01 August, 2017

राज्य शासनाच्या योजना, निर्णयाची माहिती देणारे
 ‘उर्दू लोकराज्य’ एकमेव मासिक
                                                                     -- जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी
हिंगोली, दि. 1 : अल्पसंख्याक समाजातील उर्दु भाषिक नागरिकांना शासनाच्या योजना, विविध उपक्रम, शासन निर्णय याची माहिती देणारे ‘उर्दू लोकराज्य’ हे एकमेव मासिक महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालयाच्यावतीने दरमहा प्रसिध्द करण्यात येते. शासनाच्या विविध योजना, उपक्रम, निर्णय याची माहिती व्हावी आणि त्याचा लाभ घेता यावा याकरीता हे मासिक अत्यंत उपयुक्त असून जास्तीत-जास्त उर्दु भाषिक नागरिकांनी ‘उर्दू लोकराज्य’ मासिकाचे वर्गणरीदार होण्याचे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांनी केले.
           येथील मौलाना आझाद उर्दु हायस्कूल आणि महाविद्यालय येथे उर्दु लोकराज्य मासिकाची माहिती जास्तीत-जास्त उर्दू वाचकापर्यंत पोहचवावी यासाठी आयोजित कार्यक्रमात जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी बोलत होते. यावेळी कार्यक्रमास मौलाना आझाद उर्दु हायस्कूल आणि महाविद्यालय मुख्याध्यापक अब्बास खान, अस्मा बाजी, अबेद, एहसान खान पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी सुर्यवंशी पुढे म्हणाले की, महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र ‘लोकराज्य’ हे मासिक दरमहा मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दु आणि गुजराथी या भाषेत प्रसिध्द करण्यात येते. या मासिकामध्ये राज्य शासनाने घेतलेले निर्णय, शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजना, अल्पसंख्यांकाच्या योजना, मंत्रीमंडळाचे निर्णय, महाराष्ट्राची ऐतिहासिक, भौगोलीक आणि सांस्कृतिक माहितीचा समावेश असतो. स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सामान्य ज्ञानात भर घालणारी अद्ययावत  माहिती मिळण्यास अत्यंत उपयुक्त मासिक आहे. उर्दू लोकराज्य मासिकाची वार्षिक वर्गणी फक्त 50 रुपये असुन वर्गणीदाराला वर्षभर अंक पोस्टाने घरपोच पाठविले जातात.  तसेच हे अंक बुक स्टॉलवर देखील विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. सर्व उर्दु भाषिक नागरिकांनी ‘उर्दु लोकराज्य’ मासिकाचे वर्गणीदार होण्याचे आवाहन यावेळी सुर्यवंशी यांनी केले.
           मौलाना आझाद उर्दु हायस्कूल आणि महाविद्यालयाचे मुख्याध्यापक अब्बास खान प्रास्ताविकात म्हणाले की, उर्दु लोकराज्य मासिक हे उर्दू भाषिक नागरिक आणि स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयोगी असून याची वार्षिक वर्गणी देखील अत्यंत माफक आहे. तरी जास्तीत-जास्त उर्दू भाषिक नागरिकांनी वर्गणीदार होवून शासनाच्या या उपक्रमाला सहकार्य करावे असेही ते यावेळी म्हणाले.
            यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थीनीना उर्दू लोकराज्यचे अंक भेट देण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा माहिती कार्यालयाचे अनिल चव्हाण आणि चंद्रकांत गोधणे यांच्यासह शिक्षक-कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थीनीची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

*****

No comments: