31 August, 2019






महिला बचत गटांच्या उत्पादनांना 'माविम' देणार बाजारपेठ
-‘माविम’ अध्यक्षा ज्योतीताई ठाकरे
हिंगोली, दि.31: महिला बचत गट आता परंपरागत उत्पादनाच्या चाकोरीतून बाहेर पडून विविध उत्पादनांची निर्मिती करत आहेत. महिला बचतगटांनी दर्जेदार उत्पादने दिली तर त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महिला आर्थिक विकास महामंडळ घेणार असल्याचे प्रतिपादन 'माविम' च्या अध्यक्षा ज्योतीताई ठाकरे यांनी केले.
येथील रामलिला मैदानावर महिला व बालविकास आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांनी आयोजित ‘नारी सन्मान सोहळा’ कार्यक्रमात ज्योतीताई ठाकरे बोलत होत्या. यावेळी  जिप अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, आमदार सर्वश्री रामराव वडकुते, तान्हाजी मुटकुळे, महिला व बालकल्याण सभापती श्रीमती रेणुका जाधव, जिप सदस्या श्रीमती मंगलाताई कांबळे, श्रीमती रुपालीताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी.तुम्मोड, श्रीमती राजश्री पाटील,  माविमचे हिंगोली जिल्हा समन्वयक विलास जगताप यांच्यासह नांदेडचे जिल्हा समन्वयक चंदनसिंह राठोड, लातूरचे जिल्हा समन्वयक मन्सुर पटेल, सेवासदनच्या श्रीमती मिरा कदम,  यांच्यासह मोठ्या संख्येने बचत गटांच्या महिलांची उपस्थिती होती.
यावेळी ज्योतीताई ठाकरे म्हणाल्या की, बचतगटांच्या महिलांनी मागील काही वर्षांत प्रगती साधली असून स्वत: बरोबरच कुटुंब आणि समाजाच्या विकासातही त्यांचा हातभार लागत आहे. महिलांना माविम बरोबरच घरातील मंडळीकडूनही पाठबळ मिळत असून प्रेम, वात्सल्य व ममता माविमच्या वातावरणात महिलांना जानवत असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
महिला या उसनवार घेतलेला प्रत्येक पैसा विश्वासाने, काटकसरीने परत करत असतात त्यानुसार माविमच्या बचत गटांची बँकाकडून सुमारे 2 हजार 700 कोटी रुपयांचे कर्ज घेतलेले आहे व त्या कर्जाची 100 टक्के परतफेड केली असून बँकांनी माविमच्या बचत गटांना सढळ हाताने कर्ज देण्याचे आवाहन माविमच्या अध्यक्षा श्रीमती ठाकरे यांनी यावेळी केले.
          गाव,  वस्त्या, तांड्यातील महिलांनी आपले कौशल्य दडपून न ठेवता त्याला व्यासपीठ, बाजारपेठ उपलब्ध करुन द्यावा. महिला बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी सुमारे 200 महिला बचत गटांना ॲमेझॉनवरील ऑनलाईन विक्रीमध्येही व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले.  तसेच माविमच्या विविध बचत गटांच्या माध्यमातून पुरग्रस्त नागरिकांसाठी प्रयेकी बचत गट एक रुपये प्रमाणे सुमारे 14 लाख 21 हजार 288 रुपये मदत दिल्याचे यावेळी श्रीमती ठाकरे यांनी सांगितले.
            राज्यातील प्रत्येक महिलांची आर्थिक स्थिती सुधारावी व महिलांना योग्य तो सन्मान मिळावा हेच माविमचे उद्दिष्ठ आहे. माविम ही महिलांसाठी कार्य करणारी शिखर संस्था असल्याचे त्यांनी सांगितले. बचत गटातील महिलांनी आर्थिक स्थिती सुधारण्याबरोबरच आपली संस्कृती व जबाबदारी जपावी ही इच्छाही यावेळी त्यांनी व्यक्त केली. यावेळी आमदार रामराव वडकुते, तान्हाजी मुटकुळे यांनीही मार्गदर्शनपर भाषणे केली. यावेळी कार्यक्रमास हिंगोली, परभणी, नांदेड, वाशिम, लातूर या जिल्ह्यातील महिला बचत गटांनी सहभाग नोंदवून आपले स्टॉल लावले होते.
यावेळी ज्योतीताई ठाकरे व मान्यवरांच्या हस्ते हिरकणी महाराष्ट्राची या पुरस्कारांसाठी निवड झालेल्या बचत गटांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी ज्योतीताई ठाकरे यांनी महिला बचत गटांच्या स्टॉलची पाहणी केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माविमचे विभागीय साधन व्यक्ती केशव पवार,यांनी केले तर माविमचे जिल्हा समन्वयक विलास जगताप यांनी आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती.
* 'माविम' च्या नुतन इमारतीचे ज्योतीताई ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन : प्रारंभी लिंबाळा येथील महिला आर्थिक विकास महामंडळ कार्यालयाच्या नुतन इमारतीचे उद्घाटन 'माविम' च्या अध्यक्षा ज्योतीताई ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच  यावेळी  पात्र लाभार्थ्यांना सुमारे 3 कोटी 47 लाख रुपयांचे कृषि व्यवसायावर आधारीत यांत्रिकीकरणांचे अवजारे वितरण ज्योतीताई ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा पोलीस अधिक्षक योगेश कुमार, माविमचे जिल्हा समन्वयक विलास जगताप, माविमच्या जिल्ह्यातील विविध बचत गटांच्या महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.  
****




शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयानी समान निधी योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन


शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयानी समान निधी योजनेसाठी
अर्ज सादर करण्याचे आवाहन
    
       हिंगोली, दि.31 :  ग्रंथालय संचालनालय मुंबई यांच्या मार्फत राज्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांसाठी भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठाण, कोलकाता त महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने समान निधी योजनेतंर्गत इमारत बांधकाम , व ईमारत विस्तार व नुतनीकरण या योजनेसाठी तब्बल 10 लाख रुपयाचा निधी दिला आहे.
राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना  ग्रंथालय संचालनालया मार्फत दरवर्षी अर्थसहाय्य देण्यात येते. त्या संदर्भातील नियम ,अटी व अर्जाचा नमुना  www.rrrlf.nic.in  या प्रतिष्ठाणच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. तरी इच्छुकांनी तो या संकेतस्थळावरुन उपलब्ध किंवा Download करुन घ्यावा. समान निधी योजना (Maching Schemes) 2018-19 साठी , राज्य शासनाच्या 50%  प्रतिष्ठाणच्या 50% अर्थसहाय्य सार्वजनिक ग्रंथालयांना इमारत बांधकाम / विस्तार व नुतनीकरण अर्थसहाय्य कमाल मर्यादा 10 लाख रूपये मर्यांदित निधीची उपलब्धता होऊ शकते. या योजनांसाठी करावयाचा अर्जासाठी राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजनांबाबत इच्छुकांनी संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच अधिक माहितीसाठी प्रतिष्ठानचे www.rrrlf.nic.in संकेतस्थळ पहावे. ग्रंथालयांनी समान निधी योजनेतंर्गत इमारत बांधकाम, विस्तार व नुतणीकरणासाठीचा प्रस्ताव विहित नमुन्यात पध्दतीत आवश्यक त्या सर्व कागतपत्रासह इंग्रजी,हिंदी भाषेत चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास दि.16 सप्टेंबर 2019 पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवावेत. असे अवाहन सुभाष हि.राठोड, प्र.ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, नगर भवन, मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी मि.गो.सोनकांबळे हिंगोली यांनी सर्व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना केले आहे.
000000
    


खाजगी संवर्गातील ऑटोरिक्षा परवान्यावर नोंदणीकरीता मुदतवाढ



खाजगी संवर्गातील ऑटोरिक्षा परवान्यावर नोंदणीकरीता मुदतवाढ

            हिंगोली,दि.31:  खाजगी संवर्गातील ऑटोरिक्षा परवान्यावर नोंदणी करण्यासाठी दि 19 ऑगस्ट, 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार दि. 31 डिसेंबर 2019 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या शासन निर्णयामधील अटी व शर्तीनुसार खाजगी नोंदणी झालेल्या ऑटोरिक्षा ह्या फक्त महानगरपालिका क्षेत्र वगळून इतर क्षेत्रात परवान्यांवर नोंदणी करता येतील. अधिक माहितीसाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, हिंगोली येथे कक्ष क्र. 14 (परवाना विभाग) या ठिकाणी संपर्क साधावा .
            जिल्ह्यातील ऑटोरिक्षा चालकांनी याची नोंद घेऊन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, हिंगोली येथे अर्ज करुन परवाने घेण्यात यावेत असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
****



29 August, 2019

31 ऑगस्ट 2019 रोजी महिला व आर्थिक विकास महामंडळाच्या नुतन इमारतीचा उद्घाटन समारंभ



31 ऑगस्ट 2019 रोजी महिला व आर्थिक विकास महामंडळाच्या
नुतन इमारतीचा उद्घाटन समारंभ
           
            हिंगोली,दि.29: येथील महिला व आर्थिक विकास महामंडळ यांच्या लिंबाळा मक्ता येथे बांधण्यात आलेल्या नुतन इमारतीचा उद्घाटन समारंभ दिनांक 31 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 10 ते 10.30 वाजता पार पडणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा श्रीमती ज्योतीताई ठाकरे तर अध्यक्ष श्रीमती शिवराणीताई नरवाडे, अध्यक्षा जिल्हा परिषद, हिंगोली  तर हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सर्वश्री रामराव वडकुते,विप्लव बाजोरीया, विक्रम काळे, सतीष चव्हाण, जयप्रकाश मुंदडा, तानाजी मुटकुळे, संतोष टारफे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी,  मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक महिला आर्थिक विकास महामंडळ श्रीमती श्रध्दा जोशी उपस्थित राहणार आहेत.
तसेच या कार्यक्रमामध्ये सकाळी 10.30 ते 11.30  वाजे दरम्यान मानव विकास मिशन कार्यक्रम सन 2018-19 अंतर्गत गाव समिती मधील महिलांना कृषी औजार बँकेचे वाटप व मान्यवरांचे मार्गदर्शन, दुपारी 1 ते 3.00 वाजे दरम्यान नारी सन्मान सोहळा – उत्कृष्ट उद्योजक महिला व बचत गटांचा सत्कार, बंजारा महिला बचत गटांचा सांस्कृतिक कार्यक्रम (स्थळ : रामलीला मैदान, हिंगोली) या महिला मेळाव्याकरिता बचत गटातील 8 हजार महिला उपस्थित राहणार आहेत. तसेच महिलांनी उत्पादीत केलेल्या वस्तुंचे निवडक स्टॉल लावण्यात येणार आहेत.
00000

             


पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वृक्ष लागवड आवश्यक -पालकमंत्री अतुल सावे







पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वृक्ष लागवड आवश्यक
                                                                                    -पालकमंत्री अतुल सावे
           
            हिंगोली,दि.29: मराठवाड्यात मागील 4 ते 5 वर्षापासून पाऊस कमी झाल्याने दूष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या परिस्थितीला आपणच जबाबदार असून पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वृक्ष लागवड आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योग आणि खनिकर्म, अल्पसंख्यांक विकास व वक्फ विभागाचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.
             येथील विभागीय वन अधिकारी कार्यालयाच्या नुतन इमारतीच्या उद्घाटनाप्रसंगी श्री. सावे हे बोलत होते. यावेळी जि.प.अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, आमदार तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, विभागीय मुख्य वनसंरक्षक प्रकाश महाजन, उप विभागीय वन अधिकारी केशव वाबळे, सामाजिक वनीकरण विभागाच्या उपसंचालक मनीषा पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुधाकर घुबडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
            पुढे पालकमंत्री श्री. सावे म्हणाले, पर्यावरण रक्षणासाठी वनसंवर्धन आवश्यक असून त्यासाठी 33 कोटी वृक्ष लागवड उपक्रमाअंतर्गत राज्यात वृक्ष लागवड करण्यात येत आहे. पर्यावरणाच्या विरूद्ध कुणीही जाऊ नये, प्रत्येकाने पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे. फक्त झाडे लावून उपयोग नाही तर त्यांची काळजी घेणे ही तितकेच महत्वाचे आहे. झाडे आहेत म्हणून आपण आहोत याचे भान सर्वांनी ठेवले पाहिजे. झाडे आपणांला प्राणवायू देत असल्याने हे निसर्गचक्र व्यवस्थित सुरू ठेवायचे असेल तर झाडे लावणे व जगविणे आवश्यक आहे. झाडे लावण्याबरोबर झाडे जगवली तरच आपण पर्यावरणाचे रक्षण करू शकू. पर्यावरणाचा विशेषत: नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास होत असल्याने तापमान वाढ आणि हवामानात ही बदल घडू लागले आहेत. यासर्व परिस्थितीमुळे निसर्गाचे ऋतुचक्र बदलत आहे. यावर उपाय म्हणून पर्यावरणाचे संवर्धन, जतन व संरक्षण करुन समृध्द व संपन्न गावांची भौतिक निर्मिती करणे ही काळाची गरज असल्याने वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन करणे आवश्यक असल्याचे ही पालकमंत्री श्री.सावे यावेळी म्हणाले.
            आमदार तान्हाजी मुटकुळे म्हणाले की, जगात प्रचंड प्रमाणात वृक्षतोड होत असून त्यामुळे ऋतूचक्र अनियमित झाले आहे. प्रकृतीचे संवर्धन करणे आवश्यक आहे, परंतु केवळ झाडे लावून संवर्धन होत नाही. `झाडे लावा झाडे जगवा’ हा मूलमंत्र जपणे आवश्यक आहे. पर्यावरणांचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने दोन वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे. तरच जिल्ह्यात पर्यायाने राज्य आणि देशात वन निर्मित होवू शकेल.
            प्रारंभी पालकमंत्री अतुल सावे यांनी विभागीय वन अधिकारी कार्यालयाच्या नुतन इमारतीचे फित कापुन उद्घाटन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. मदन मार्डीकर यांनी केले. तर सहायक वनसंरक्षक कामाजी पवार यांनी प्रास्ताविक करत आभार मानले. यावेळी विविध विभागाचे विभाग प्रमुख, वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.
****


28 August, 2019

मुद्रा बँक योजनेतंर्गत लाभार्थ्यांना कर्ज मंजूर करावे -जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी


मुद्रा बँक योजनेतंर्गत लाभार्थ्यांना कर्ज मंजूर करावे
                                                                        -जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी
            हिंगोली,दि.28: मुद्रा बँक योजनेतंर्गत सर्व बँकांनी जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना तात्काळ कर्ज मंजूर करुन या योजनेचा लाभ देण्याचे निर्देश मुद्रा बँक योजना समन्वय समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी दिले.
             येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मुद्रा बँक योजना समन्वय समितीच्या बैठकीत जयवंशी बोलत होते. यावेळी अशासकीय सदस्य गजाननराव घुगे, सुरजीतसिंग ठाकूर, बाबाराव घुगे, भारत लोखंडे, कौशल्य विकास विभागाच्या रेणुका तम्मलावार, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी आणि मुद्रा बँक योजना समन्वय समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा नियोजन अधिकारी किरण गिरगांवकर यांची उपस्थिती होती.              
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्ह्यातील बँकांना शिशु, किशोर आणि तरुण गटनिहाय मुद्रा बँक योजनेतंर्गत कर्ज वितरणाचे ठरवून दिलेले उद्दिष्ट पुर्ण करुन पात्र लाभार्थ्यांची कर्ज प्रकरणे तात्काळ मंजूर करावीत. अनेक बँकांनी मुद्रा बँक योजनेचे काम चांगले केले नाही. तरी बँकांनी ठरवून दिलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे. बँकांनी जिल्ह्यातील जास्तीत-जास्त तरुणांना या योजनेचा लाभ देवून त्यांना स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न अशा सूचना जयवंशी यांनी यावेळी दिल्या.
            सर्व बँक व्यवस्थापकांनी मुद्रा बँक योजने अंतर्गत प्राप्त झालेली प्रकरणे मंजूर करुन लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ द्यावा. तसेच बँकाकडे आलेल्या प्रकरणांवर बँकांनी पोहच द्यावी अशा सूचना सर्व अशासकीय सदस्यांनी यावेळी केल्या.
यावेळी बैठकीस सर्व बँक व्यवस्थापकांची उपस्थिती होती.
****


पालकमंत्री अतुल सावे यांचा जिल्हा दौरा


पालकमंत्री अतुल सावे यांचा जिल्हा दौरा
        हिंगोली, दि.28: उद्योग आणि खनिकर्म, अल्पसंख्यांक विकास व वक्फ विभागाचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
            पालकमंत्री श्री. सावे यांचे बुधवार दिनांक 28 ऑगस्ट 2019 रोजी रात्री  8.00 वाजता हिंगोली शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव.
तसेच गुरुवार दिनांक 29 ऑगस्ट, 2019 रोजी सकाळी 8.00 वाजता हिंगोली विश्रामगृह येथून जवळा बाजारकडे प्रयाण, सकाळी 8.30 वाजता जवळा बाजार येथे सभा स्थळ पाहणी, सकाळी 10.00 वाजता औंढा नागनाथ येथील सभा स्थळी पाहणी, सकाळी 11.00 वाजता विभागीय वन अधिकारी कार्यालय, हिंगोली  नूतन इमारतीच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती (स्थळ : विभागीय वन अधिकारी कार्यालय, नांदेड रोड, हिंगोली), दुपारी 12.00 वाजता कळमनुरी येथील सभा स्थळ पाहणी, दुपारी 2.00 वाजता शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे आगमन व राखीव, दुपारी 3.30 वाजता विविध शासकीय विभागांची आढावा बैठक (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली), दुपारी 5.00 वाजता रामलिला मैदान, हिंगोली येथे सभा स्थळ पाहणी, सोईनुसार शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव.
शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट, 2019 रोजी सकाळी 8.30 वाजता हिंगोली विश्रामगृह येथून झिरोफाटाकडे प्रयाण, सकाळी 11.40 वाजता जवळा बाजार येथेआगमन व मुख्यमंत्री यांच्या सभेस उपस्थिती (स्थळ : मार्केट कमिटी मैदान),  दुपारी 1.30 वाजता मुख्यमंत्री यांच्या सभेस उपस्थिती (स्थळ : रामलीला मैदान), दुपारी 3.45 वाजता कळमनुरी येथून आखाडा बाळापूर, नांदेडकडे प्रयाण करतील.
****

27 August, 2019

सुशिक्षीत बेरोजगारांसाठी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा


सुशिक्षीत बेरोजगारांसाठी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

                हिंगोली,दि.27: सुशिक्षित बेरोजगार युवक - युवतींसाठी खाजगी रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शनकेंद्र, मध्यवर्तीप्रशासकीयइमारत एस -3 दुसरा माळा, हिंगोली यांच्या विद्यमाने पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.
या मेळाव्यास पेसस्किल ट्रेनींग सेंटर,लातूर, धूत ट्रान्समीशन प्रा.लि.औरंगाबाद, नवभारत फर्टीलायझर प्रा.लि.औरंगाबाद हे तीन उद्योजक येणार असूनयात मेसन, बारबेंडींग, इलेक्ट्रिशीयन, वेल्डींग, असिस्टंट नर्सींग, सेल्स रिप्रझंटेटिव्ह, ईपीपी ट्रेनी या पदांसाठी मुलाखतीघेण्यात येणार आहेत. रोजगार मेळाव्यास सहभागी होण्यासाठी mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर रोजगार या पर्यायावर क्लिक करुन  नोकरी साधक हा पर्याय निवडावा. युजर आयडी व पासवर्डव्दारे लॉगईनकरुन प्रोफाईल मधील पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या पर्यायाव्दारे हिंगोली जिल्हा निवडून रोजगार मेळाव्यास ऑनलाईन अप्लाय करावे. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या दुरध्वनी 02456 – 224574 वर संपर्क साधावा.
                या रोजगार मेळाव्याचे आयोजन दि. 04 सप्टेंबर, 2019 रोजी सकाळी - 11:00 वा.जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शनकेंद्र, मध्यवर्ती प्रशासकीयइमारत एस - 3 दुसरा माळा, हिंगोली येथेकरण्यात आले आहे. शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांनी आपले शैक्षणीक प्रमाणपत्र, आधारकार्ड, फोटो, सेवायोजनकार्ड घेवून वरील पत्यावर उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीमती रेणूका तम्मलवार सहायक संचालक, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, हिंगोली यांनी केले आहे.
****


जड - अवजड वाहनांसाठी डावी मार्गिका निश्चित


जड - अवजड वाहनांसाठी डावी मार्गिका निश्चित
हिंगोली,दि.27: राज्यातील सर्व पोलीस अधीक्षक यांच्या कार्यक्षेत्रामधील सर्व महामार्गावर जड/ अवजड वाहनांची वाहतुक प्रत्येक मार्गाच्या डाव्या मार्गिकेमधून मार्गक्रमण करण्यासाठी खालीलप्रमाणे निर्बंधाबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. राज्यातील ज्या महामार्गावर (राष्ट्रीय महामार्ग/ राज्य महामार्ग, महानगरपालिका अथवा नगरपालिका क्षेत्रा अंतर्गत रस्ते) येण्या जाण्याच्या दोन्ही मार्गावर दोन मार्गिका आहेत अशा सर्व महामार्गावर व रस्त्यांवर जड, अवजड वाहनांनी मार्गक्रमण करण्यासाठी प्रत्येक मार्गाच्या डावीकडील मार्गिका निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येक मार्गाच्या उजवीकडील मार्गिकेमधून सतत मार्गक्रमण करण्यास मनाई करण्यात येणार आहे. प्रत्येक मार्गाच्या वाहतुकीची परिस्थिती पाहून उजव्या मार्गिकेतून ओव्हरटेक करता येईल, अपवादात्मक परिस्थितीमध्ये व ओव्हरटेक करण्यासाठी उजवीकडील मार्गिकेमध्ये आल्यावर सदर मार्गिकेमधून सतत मार्गक्रमण करण्यास मनाई करण्यात येणार आहे. ज्या रत्यांवर येण्या-जाण्याच्या दोन्ही मार्गांवर दोन पेक्षा अधिक मार्गिका आहेत अशा सर्व मार्गावर जड/ अवजड वाहनांनी मार्गक्रमण करण्यासाठी प्रत्येक मार्गाच्या सर्वात डावीकडील मार्गिका निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येक मार्गाच्या सर्वात उजवीकडील मार्गिकेमधून दुभाजकाच्या बाजुची पहिली मार्गिका मार्गक्रमण करण्यास मनाई करण्यात येणार आहे.
        जड/अवजड वाहनांना प्रत्येक मार्गाच्या डावीकडील मार्गिकेच्या लगतच्या मार्गिकेतून वाहतुकीची परिस्थिती पाहून ओव्हरटेक करता येईल. सर्व महामार्गावर व रस्त्यांवर विहित केलेल्या ठिकाणां व्यतिरिक्त इतर ठिकाणी वाहने थांबविण्यास मनाई  करण्यात येत आहे.
        या निर्बंधातून अत्यावश्यक सेवा वाहने, रुगणवाहिका, अग्निशमक वाहने, पोलीस व शासकीय वाहने, अति महत्वाच्या व्यक्तींची वाहने यांना वगळण्यात आली असल्याचे अपर पोलीस महासंचालक (वाहतुक), महाराष्ट्र राज्य यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
****

23 August, 2019

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेतंर्गत विविध घटकासाठी अर्जाची मागणी


डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेतंर्गत विविध घटकासाठी अर्जाची मागणी

हिंगोली, दि.23 : सन 2019-20 मध्ये अनुसूचित जाती/नवबौध्द अंतर्गत शेतकऱ्यांचे उत्पन्न , उत्पादन वाढीस सहाय्य करुन त्यांच्या उन्नतीसाठी मदत करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन  ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत नवीन विहिर पॅकेज, जुनी विहिर दुरुस्ती पॅकेज,  इनवेल बोअरींग, वीज जोडणी आकार, शेततळ्यांचे प्लॅस्टीक अस्तरीकरण पॅकेज, सुक्ष्म सिंचन, पंप संच या घटकांसाठी अनुदान देय राहील. अधिक माहितीसाठी कृषि अधिकारी (विघयो), पंचायत समिती यांच्याकडे संपर्क साधावा.
        पात्र लाभार्थ्यांनी या योजनेअंतर्गत ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर सुविधा दिनांक 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर, 2019 पर्यंत ऑनलाईन अर्ज www.agriwell.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर दाखल करावा, ऑनलाईन सादर केलेल्या अर्जाची प्रत आवश्यक त्या कागदपत्रांच्या स्वयं साक्षांकित, छायांकित प्रतींसह अर्जाची / परिपूर्ण प्रस्तावाची मुळप्रत शेतकऱ्यांनी आवश्यक त्या कागदपत्रासह कृषि अधिकारी (विघयो), पंचायत समिती यांच्याकडे स्वहस्ते सादर करावे असे आवाहन अति. मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद, हिंगोली यांनी केले आहे.
****

बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेतंर्गत विविध घटकासाठी अर्जाची मागणी


बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेतंर्गत विविध घटकासाठी अर्जाची मागणी
        हिंगोली, दि.23 : सन 2019-20 मध्ये अनुसूचित जमाती/ आदिवासी शेतकऱ्यांचे उत्पन्न, उत्पादन वाढीस सहाय्य करुन त्यांच्या उन्नतीसाठी मदत करण्यासाठी बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना (क्षेत्राबाहेर) ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत नवीन विहिर पॅकेज, जुनी विहिर दुरुस्ती पॅकेज, इनवेल बोअरींग, वीज जोडणी आकार, शेततळ्यांचे प्लॅस्टीक अस्तरीकरण पॅकेज, सुक्ष्म सिंचन, पारस बाग , पंप संच, पीव्हीसी/एचडीपीई पाईप या घटकांसाठी अनुदान देय राहील. अधिक माहितीसाठी कृषि अधिकारी (विघयो), पंचायत समिती यांच्याकडे संपर्क साधावा.
        पात्र लाभार्थ्यांनी या योजनेअंतर्गत ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर सुविधा दिनांक 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर, 2019 पर्यंत ऑनलाईन अर्ज www.agriwell.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर दाखल करावा, ऑनलाईन सादर केलेल्या अर्जाची प्रत आवश्यक त्या कागदपत्रांच्या स्वयं साक्षांकित, छायांकित प्रतींसह अर्जाची / परिपूर्ण प्रस्तावाची मुळप्रत शेतकऱ्यांनी आवश्यक त्या कागदपत्रासह कृषि अधिकारी (विघयो), पंचायत समिती यांच्याकडे स्वहस्ते सादर करावे असे आवाहन अति. मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद, हिंगोली यांनी केले आहे.
****

सैनिकी शाळा सातारा येथे प्रवेशाकरीता अर्जाची मागणी


सैनिकी शाळा सातारा येथे प्रवेशाकरीता अर्जाची मागणी

हिंगोली, दि.23 : जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक / विधवा यांच्या पाल्याकरिता सैनिकी शाळा सातारा येथे वर्ग 6 वी व 9 वीच्या प्रवेशाकरिता  दिनांक 23 सप्टेंबर 2019 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.
सैनिकी शाळा साताराच्या sainikschooladmission.in/ www.sainiksatara.org  या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी तसेच शाळेच्या 02162-235860/238122 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी , हिंगोली यांनी केले आहे.
****

22 August, 2019

पूरग्रस्तांच्या मदतीकरीता वर्गणी जमा करण्यासाठी मंडळानी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात नोंदणी करावी


पूरग्रस्तांच्या मदतीकरीता वर्गणी जमा करण्यासाठी मंडळानी
सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात नोंदणी करावी

हिंगोली,दि.22: सांगली, कोल्हापूर, सातारा व इतर जिल्ह्यांमध्ये  आलेल्या महापुरामुळे बाधित पूरग्रस्तांच्या मदतीकरीता  वर्गणी गोळा करणेकामी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्थ अधिनियम 1950 चे कलम 41 क अन्वये विहित नमुन्यात पूर्वसूचना , अर्ज धर्मादाय उप आयुक्त, सहायक धर्मादाय आयुक्त यांनी सादर करण्याची मुभा आहे. अशा मंडळांना  संस्थांनी धर्मादाय उप आयुक्त यांनी चौकशी केल्यानंतर अटी, शर्तींना अधीन राहून दाखला देण्यात येईल, सदर नमूद कारणाकरिता गोळा केलेल्या वस्तू किंवा रकमेची योग्य विल्हेवाट लावण्याकरिता व गरजूंना ती मदत मिळण्याकरिता सर्व मंडळांनी त्या वस्तू व रकमेचे वितरण जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अथवा  त्यांनी नेमलेल्या अधिकाऱ्यांच्या समन्वयाने किंवा निरीक्षणाखाली करणे योग्य होईल.
संबंधित मंडळांनी माहिती, पूर्वसूचना देताना सर्व सदस्यांच्या सहीचा ठराव असावा(हस्तलिखित) प्रत, पदाधिकाऱ्यांचे, सदस्यांचे  आधार कार्ड, पॅन कार्ड इत्याची ओळखपत्रांची प्रत सोबत जोडावी .
संबंधित मंडळाकडून सूचना प्राप्त झाल्यास त्यांना 15 दिवसांच्या आत दाखला देण्यात येईल. परंतू मदत किंवा रक्कम गोळा करण्यासमध्ये काही फसवणूक वा अपव्यय झाला असे समजण्यास कारण असल्यास धर्मादाय उप आयुक्त व सहायक धर्मादाय आयुक्त त्यांनी तशी मदत किंवा रक्कम गोळा न करण्याचे आदेश देतील आणि हिशोब पत्रके सादर करून उर्वरित रक्कम पी.टी.ए. फंडामध्ये जमा करण्याचे आदेशित करतील. असे धर्मादाय आयुक्त, मुंबई यांनी कळविले आहे.

****


सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात मंडळाना नोंदणी करण्याचे आवाहन


सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात मंडळाना नोंदणी करण्याचे आवाहन

          हिंगोली,दि.22: महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 च्या कलम 41 सी अन्वये सर्व मंडळांना विहित नमुन्यात संकेतस्थळावर किंवा प्रत्यक्षरित्या संबंधित सार्वजनिक न्यास  नोंदणी कार्यालयात नोंदणी करणे अनिवार्य आहे. सदरचा अर्ज सर्व मंडळांना charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर करता येईल. संकेतस्थळावर सादर केलेल्या अर्जाचा निपटारा नियमानुसार सात दिवसात करण्यात येईल. प्रत्यक्ष सादर केलेला अर्ज प्राप्त झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत निकाली  काढण्यात येईल. सदर तरतुदीअंतर्गत देण्यात येणारे दाखले सहा महिन्यांकरीता वैध असतील. सदर कालावधीनंतर असे दाखले नुतनीकरण करण्यास ग्राह्य नसतील. सर्व गणेशोत्सव मंडळांना सदरचा दाखला प्राप्त  झाल्यापासून त्या कालावधीनंतर दोन महिन्यांच्या आत सदर कार्यालयात  लेखा परीक्षण अहवाल  सादर करणे व उर्वरित रक्कम जमा करणे अनिवार्य आहे. गणेशोत्सव मंडळाने वरील तरतुदीप्रमाणे परवानगी न घेतल्यास कलम 66-सी प्रमाणे तीन महिन्यांपर्यंत कैद किंवा परवानगी प्राप्त करण्यापूर्वी गोळा केलेल्या एकूण वर्गणीच्या दीड पटपर्यंत दंडाची तरतुद केली आहे. तरी सर्व मंडळांना भविष्यात होणारा अनर्थ टाळण्याकरिता कायद्याच्या तरतुदींचे पालन करण्याचे आवाहन धर्मादाय आयुक्त, मुंबई यांनी केले आहे.
****




गोरखनाथ मंदिर वाई येथील पोळा सणानिमित्त वाहतूकीत बदल


गोरखनाथ मंदिर वाई येथील पोळा सणानिमित्त वाहतूकीत बदल

          हिंगोली,दि.22: प्रतिवर्षी प्रथे व परंपरेप्रमाणे 30 ऑगस्ट 2019 रोजी  पोळा हा सण साजरा करण्यात येणार असून दि. 31 ऑगस्ट रोजी कर सण साजरा करण्यात येणार आहे. कर सणानिमित्ताने पो. स्टे. कुरुंदा हद्दीतील मौजे वाई येथील गोरखनाथ मंदिरास हिंगोली, लातूर, परभणी व नांदेड जिल्ह्यातील जवळपास 50 ते 60 हजार बैलजोड्या दर्शनास व प्रदक्षिणा मारण्या करीता  त्याचे मालक घेऊन येतात त्यामुळे  वसमत औंढा रोडवर बैलांची व बैल फिरविण्यासाठी आणणाऱ्या लेाकांची बरीच गर्दी होते. व सदर रस्ता हा राज्य महामार्ग असल्याने सदर रोडवर वाहतुक मोठ्या प्रमाणावर चालू असते व सदर दिवशी वाहतुक चालू राहिल्यास अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण होण्याची शक्यता असल्याने वसमत टि पॉईंट ते नागेशवाडी पर्यंत रहदारीचा रस्ता हा दिनांक 31 ऑगस्ट 2019 चे 00.00 ते दिनांक 31 ऑगस्ट 2019 रोजीचे 24.00 वाजेपावेतो बंद करण्यात येऊन नांदेडकडून येणारी वाहतुक वसमत मार्गे झिरो फाटा ते हट्टा  जवळा बाजार मार्गे नागेशवाडी असे पर्यायी मार्गाने औरंगाबादकडे व औरंगाबादकडून नांदेडकडे जाणारी वाहतुक ही नागेशवाडी मार्गे जवळा बाजार, हट्टा, झिरो फाटा मार्गे वसमत ते नांदेडकडे वळविण्यास विनंती केली आहे.
                पोलीस अधीक्षक हिंगोली यांच्या अहवालानुसार सदर रस्ता हा राज्य महामार्ग असल्याने रोडवर वाहतुक मोठ्या  प्रमाणावर चालू असते व सदर दिवशी  वाहतुक चालू राहिल्यास अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने रस्ता वळविणे आवश्यक आहे.
                त्याकरीता वसमत टी पॉईंट ते नागेशवाडी पर्यंत रहदारीचा रस्ता हा दिनांक 31 ऑगस्ट 2019 चे 00.00 ते दि. 31 ऑगस्ट 2019 रोजीचे 24.00 वाजेपावेतो बंद करण्यात येत असून, नांदेडकडून येणारी वाहतुक वसमत मार्गे झिरो फाटा ते हट्टा- जवळा बाजार मार्गे नागेशवाडी अशा पर्यायी मार्गाने औरंगाबादकडे व औरंगाबादकडून नांदेड जाणारी वाहने नागेशवाडी, मार्गे  जवळा बाजार, हट्टा, झिरो फाटा मार्गे वसमत ते नांदेडकडे वळविण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी एका  प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
****

प्रधानमंत्री मानधन योजने अंतर्गत शेतकऱ्यांना पेन्श्न · 23, 24 आणि 25 ऑगस्ट रोजी सजा निहाय ‍‍मेळाव्याचे आयोजन



प्रधानमंत्री मानधन योजने अंतर्गत शेतकऱ्यांना पेन्श्न
·   23, 24 आणि 25 ऑगस्ट रोजी सजा निहाय ‍‍मेळाव्याचे आयोजन

हिंगोली,दि.22: केंद्र शासनाने देशातील शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये 18 ते 40 वयोगटातील 2 हेक्टरपर्यंत शेती असलेले सर्व अल्पभूधारक शेतकऱ्यांचा सहभाग असणार आहे. या योजनेत भाग घेणार्‍या शेतकर्‍यांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा 3,000 रुपयांची मानधन (पेन्शन) मिळणार आहे. यात लाभधारक शेतकर्‍याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला सुद्धा निवृत्ती वेतन मिळण्याची तरतूद या योजनेत करण्यात आली आहे. या योजनेत दि. 31 ऑगस्ट, 2019 पर्यंत शेतकर्‍यांना सहभागी होता येणार आहे. त्यासाठी शेतकर्‍यांनी आपले सरकार सेवा केंद्र/सामायिक सुविधा केंद्र यांच्याकडे स्वतःचा 7/12 चा उतारा, 8 अ, आधार कार्ड, बँकेचे पासबुक, मोबाइल क्रमांक माहितीची कागदपत्र घेऊन संपर्क साधावा.
या योजनेत भाग घेण्यासाठी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना, कर्मचारी राज्य विमा निगम योजना, कर्मचारी फंड ऑर्गनायझेशन योजना व यासारख्या इतर कोणत्याही सामाजिक सुरक्षा योजनातंर्गत लाभ घेणारे शेतकरी अपात्र असतील. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, प्रधानमंत्री लघु व्यापारी मानधन योजना याचबरोबर उच्च आर्थिक स्थितीतील शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र नाही. 
केंद्र शासन लाभार्थी हप्त्या इतकीच रक्कम हप्ता म्हणून जमा करणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे लाभार्थी त्यांना मिळणार्‍या आर्थिक साहाय्यातून वरील मानधन योजनेतील लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी बँकेचे अर्ज् भरून देत या योजनेत सहभागी होऊ शकतील. लाभार्थी शेतकर्‍यास पेन्शन कार्ड देखील मिळणार असून अधिक महितीसाठी शेतकर्‍यांनी आपल्या संबंधित तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधावा. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत जिल्ह्यातील जास्तीत-जास्त पात्र शेतकऱ्यांना सहभागी करुन घेण्यासाठी जिल्ह्यात दि. 23, 24 आणि 25 ऑगस्ट रोजी सज्जानिहाय (तलाठी कार्यालय) ‍‍मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकर्‍यांना वृद्धापकाळात त्यांचे आणि कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न सुरक्षित करण्यासाठी ही अत्यंत महत्त्वपूर्ण योजना असल्याने अधिकाधिक शेतकर्‍यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.
****


20 August, 2019

शासकीय तंत्रनिकेतन येथे सदभावना दिवसानिमित्त प्रतिज्ञा घेण्यात आली



शासकीय तंत्रनिकेतन येथे सदभावना दिवसानिमित्त प्रतिज्ञा घेण्यात आली

हिंगोली, दि.20 : भारताचे दिवंगत पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांची जयंती सदभावना दिवस म्हणून पाळण्यात येतो. येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे सदभावना दिवसानिमित्त प्राचार्य डॉ. पाटील यांनी उपस्थितांना सामुहिकपणे सदभावना दिवसाची प्रतिज्ञा दिली.
यावेळी संस्थेचे प्राचार्य डॉ. आर.के. पाटील यांच्यासह सर्व प्राध्यापक वृंद तसेच जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी हे उपस्थित होते.
0000

रेशीम कृषी प्रदर्शनी मध्ये स्टॉल लावण्याची सुवर्णसंधी


रेशीम कृषी प्रदर्शनी मध्ये स्टॉल लावण्याची सुवर्णसंधी
हिंगोली, दि.20 : रेशीम संचालनालय, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे मार्फत रेशीम दिन 2019 साजरा करण्याचे योजिले आहे.सदर कार्यक्रम दिनांक 01 सप्टेंबर ,2019 रोजी  जालना येथे आयोजित करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाचे स्थळी रेशीम संचालनालय, म.रा. यांचे  तर्फे  दिनांक 30 ऑगस्ट ते 01 सष्टेंबर रोजी  रेशीम कृषी  प्रदर्शनी आयोतिज करण्यात आली आहे.
सदर प्रदर्शनी भव्य स्वरुपाची असुन संपुर्ण राज्यातुन रेशीम शेतकरी तसेच रेशीम व कृषी विषयाशी संबधित तज्ञ मोठया संख्येने हजर राहणार आहेत. सदर प्रदर्शनी मध्ये आपल्या उत्पादनाची जाहिरात व विक्री करणे करिता स्टॉल लावण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करुन देत आहे, जर आपण रेशीम साहित्य निर्मीती करणारे, कृषी कंपन्या, विमा कंपन्या, खाद्य पदार्थ विक्री करणारे, रेशीम व कृषीसाठी उपयुक्त साहित्य निर्मीती करणारे उत्पादक व विविध बचत गट इत्यादी आहात तर आपन आपल्या उत्पादनाची मोठया प्रमाणात जाहिरात व विक्री करणे करिता प्रदर्शनी  स्थळी  स्टॉल लावावे. स्टॉलचे आरक्षण  प्रथम आगमन - प्रथम प्राधान्य  स्तरावर करण्यात येणार आहे. इच्छुक व्यक्ती / कंपनी / बचत गट / संस्था / शासकीय- निम-शासकीय कार्यालये / विद्यापीठ / कृषी विज्ञान केंद्र / शासकीय संस्था यांनी  दिनांक 26 ऑगस्ट, 2019 पर्यंत आपली नोंदणी करावी.  स्टॉल नोंदणी  तसेच अधिक माहिती संपर्कासाठी रेशीम संचालनालय,महाराष्ट्र राज्य,6 वा माळा,नवीन प्रशासकीय ईमारत क्रं.2,विभागीय आयुक्त कार्यालय परिसर,सिव्हील लाईन्स,नागपुर-440001 फोन नं.0712-2569924 / 2569926 ई.मेल-dos.maha@gmail.com, सहाय्यक संचालक, प्रादेशिक रेशीम कार्यालय,प्लॉट क्रं.54, सदाशिव नगर, धुत हॉस्पिटल समोर,सिडको एन-2,औरंगाबाद.- 4031003 फोन नं.0240-2475747 मो.क्र.9420191067 ई.मेल-adsilkaurangabad@gmail.com, रेशीम विकास अधिकारी श्रेणी-2 , जिल्हा रेशीम कार्यालय,कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर,कापुस प्रयोगशाळा इमारत, जालना.-431203 फोन नं.02482-229047 मो.क्र.9850447096 ईमेल-reshimjalna@gmail.com येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा रेशीम विकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

****

शास्त्रीय व लोककला क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांना नोंदणीसाठी 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ


शास्त्रीय व लोककला क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांना
नोंदणीसाठी 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ
        हिंगोली, दि.20: शास्त्रीय व लोककला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या दिनांक 24 नोव्हेंबर, 2017 च्या शासन निर्णयानुसार 10 वी च्या परीक्षेत शालेय विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्यासंदर्भात कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार सन 2019-20 या शैक्षणिक वर्षाकरीता शास्त्रीय व लोककला क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांची नोंदणी करणे कामी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. सदर अर्ज संचालनालयाच्या पुणे विभागीय कार्यालयाकडे सादर करण्याचा अंतिम दिनांक 16 ऑगस्ट, 2019 होती.
            परंतू मागील आठ दिवसांपासून राज्याच्या काही भागात झालेल्या अतिवृष्टी निर्माण झालेल्या पूरपरिस्थिती विचारात घेता विशेष बाब म्हणून सदरचे अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक 31 ऑगस्ट, 2019 पर्यंत वाढविण्यात येत आहे.
****

19 August, 2019

शासकीय तंत्रनिकेतन येथे अतिरिक्त प्रवेश फेरी


शासकीय तंत्रनिकेतन येथे अतिरिक्त प्रवेश फेरी  

        हिंगोली, दि.19: येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमास प्रवेश इच्छुक दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या रिक्त जागांकरिता संस्थास्तरावर अतिरिक्त समुपदेशन  प्रवेशफेरी दिनांक 23 ऑगस्ट 2019 रोजी आयोजित करण्यात आली आहे. सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी दिनांक 23 ऑगस्ट, 2019 रोजी सकाळी 10.00 वाजता संस्थेत  आवश्यक त्या सर्व मूळ कागदपत्रे, कागदपत्रांच्या झेरॉक्स कॉपी व विहित  प्रवेश शुल्कासह उपस्थित राहून या प्रवेश फेरीचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे प्राचार्य डॉ. आर. के. पाटील यांनी केले आहे.

****