08 March, 2025

महिलांनी अधिक सक्षम होण्यासाठी चांगल्या पद्धतीने व्यवसाय करावा -आमदार तान्हाजी मुटकुळे

* जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन हिंगोली (जिमाका),दि.०८ : महिला बचत गटांना शासन शून्य टक्के व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे महिलांनी अधिक सक्षम होण्याकरिता व्यवसाय चांगल्या पद्धतीने करावा. जेणेकरून ग्राहक संतुष्टीवर तुमचा व्यवसाय हा यशस्वी होतो आणि त्यापासून तुम्हाला बऱ्याच प्रमाणात आर्थिक लाभ होऊ शकतो आणि तुमचं कुटुंब आणि देशही यातून सक्षम होऊ शकते, असे मत आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी महिला बचत गटाच्या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. जागतिक महिला दिनानिमित्त महिला व बालविकास विभाग अंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत बचत गटाद्वारे उत्पादित वस्तूंचे जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन आज आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयाजी पाईकराव होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. राजेंद्र कदम, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी राजाभाऊ मगर, जिल्हा समन्वय अधिकारी विलास जगताप उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा समन्वयक अधिकारी विलास जगताप यांनी केले. तर सूत्रसंचालन सुनील चव्हाण यांनी केले. या प्रदर्शनामध्ये जवळपास 45 बचत गटाद्वारे विविध प्रकारचे साहित्य विक्रीस आले आहे. हे विक्री प्रदर्शन १० मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. शहरातील नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा आणि महिलांकडून घरगुती साहित्य विकत घ्यावे, असे आवाहनही विलास जगताप यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गजानन खिरोडकर, संकेत महाजन, संतोष ठाकूर, शेख रफिक , सर्व सीएमआरसी व्यवस्थापक, उपजीविका सल्लागार, लेखापाल व सर्व सहयोगिनींनी परिश्रम घेतले . ****

No comments: