देशाबाहेर अभ्यास दौऱ्यासाठी शेतकऱ्यांनी
प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 31 : शेतकऱ्यांचे केवळ उत्पादन व उत्पादकता वाढविणे
हे ध्येय न राहता उत्पादीत होणाऱ्या शेतीमालाची दर्जात्मक सुधारणा करण्यासाठी नवीन
तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी करणे गरजेचे आहे. शेतीशी निगडीत घटकांबाबत जगात वेळोवेळी
होत असलेले बदल, विकसित होत असलेले तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या गरजेनुरूप
योग्य वेळी पोहचविणे निकडीचे आहे. यासाठी शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यासदौरे सन
2017-18 मध्ये कृषी विभागामार्फत आयोजित करण्यात येत आहेत.
विविध देशांनी विकसित केलेले शेतीविषयक
तंत्रज्ञान व तेथील शेतकऱ्यांनी त्याचा केलेला अवलंब व त्याव्दारे त्यांच्या उत्पन्नात
झालेली वाढ याबाबत त्या त्या देशातील शेतकरी, शास्त्रज्ञ यांच्याशी चर्चा व क्षेत्रीय
भेट इत्यादीव्दारे शेतकऱ्याचे ज्ञान व क्षमता उंचावण्याकरिता वय वर्ष 25 ते 60 वर्ष
असलेल्या शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यासदौरे सन 2017-18 मध्ये कृषी विभागामार्फत आयोजित
करण्यात येत आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील जे शेतकरी अभ्यास
दौऱ्यासाठी इच्छूक आहेत त्यांनी दि. 31 ऑगस्ट, 2017 पर्यंत संबंधित तालुका कृषि अधिकारी,
कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावेत. सदर प्रस्तावासोबत शेतकऱ्याचा अर्ज, चालु वर्षाचा
सातबारा व 8 अ, जन्मतारखेचा पुरावा, शिक्षण प्रमाणपत्राची झेरॉक्स, शेतकरी कुटुंबाची
शिधापत्रिका झेरॉक्स, वैध पारपत्राच्या सर्व पानाची झेरॉक्स, स्वत: शेतकरी असल्याचे
शेतकऱ्याचे स्वसाक्षांकित प्रमाणपत्र, शासकीय / निमशासकीय नोकरीत नसल्याचे व डॉक्टर,
वकील, सी. ए., अभियंता, कंत्राटदार इ. व्यावसायिक नसल्याचे शेतकऱ्याचे स्वसाक्षांकित
प्रमाणपत्र, पुर्वी शासकीय अर्थसहाय्याने विदेश दौरा केला नसल्याचे प्रमाणपत्र, शारीरीक
स्वास्थ योग्य असल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, प्रपत्र-1 व 2 शेतकऱ्यांच्या
फोटोसहीत व इतर कागदपत्रासह आपले प्रस्ताव संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे
दि. 31 ऑगस्ट, 2017 पर्यंत सादर करावेत.
अधिक माहितीसाठी जिल्ह्यातील इच्छूक शेतकऱ्यांनी
संबंधित तालुका कृषि अधिकारी व उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा,
असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी व्हि. डी. लोखंडे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये
केले आहे.
*****
No comments:
Post a Comment