महसूल
विभाग प्रशासनाचा कणा
-- जिल्हाधिकारी अनिल भंडारी
हिंगोली,दि.1: शासनाच्या
सर्व नविन योजना या महसुल विभागामार्फत राबविण्यात येतात. त्यामुळे सर्व सामान्य
नागरिकांचे प्रश्न समजून घेवून त्या लवकरात-लवकर सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
सामान्य नागरिकांच्या प्रशासनाकडून अपेक्षा आहे म्हणूनच महसूल विभागाला प्रशासन
शासनाचा कणा मानले जाते असे प्रतिपादन अनिल भंडारी यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील डिपीडिसी सभागृहात आयोजित महसूल
दिनानिमीत्त ते बोलत होते. यावेळी जिल्हा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
डॉ. एच. पी. तुम्मोड, पोलिस अधिक्ष अरविंद चावरिया, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल
माचेवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण, उपजिल्हा निवडणुक अधिकारी गोविंद
रणवीरकर, नरेगा उपजिल्हाधिकारी खुदाबक्श् तडवी, उपविभागीय अधिकारी प्रशांत
खेडेकर, डॉ. ज्ञानोबा बानापूरे आणि तहसीलदार विजय अवधाने यांची प्रमुख उपस्थिती
होती.
पुढे जिल्हाधिकारी भंडारी म्हणाले की, महसूल दिन म्हणून साजरा
करण्यात येणार हा दिवस म्हणजे मागील वर्षात आपण केलेल्या कामाचे अवलोकन करण्याचा
दिवस होय. सर्व सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत सर्व योजना या महसूल
विभागामार्फत राबविण्यात येत असल्याने लोकांच्या महसूल विभागाकडून खुप अपेक्षा
आहेत. आपण महसूल विभागात काम करत असल्याने आपणांस सामाजिक कार्य करण्याची संधी
मिळत आहे. आज अद्ययावत तंत्रज्ञानामुळे नागरिकांच्या प्रशासनाकडून अपेक्षा वाढलेल्या
असल्याने आपली जबाबदारी देखील वाढली आहे. ही जबाबदारी ओळखून सर्वांनी आपल्या
कर्तव्य पार पाडावे. ऑनलाईन वितरण प्रणाली आणि ऑनलाईन सेवा देण्याबाबत आपल्या
जिल्ह्याने चांगली कामगिरी केली असल्याचे ही जिल्हाधिकारी भंडारी यावेळी म्हणाले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड
म्हणाले की, जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक योजनाची अंमलबजावणी ही
जिल्हाधिकारी यांच्या मार्फत करण्यात येते. आज बदलत्या परिस्थितीनुसार
नागरिकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. याकरीता नागरिकांचे प्रश्न अस्थेवाईकपणे
समजून घेत तो सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसेच महसूल विभागाची प्रतिमा
ठिकविण्यासाठी गुणात्मक व दर्जात्मक कामावर भर दिला पाहिजे.
पोलिस अधिक्षक अरविंद चावरिया म्हणाले की, महसूल विभागाला प्राचिन
इतिहास प्राप्त आहे. महसूल विभाग हा शासनाचा प्रतिनीधी म्हणुन काम करतो. या
विभागामार्फत सुमारे 132 प्रकारचे विविध कामे केली जातात. सर्व सामान्य नागरिकांना
आवश्यक असणारे सर्व प्रमाणपत्र या महसूल विभागामार्फत देण्यात येतात.
महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी आणि
त्यांच्या गुणंवत पाल्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नायब तहसीलदार सुनिल कावरखे यांनी केले.
यावेळी महसूल विभागातील अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.
*****
No comments:
Post a Comment