29 August, 2019

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वृक्ष लागवड आवश्यक -पालकमंत्री अतुल सावे







पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वृक्ष लागवड आवश्यक
                                                                                    -पालकमंत्री अतुल सावे
           
            हिंगोली,दि.29: मराठवाड्यात मागील 4 ते 5 वर्षापासून पाऊस कमी झाल्याने दूष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या परिस्थितीला आपणच जबाबदार असून पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वृक्ष लागवड आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योग आणि खनिकर्म, अल्पसंख्यांक विकास व वक्फ विभागाचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.
             येथील विभागीय वन अधिकारी कार्यालयाच्या नुतन इमारतीच्या उद्घाटनाप्रसंगी श्री. सावे हे बोलत होते. यावेळी जि.प.अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, आमदार तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, विभागीय मुख्य वनसंरक्षक प्रकाश महाजन, उप विभागीय वन अधिकारी केशव वाबळे, सामाजिक वनीकरण विभागाच्या उपसंचालक मनीषा पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुधाकर घुबडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
            पुढे पालकमंत्री श्री. सावे म्हणाले, पर्यावरण रक्षणासाठी वनसंवर्धन आवश्यक असून त्यासाठी 33 कोटी वृक्ष लागवड उपक्रमाअंतर्गत राज्यात वृक्ष लागवड करण्यात येत आहे. पर्यावरणाच्या विरूद्ध कुणीही जाऊ नये, प्रत्येकाने पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे. फक्त झाडे लावून उपयोग नाही तर त्यांची काळजी घेणे ही तितकेच महत्वाचे आहे. झाडे आहेत म्हणून आपण आहोत याचे भान सर्वांनी ठेवले पाहिजे. झाडे आपणांला प्राणवायू देत असल्याने हे निसर्गचक्र व्यवस्थित सुरू ठेवायचे असेल तर झाडे लावणे व जगविणे आवश्यक आहे. झाडे लावण्याबरोबर झाडे जगवली तरच आपण पर्यावरणाचे रक्षण करू शकू. पर्यावरणाचा विशेषत: नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास होत असल्याने तापमान वाढ आणि हवामानात ही बदल घडू लागले आहेत. यासर्व परिस्थितीमुळे निसर्गाचे ऋतुचक्र बदलत आहे. यावर उपाय म्हणून पर्यावरणाचे संवर्धन, जतन व संरक्षण करुन समृध्द व संपन्न गावांची भौतिक निर्मिती करणे ही काळाची गरज असल्याने वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन करणे आवश्यक असल्याचे ही पालकमंत्री श्री.सावे यावेळी म्हणाले.
            आमदार तान्हाजी मुटकुळे म्हणाले की, जगात प्रचंड प्रमाणात वृक्षतोड होत असून त्यामुळे ऋतूचक्र अनियमित झाले आहे. प्रकृतीचे संवर्धन करणे आवश्यक आहे, परंतु केवळ झाडे लावून संवर्धन होत नाही. `झाडे लावा झाडे जगवा’ हा मूलमंत्र जपणे आवश्यक आहे. पर्यावरणांचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने दोन वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे. तरच जिल्ह्यात पर्यायाने राज्य आणि देशात वन निर्मित होवू शकेल.
            प्रारंभी पालकमंत्री अतुल सावे यांनी विभागीय वन अधिकारी कार्यालयाच्या नुतन इमारतीचे फित कापुन उद्घाटन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. मदन मार्डीकर यांनी केले. तर सहायक वनसंरक्षक कामाजी पवार यांनी प्रास्ताविक करत आभार मानले. यावेळी विविध विभागाचे विभाग प्रमुख, वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.
****


No comments: