06 March, 2025
लोकगीत, भीमगीतांनी हिंगोलीकर रसिक मंत्रमुग्ध
हिंगोली (जिमाका), दि. 06 : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने येथील शिवाजीराव देशमुख सभागृहात आयोजित लोकसंगीत महोत्सवात बुधवार, दि. 5 मार्च रोजी सायंकाळी 7 ते 10 या वेळेत झालेल्या कार्यक्रमात गायिका संज्योती जगदाळे, गायक कुणाल वराळे, शाहीर मिरा उमप व गायिका श्रावणी महाजन आणि सहकाऱ्यांनी गायिलेल्या अभंग, गवळण, लावणी, लोकगीत, व भीमगीतांनी हिंगोलीकर रसिक मंत्रमुग्ध झाले.
गायक कुणाल वराळे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील 'महाराष्ट्र गीताने' या कार्यक्रमास प्रारंभ झाला. त्यानंतर गायिका संज्योती जगदाळे यांनी जाधवांची कन्या ती धन्य जिजाऊ माऊली l भोसल्याची सावली भोसल्याची सावली l, हे माँ जिजाऊ साहेबांची महती गाणारे गीत सादर केले. त्यानंतर बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल हा अभंग, उगवली शुक्राची चांदणी, कुठं कुठं जायाचं हनिमूनला या लावण्या, चांदणं चांदणं झाली रात, एकविरेची पाहत होते वाट हे लोकगीत अशी गाणी सादर केली.
गायक कुणाल वराळे आणि सहकाऱ्यांनी एका सकाळी शिवनेरीला l जिजाऊच्या कुशीतून आला l हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माचे वर्णन करणारे गीत सादर केले. त्यानंतर अंधाराची संधी साधून येशील का ?, मनी भरली ही मैना l याला झोप येईना हे लोकगीत, लल्लाटी भंडार हा जोगवा अशी बहारदार गाणी सादर केली.
मराठवाड्याच्या प्रसिद्ध लोकगायिका मिराबाई उमप आणि सहकाऱ्यांनी रूप सुंदर सुकुमार बाई हे गीत व केसारी फणी ग मैना काळी पोत फणी घे हे गीत सादर केले. तर निकिता कांबळे व कविता कांबळे यांनी ‘धन्य धन्य थोर आई, शिवरायांची जिजाई मुजरा मानाचा मानाचा जिजाईला’ हे मा जिजाऊ साहेबांची महती गाणारे गीत सादर केले.
त्यानंतर श्रावणी महाजन यांनी बिलनशी नागिन निघाली, नागोबा डुलायला लागला हे लोकप्रिय गीत, नवरी नटली, काळुबाई सुपारी फुटली अशी लोकगीते सादर केली. तर कुणाल वराळे आणि श्रावणी महाजन यांनी दादा कोंडके यांच्या लोकप्रिय गीतांची मेलेडी सादर केली. त्यामध्ये माळ्याच्या मळ्या मंदी कोण गं उभी, हिल पोरी हिला, वर ढगाला लागली कळ अशी द्वंद गीते सादर केली. कुणाल वराळे यांनी गायलेल्या गुलामी का गया जाल l ये है मेरे भीम का कमाल l या लोकप्रिय भीम गीताने या कार्यक्रमाचा समारोप झाला.
या गायकांना अंकुश बोरुडे, अनिकेत गवळी, विजयेंद्र मिमरोट, कुणाल वानखेडे, रोहित बनस्वाल अशी संगीत साथ दिली. या सर्व कलावंतांचा सहाय्यक संचालक संदिप बलखंडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास हिंगोली शहर व जिल्ह्यातील लोकसंगीत रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment