15 August, 2019

आश्वासक औद्योगिकरणामूळे महाराष्ट्र राज्य गुंतवणूकीकरीता प्रथम क्रमांकाचे राज्य -पालकमंत्री अतुल सावे



आश्वासक औद्योगिकरणामूळे महाराष्ट्र राज्य गुंतवणूकीकरीता प्रथम क्रमांकाचे राज्य
-पालकमंत्री अतुल सावे
हिंगोली,दि.15: प्रारंभी पासूनच देशातील सर्व राज्यांनी विविध क्षेत्रात प्रगती साधण्याचा प्रयत्न केला. परंतू देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचे नेहमीच मोठे योगदान राहिले असून यापूढे ही ते राहणार आहे. राज्यातील आश्वासक औद्योगिकरणामूळे महाराष्ट्र राज्य गुंतवणूकीकरीता प्रथम क्रमांकाचे राज्य असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योग आणि खनिकर्म, अल्पसंख्यांक विकास व वक्फ विभागाचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केले .
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित स्वातंत्र्य दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमप्रसंगी पालकमंत्री अतुल सावे बोलत होते. यावेळी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, खासदार हेमंत पाटील, आमदार सर्वश्री तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिनियार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
            मागील दोन वर्षात संपन्न झालेल्या ‘मेक इन इंडिया व मॅग्नेटिक महाराष्ट्र’ गुंतवणूक परिषदेमध्ये जवळपास रु. 20 लक्ष कोटी रुपयाची गुंतवणूक अपेक्षित असून अंदाजे 60 लाख रोजगार उपलब्ध होणे अपेक्षित आहे. मागील 5 वर्षात एकूण 10 लक्ष 27 हजार 07 लघु उद्योग स्थापित झालेले असून, त्यामध्ये रु. 16 हजार 562 कोटी रुपयाची गुंतवणूक झाली आहे व 59.42 लक्ष रोजगार निर्मिती झालेली आहे. डिसेंबर 2014 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत राज्यामध्ये सर्वात जास्त थेट विदेशी गुंतवणुकीचे प्रस्ताव प्राप्त झालेले असून, देशात एकूण झालेल्या विदेशी गुंतवणूकीपैकी 30 टक्के गुंतवणूक म्हणजेच  रु. 3 लक्ष 68 हजार कोटीची गुंतवणूक महाराष्ट्र राज्यात झालेली आहे. 
जून-जूलै महिन्यात पावसाची सुरुवात चांगली झाली नाही. परंतू मागील काही दिवसापासून जिल्ह्यात पावसाला चांगली सुरुवात झाली आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत जिल्ह्यात आतापर्यंत 42 टक्के पाऊस झाला असून जिल्ह्याला अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. खरीप हंगामात जिल्ह्यात 3 लाख 67 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. शेतकऱ्यांना पेरणीकरीता बियाणे आणि खताची उपलब्धता व्हावी यासाठी योग्य नियोजन करण्यात आले असून, खतांची ई-पॉस मशिनद्वारे ऑनलाईन विक्री करण्यात येत आहे. जिल्ह्यातील 2 लाख 82 हजार शेतकरी बांधवानी 2 लाख 35 हेक्टरवरील पिकांसाठी सुमारे 90 कोटी रुपयांचा पीकविमा उतरविला आहे. तर श्री  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत जिल्ह्यातील 66 हजारहून अधिक शेतकऱ्यांना रु. 267 कोटी रुपयांची कर्जमाफी झाली आहे. राज्य शासनाच्या महत्वकांक्षी जलयुक्त शिवार अभियानामुळे जिल्ह्यातील प्रत्येक गावात शाश्वत पाणी आणि शेतीकरीता सिंचनाची सोय उपलब्ध झाली आहे. या अभियाना अंतर्गत सन 2016 ते 2019 या कालावधीत जिल्ह्यात एकुण 419 गावांची निवड झाली होती. निवड केलेल्या गावामध्ये पूर्ण झालेल्या कामामुळे 42 हजार टि.सी.एम. पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्या पाणीसाठ्यानुसार 84 हजार हेक्टर संरक्षित सिंचन  क्षेत्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे. ʿमागेल त्याला शेततळेʾ योजने अंतर्गत जिल्ह्यास अडीच हजार शेततळ्यांचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते. त्यानुसार आज रोजी 3 हजार 557 शेततळे पूर्ण करुन उद्दिष्टपूर्ती केली आहे. हिंगोली जिल्ह्यास वाढवून मिळालेले व सुधारीत 2500 लक्षांक साध्य करुन सुध्दा अतिरिक्त मागणीनुसार 3 हजार 557 शेततळे पूर्ण करुन योजनेच्या नावाप्रमाणेच जिल्ह्यात योजना उत्कृष्टपणे कृषी विभागातर्फे राबविण्यात आली असल्याचेही यावेळी पालकमंत्री यांनी सांगितले.
            राज्य स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत हिंगोली नगर परिषदेचा राज्यामध्ये 33 वा क्रमांक आला असून मराठवाड्यात पहिला क्रमांक आला आहे. राज्य शासनाने जिल्ह्यातील सर्व नगर पालिका आणि नगर पंचायती हागणदारी मुक्त घोषित केल्या आहे. 33 कोटी वृक्ष लागवड उपक्रमाअंतर्गत जिल्ह्याने उल्लेखनीय काम केले असून, जिल्ह्यात आतापर्यंत 54 लाख वृक्ष लागवड करण्यात आली आहे. रमाई योजनेअंतर्गत ग्रामीण भागासाठी 3 हजार 500 तर शहरी भागासाठी 249 घरकुल मंजूर झाली आहेत. तसेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेतंर्गत 11 अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना 43 एकर शेतीचे वितरण करण्यात आले आहे.  तसेच  प्रधानमंत्री आवास योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, मुद्रा बँक योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अंतर्गत जिल्ह्याने भरीव कामगिरी केली असून राज्याच्या महसूलात महत्वाचा वाटा असणारे खनिज पदार्थ उत्खनन करताना पर्यावरणाला हानी पोहचणार नाही असे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. उद्योगांना कोळसा उपलब्ध करुन देणे बरोबरच त्यांना सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करुन देऊन त्यांचे क्लस्टर निर्माण करण्यात आले आहे. राज्यातील सर्व खाणपट्ट्यात डिजीटलायजेशन करण्यात आले आहे. अल्पसंख्यांक समाजाच्या सक्षमीकरणासाठी तसेच त्यांच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी  अल्पसंख्यांक विभागाने अनेक उपक्रम राबविले आहेत. राज्य सरकारने मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्राच्या जलद विकासासाठी उपाययोजना राबविण्यासाठी 2018 साली विशेष कार्यक्रम जाहीर केला होता. याअंतर्गत अल्पसंख्याक समाजातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांचे बचत गट निर्माण करून त्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले. 
राज्यातील कोल्हापूर सांगलीसह पाच जिल्ह्यांमध्ये महापूरामुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. शासनातर्फे आपादग्रस्तांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. आपणही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना मदतीचा हात देऊन भक्कम पाठबळ देण्याचे आवाहनही यावेळी पालमंत्री श्री. सावे यांनी केले.
यावेळी पालकमंत्री श्री. सावे यांच्या हस्ते जिल्हा उद्योग केंद्रामार्फत देण्यात येणारा सन 2017  चा प्रथम पुरस्कार मे. राधा जिनिंग व प्रेसिंग फॅक्ट्री लिंबाळा एमआयडीसी चे उद्योजक श्री. हनुमान द्वारकादास मुंदडा यांना प्रथम तर द्वितीय मे. निर्मल शिव इंडस्ट्रीज सहकारी औद्योगिक वसाहत हिंगोली चे उद्योजक श्री सावरमल बद्रीप्रसाद अग्रवाल  यांना देण्यात आला. तर सन 2018 चा जिल्हा पुरस्कार मे. निर्मल फुड प्रॉडक्टस एन.आ.सी. तापडीया ईस्टेट हिंगोली चे उद्योजक श्री. श्याम राजकुमार नयनवाणी  यांना प्रथम तर द्वितीय पुरस्कार मे. नंदिनी गृह उद्योग पानकन्हेरगाव ता. सेनगाव चे उद्योजक श्री. महादेव राधाअप्पा कोतेवार यांना देण्यात आला.
तसेच वन विभागामार्फतही यावेळी पुरस्काराचे वितरण यावेळी करण्यात आले. वन विभागामार्फत संत तुकाराम वनग्राम योजना अंतर्गत प्रथम पुरस्कार वन परिक्षेत्र तालुका सेनगांव अंतर्गत वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री गजानन लक्ष्मण राठोड यांना देण्यात आला. तर द्वितीय पुरस्कार वन परिक्षेत्र औढा अंतर्गत वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्षा श्रीमती सविता मारोती बेले यांना तर वन परिक्षेत्र तालुका हिंगोली अंतर्गत व्यवस्थापन समितीचे राहोली जिल्हास्तरीय तृतीय पुरस्कार प्राप्त समितीचे अध्यक्ष श्री. प्रभाकर खुडुजी जावळे यांना तृतीय पुरस्कार पालकमंत्री श्री. सावे यांच्या हस्ते देण्यात आला.
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची या योजनेंतर्गत जिल्हास्तरावर निवड करण्यात आलेल्या दहा महिला बचत गटांचा सत्कार यावेळी पालकमंत्री यांच्याहस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून करण्यात आला. यामध्ये रोकडेश्वर स्वयंसहाय्यता महिला बचत गट वारंगा फाटा, ता. कळमनुरी. गजानन महाराज स्वयंसहायता समुह कळमनुरी. महालक्ष्मी महिला बचत गट, रेगाव ता. सेनगाव. सतिआई महिला बचत गट गोरेगाव ता. सेनगांव. जय जिजाऊ स्वयंसहायता बचत गट अकोली ता. वसमत. अहिल्याबाई होळकर स्वयंसहायता महिला समुह आंबा ता. वसमत. सावता माळी महिला बचत गट गडद ता. औंढा. महानंदा महिला बचत गट जवळा बाजार ता. औंढा. शिवशक्ती स्वयंसहायता समुह अमला ता जि. हिंगोली व रमाबाई स्वयंसहायता समुह, कोथळज ता. जि. हिंगोली 
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळमनुरीचे प्रकल्प अधिकारी डॉ. विशाल राठोड यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट प्रशासक विशेष गौरव पुरस्काराचे स्मृतीचिन्ह पालकमंत्री यांच्या हस्ते देण्यात आले तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे कबड्डी स्पर्धेतील राज्यस्तरीय प्रथम क्रमांक विजेत्या मुले व मुलींच्या संघांना ट्रॉफी देवून गौरवण्यात आले.
यावेळी उपजिल्हा  निवडणूक अधिकारी भाऊसाहेब जाधव, उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड,  उपजिल्हाधिकारी गोविंद रणवीरकर, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, हिंगोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील, विभागीय वन अधिकारी केशव वाबळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, उप मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, जिल्हा शल्य चिकित्सक श्रीवास, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहूल जाधव, सहायक संचालक रेणुका तम्मलवार, डायटचे प्राचार्य गणेश शिंदे  यांच्यासह विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक,  पत्रकार, विद्यार्थी-विद्यार्थींनी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
 ****

No comments: