जिल्हा वार्षिक योजनेतील कामे वेळेत पूर्ण करा
· पालकमंत्री अतुल सावे
हिंगोली,दि.14: जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत मंजूर नियतव्यय खर्च करण्यासाठी
संबंधित विभागांनी तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता, निविदा प्रक्रिया पूर्ण
करून प्रस्तावित कामे वेळेत पूर्ण करावी असे निर्देश राज्याचे उद्योग आणि खनिकर्म, अल्पसंख्यांक विकास व वक्फ विभागाचे
राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या
सभागृहात आयोजित जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. सावे बोलत
होते. यावेळी जिप अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे खासदार हेमंत पाटील, आमदार सर्वश्री
तान्हाजी मुटकुळे, डॉ. संतोष टारफे, विप्लव बाजोरिया, जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी श्री. सावे म्हणाले की, आगामी कालावधीत विधानसभा
निवडणूकीची आचारसंहिता लक्षात घेवून सर्व यंत्रणांनी जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत
चालू आर्थिक वर्षातील मंजूर झालेला योजनातंर्गत निधींच्या तांत्रिक व प्रशासकीय
मान्यतेसाठी पाठपुरावा करावा. तसेच तांत्रिक मान्यता मिळालेल्या कामे पूर्ण करून
उपलब्ध निधी वेळेत खर्च करावा. सदर निधी समर्पित होणार नाही याची दक्षता सर्व
विभागांनी घ्यावी. सर्व संबंधीत विभागांनी दर आठवड्याला कामांचा आणि
खर्चीत-अखर्चीत निधीचा अहवाल सादर करावा. तसेच जिल्हा वार्षिक योजना सन 2018-19
अंतर्गत पुनर्विनियोजनाचे प्रस्ताव आणि जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण), अनुसूचित जाती उपयोजना आणि
अनुसूचित जमाती उपयोजना सन 2019-20 चे आराखडे शासन निर्णयातील निर्देशनुसार वेळेत संबंधीत विभागाकडे
सादर करावेत, असे निर्देश ही श्री. सावे यांनी यावेळी दिले.
सन 2018-19 मध्ये जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत मंजूर
नियतव्यय 100.75 कोटी होता त्यापैकी 1.75 कोटी खर्च झाला. तर अनुसूचित जाती
अंतर्गत मंजूर नियतव्यय 50.47 कोटी होता त्यापैकी 50.46 कोटी खर्च झाला असून
आदीवासी उपयोजना अंतर्गत मंजूर नियतव्यय 32.17 कोटी होता त्यापैकी 30.38 कोटी खर्च
झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनी यावेळी दिली.
यावेळी पालकमंत्री श्री. सावे यांनी महावितरण, शिक्षण, महिला व
बालविकास, आरोग्य, सार्वजनीक बांधकाम जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता
मार्गदर्शन केंद्र आदी विभागांचा योजनानिहाय आढावा घेतला. यावेळी जिल्हा नियोजन
समिती सदस्य, जिल्हा नियोजन अधिकारी किरण गिरगावकर, समाज कल्याण सहायक आयुक्त
भाऊराव चव्हाण, एकात्मिक आदीवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी विशाल राठोड यांच्यासह
सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
****
No comments:
Post a Comment