24 June, 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन न करणाऱ्यावर होणार कारवाई

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन न करणाऱ्यावर होणार कारवाई

 

हिंगोली,दि.24: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता सार्वजनिक स्थळी थुंकण्यास बंदी, चेहऱ्यावर कायम मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंग पाळणे इत्यादी बाबींचे पालन व्हावे याकरिता गैरकृत्याचे स्वरुप करणाऱ्या व्यक्ती विरुध्द दंडात्मक व फौजदारी कार्यवाही करणेबाबत आदेश पारीत करण्यात आले होते. परंतू काही नागरिक बाजारात बाहेर फिरते वेळी विना मास्कसह तसेच काही सामाजिक संस्थेचे लोकप्रतिनिधी व नागरिक हे गरजूंना मदत वाटप करतेवेळी मास्कचा वापर करत नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.

याकरीता सार्वजनिक स्थळी जसे रस्ते, बाजार, रुग्णालय, कार्यालय इत्यादी ठिकाणी थुकंल्यास संबंधीतावर स्थानिक स्वराज संस्था (न.प., न.पं. आणि ग्रा.पं.), कार्यालय क्षेत्रामध्ये संबंधित शासकीय विभाग प्रमुख, पोलीस विभाग यांच्यामार्फत प्रथम रक्कम रु. 1 हजार रुपये दंड तर दुसऱ्यांदा आढळल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल. तसेच सार्वजनिक स्थळी चेहऱ्यावर मास्क न वापरणे, नाक व तोंड सुरक्षितपणे पूर्ण झाकलेले नसणाऱ्या व्यक्तींवर स्थानिक स्वराज संस्था (न.प., न.पं. आणि ग्रा.पं.), कार्यालय क्षेत्रामध्ये संबंधित शासकीय विभाग प्रमुख, पोलीस विभाग यांच्यामार्फत प्रथम रक्कम रु. 2 हजार रुपये दंड, दुसऱ्यांदा फौजदारी कारवाई  करण्यात येणार आहे.

दुकानदार, फळभाजीपाला विक्रेते सर्व जीवनावश्यक वस्तू विक्रेते इत्यादी व ग्राहक यांनी सोशल डिस्टंसिंग न राखणे, ग्राहकांमध्ये कमीत-कमी तीन फुटाचे अंतर न राखणे, विक्रेत्याने मार्किंग न करणे यासाठी  ग्राहकास (व्यक्तीस) प्रथम रु. 200 रुपये दंड तर आस्थापना मालक, दुकानदार, विक्रेता यांना प्रथम रु. 2 हजार रुपये दंड आणि दुसऱ्यांदा आढळल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. तसेच किराणा, जीवनावश्यक वस्तू विक्रेत्याने वस्तूंचे दरपत्रक न लावणे यासाठी रु. 5 हजार दंड करण्यात येणार. सार्वजनिक स्थळी रस्ते, बाजार, रुग्णालय, कार्यालय इत्यादी ठिकाणी एखादी व्यक्ती विनाकारण आढळून आल्यास प्रथम रु. 1 हजार रुपये दंड दुसऱ्यांदा फौजदारी कारवाई तसेच एखादी व्यक्ती दुचाकीवरुन वैयक्तीक वापरासाठी भाजीपाला, किराणा, औषधी इत्यादी घेऊन जात असल्याची बतावणी करुन अनावश्यक फिरत असल्यास प्रथम रु. 1 हजार रुपये दंड तर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

या आदेशाची अवज्ञा करणाऱ्या किंवा कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे मानन्यात येणार आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग प्रतिबंध कायदा 1897, महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 अंतर्गत संबंधितांवर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल. तसेच वरीलप्रमाणे गैरकृत्य करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी-कर्मचारी यांनी आवश्यकतेनुसार फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी मोबाईल इत्यादीद्वारे करावे याकरिता स्थानिक स्वराजय संस्था यांनी पोलीस विभागाची मदत घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी निर्गमित केले आहेत.

****

 


No comments: