि. ०३ : राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाअंतर्गत राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून यावर्षीपासून राज्यातील शासकीय तसेच खाजगी आयटीआयमधील विद्यार्थ्यासाठी पारंपरिक क्रीडा महाकुंभाचे दि. २ ते ५ मार्च दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.
राज्यातील सर्व आयटीआयमध्ये शिवकालीन, पारंपारिक, मैदानी खेळाचे आयोजन मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झालेले आहेत. तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून पारंपारिक क्रीडा महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
या क्रीडा महाकुंभामध्ये मुलामुलीसाठी वैयक्तीक तसेच सांघिक स्वरुपात पंजा लढविणे, दंडबैठक, दोरीच्या उड्या, पावणखिंड दौड, लेझीम, लगोरी, लंगडी, रस्सीखेच, फुगडी, विटीदांडू हे शिवकालीन व पारंपारिक खेळ व त्यासोबत कबड्डी व खो-खो या प्रसिध्द मैदानी खेळांचा अंतर्भाव केलेला आहे. हा क्रीडा महाकुंभ दि. ०२ मार्च ते ०३ मार्च जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय आयटीआय स्तरावर आयोजित करण्यात आला तर ४ व ५ मार्च जिल्हास्तरावर आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील पारंपरिक खेळ हे त्या-त्या गावातील संस्कृतीचे आणि तेथील रुढी परंपरांचे प्रतीक आहेत. परंतु आज हे सर्व खेळ आपण विसरलो आहोत. आज जगात पारंपरिक आणि स्थानिक खेळ पर्यटनाचे आकर्षण असताना महाराष्ट्रात मात्र आपण त्याचा यादृष्टीने विचार केलेला नाही. आपल्या खेळामुळे जगभरातील पर्यटन आकर्षित होऊ शकतात ही संधी आपण घेतली पाहिजे. आपल्या विभागाने हे पहिले पाऊल उचललेले आहे आपण त्याचे स्वागत करुया, या पारंपरिक क्रीडा महाकुंभात सहभागी होऊ या. त्याला यशस्वी करुया. क्रीडा महाकुंभाच्या माध्यमातून एवढेच म्हणता येईल. "गुंफुनी स्वदेशी खेळाची माळ, जोडूया भारतीय संस्कृतीशी नाळ" हे ब्रीदवाक्य घेऊन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पुढाकाराने या अभिनव स्पर्धेचे आयोजन तालुकानिहाय शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हिंगोली, सेनगाव, कळमनुरी, वसमतनगर, औंढा येथे व जिल्हास्तरावर औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हिंगोली येथे आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी हिंगोली यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment