08 June, 2020

निरोप व स्वागत समारंभ नुतन अप्पर जिल्हाधिकारी शंकर बरगे यांचे स्वागत तर माजी अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार यांना निरोप



निरोप व स्वागत समारंभ
नुतन अप्पर जिल्हाधिकारी शंकर बरगे यांचे स्वागत तर
माजी अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार यांना निरोप

हिंगोली, दि.08: माजी अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार यांची पदोन्नती झाल्याने त्यांच्या जागी नुतन अप्पर जिल्हाधिकारी शंकर बरगे यांनी पदभार स्विकारला आहे. माजी अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार यांचा निरोप समारंभ व नवीन अप्पर जिल्हाधिकारी शंकर बरगे यांचा स्वागत समारंभ आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात पार पडला. या निरोप आणि सत्कार सोहळ्यास जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, माजी अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार यांच्या सुविद्य पत्नी सौ.उज्ज्वला मिणियार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी अरुणा संगेवार, उपजिल्हाधिकारी गोविंद रणवीरकर, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी प्रविण फुलारी, प्रशांत खेडेकर आणि अतुल चोरमारे, मुख्याधिकारी रामदास पाटील, सर्व तहसीलदार यांच्यासह तसेच जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी म्हणाले की, नुतन अप्पर जिल्हाधिकारी विनोद बरगे यांचे हिंगोली जिल्ह्यात मी स्वागत करतो. तसेच माजी अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार यांची पदोन्नती झाल्याने त्यांना त्यांच्या पूढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा देतो.
नुतन अप्पर जिल्हाधिकारी शंकर बरगे म्हणाले की, मराठवाड्यात काम करण्याची मला पहिल्यांदाच संधी प्राप्त झाली असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या कालावधीत आपणा सर्वांसमोर अनेक आव्हाने आहेत. याकरीता हिंगोली जिल्ह्यात सर्व अधिकारी-कर्मचारी यांच्या सहकार्याने काम करुन आपण प्रगतीचा वेग असाच कायम ठेवू. श्री. मिणियार यांना ज्या पद्धतीने सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले, त्याच पद्धतीने ते मलाही मिळेल आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने उत्कृष्ट काम आपण करु शकू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आपल्या सत्काराला उत्तर देतांना श्री. जगदीश मिणियार म्हणाले की, या जिल्ह्यात काम करण्याचा पूर्वीचा अनुभव आणि मला लाभलेल्या उत्तम सहकाऱ्यांमुळे चांगले काम करता आले. प्रत्येक अधिकाऱ्याच्या कारकीर्दीत अप्पर जिल्हाधिकारी पदाचा कार्यकाळ महत्त्वाचा असतो. तो महत्त्वाचा कार्यकाळ या जिल्ह्यात गेला, ही माझ्यासाठी महत्त्वाची बाब आहे. या कारकीर्दीत निवडणूका, महसूल वसुली, शासकीय योजनांची अंमलबजावणी या सर्व कामांमध्ये मला चांगले अनुभव आले. शेवटी शासनाचे काम उत्तम पद्धतीने व्हावे, हेच उद्दिष्ट ठेवून आपण सर्वांनी काम केले, असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, या सर्व संवर्गातून प्रातिनिधीक स्वरुपात मनोगत व्यक्त केले. तसेच विविध विभागप्रमुख व यंत्रणा प्रमुखांनी श्री. जगदीश मिणियार यांचा सपत्नीक सत्कार केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी तर आभार प्रदर्शन नायब तहसीलदार राजेंद्र गळगे यांनी केले. या सोहळ्याचे सूत्रसंचलन अकुंश सोनटक्के यांनी केले.
****





No comments: