शासनाच्या योजनाद्वारे महिलांचे सक्षमीकरण होणे आवश्यक
-
तहसीलदार
विजय अवधाने
हिंगोली, दि.30: राज्य शासन नेहमीच महिलांच्या सक्षमीकरणासाठी सकारात्मक दृष्टिकोन
ठेवून महिला स्वावलंबी व स्वयंपूर्ण व्हाव्यात, त्यांचा विकास व्हावा, त्यांना
जोमाने विकासकामांत सहभागी होता यावे. यासाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या
विविध योजनाद्वारे महिलांचे सक्षमीकरण होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन हिंगोली
तहसीलदार विजय अवधाने यांनी केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा
माहिती कार्यालय आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवाच्या
कालावधीत जिल्ह्यातील नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देवून जनजागृती
करण्याकरीता ‘संवाद पर्व’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने हिंगोली
येथील सिध्दीविनायक गणेश मंडळ येथे जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आयोजित ‘संवाद पर्व’ कार्यक्रमात तहसीलदार श्री. अवधाने बोलत होते. यावेळी उपविभागीय पोलिस
अधिकारी श्रीमती सुजाता पाटील, महिला व बाल विकास विभागाचे संरक्षण अधिकारी
एन.डी. मकासरे, जिल्हा
रुग्णालयाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री. कदम आणि
सिध्दीविनायक सिध्दीविनायक
सोसायटीचे अध्यक्ष कल्याण देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. अवधाने पुढे म्हणाले की, राज्य शासनामार्फत महिलांच्या कल्याणासाठी आणि
सक्षमीकरणांसाठी अनेक योजना राबविण्यात येतात. शासनाने महिलांसाठी सर्वसमावेशक असे महिला धोरण निश्चित केले असून या सर्व धोरणांमध्ये
प्रामुख्याने महिलावरील अत्याचार, हिंसा, महिला विषयक कायदे, आर्थिक दर्जात
सुधारणा, महिलांना केंद्रस्थानी ठेवून योजना तयार करणे, स्वंयसहाय्यता बचतगटांचा
विकास आदी बाबींचा विचार केला आहे. मुलींच्या साक्षरतेचे प्रमाण वाढविण्याकरीता
विविध योजनांसह कायदेही तयार करण्यात आलेले आहेत. महिला आर्थिक विकास महामंडळ आणि
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र यांच्या माध्यमातून महिलांना व्यवसायिक
शिक्षण-प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. महिला बचत गट, सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार
योजना आदी अशा विविध योजना महिलांना सक्षम करण्यासाठी वेगवेगळ्या विभागामार्फत राबविल्या जातात. आजच्या
आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कोणतीही माहिती सहज उपलब्ध होत असून, महिलांनी
या तंत्रज्ञानाच्या साह्याने सक्षम होणे काळाजी गरज बनली असल्याचेही श्री. अवधाने
म्हणाले.
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती सुजाता
पाटील म्हणाल्या की, आधुनिक आणि प्रगल्भ म्हणवणाऱ्या या युगात ही समाजात महिलांवर
होणारे अत्याचार आजही संपलेले नाहीत. हुंडाबळी, मानसिक व शारीरिक छळ, भेदभाव,
कौटूंबिक हिंसाचार आदींच्या माध्यमातून स्त्रीयांवर होणारे अन्याय, अत्याचार सुरूच
आहेत. याकरीता महिलांनी त्यांच्यासाठी असलेल्या कायद्याबाबत जागरुक होवून त्याचे
ज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे. कारण याद्वारेच महिलांना त्यांच्यावर होणाऱ्या
अत्याचाराविरुध्द वाचा फोडणे शक्य आहे. आज स्त्रियांनी स्वावलंबी होणं आवश्यक आहे. परंतू, त्यासाठी
कौटुंबिक आणि सामाजिक स्तरावर त्यांना पाठबळ मिळणं आवश्यक आहे. यावेळी
श्रीमती पाटील यांनी घडलेल्या विविध गुन्ह्याचे उदाहरण देत सजग राहण्याबाबत
नागरिकांना आवाहन केले.
जन्माला येण्यापूर्वी तसेच जन्मानंतर बालकांना पुरेशा सेवा
देण्याचे राष्ट्रीय धोरण आपल्या देशाने स्वीकारले आहे. या धोरणनुसारच बाल विकास
सेवा योजना मुलांचे सर्वांगीण विकासासाठी म्हणून आरोग्य, आहार व शिक्षण एकत्रितपणे
देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. महिला
आणि मुले यांच्यासाठी तळागाळपर्यंत पोहचलेला राज्यातील हा सर्वात मोठा कार्यक्रम
आहे. या कार्यक्रमातंर्गत पूरक पोषण आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी, सकस आहार विषयक
शिक्षण, शालेय पुर्व शिक्षण, व्यावसायीक प्रशिक्षण आदी महत्वाच्या योजना राबविल्या
जात असल्याची माहिती महिला
व बालविकास विभागाचे संरक्षण अधिकारी श्री. मकासरे यांनी यावेळी दिली.
यावेळी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा कार्यक्रम
अधिकारी उध्दव कदम यांनी राज्याच्या
अनेक भागात देहदान व अवयवदानाबाबत जागरुकता वाढत आहे. परंतु, सर्वसामान्यांच्या
मनात देहदान व अवयवदानावषियी अजूनही अनेक शंका असल्याने या सर्वश्रेष्ठ दानाबाबत
अजूनही जनजागृती होणे आवश्यक आहे. याकरिता वैद्यकिय
शिक्षण विभागाद्वारे सर्व सहकारी विभागासोबत यावर्षीही 29 व 30 ऑगस्ट, 2017 रोजी दोन दिवसाचे महाअवयवदान अभियान राबविण्यात येत आहे. अवयवदानाचे प्रकार समजून घेणे आवश्यक असून एक
म्हणजे जिवंतपणी करता येणारे आणि दुसरे मृत्युपश्चात केले जाणारे असे दोन प्रकारचे
अवयवदान करता येते अशी माहिती उध्दव कदम यांनी यावेळी दिली .
शासनाच्या विविध योजनांची माहिती
थेट सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी. योजनांबाबत असलेल्या शंकांचे निरसन व्हावे.
तसेच शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांची माहिती सामान्य
नागरिकांना मिळून त्यांना त्याचा लाभ घेता यावा या उद्देशाने माहिती जनसंपर्क
महासंचालनालयाच्या अधिनस्त जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने 'संवाद पर्व' हा
उपक्रम गणेशोत्सवाच्या कालावधीत राबविण्यात येत असल्याचे प्रास्ताविकात जिल्हा
माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांनी सांगितले.
कार्यक्रमास
उपस्थित नागरिकांनी प्रश्न विचारुन आपल्या शंकाचे निरसन करुन घेतले. यावेळी मोठ्या
संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.
****