15 November, 2018

समन्वयाने जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करु - जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी






समन्वयाने जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करु
                                  - जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी
        हिंगोली,दि.15: जिल्ह्याच्या विकासात प्रत्येकाचे योगदान महत्वाचे आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि जनतेने समन्वय आणि सहकार्य करत आपल्या जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न करु असे प्रतिपादन नवनियुक्त जिल्हाधिकारी रुचेश जयंवशी यांनी केले.
            येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील डि.पी.सी. सभागृहात आयोजित स्वागत व निरोप कार्यक्रमात श्री. जयवंशी हे बोलत होते. यावेळी मावळते जिल्हाधिकारी अनिल भंडारी, श्रीमती भंडारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, पोलिस अधिक्षक योगेश कुमार, अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार, निवासी उपजिल्हाधिकारी खुदाबक्श तडवी आणि उप जिल्हा निवडणूक अधिकारी गोविंद रणवीरकर यांची उपस्थिती होती.    
            यावेळी श्री. जयवंशी पुढे म्हणाले की, हिंगोली जिल्ह्याची निर्मिती झाल्यापासून जिल्ह्याची विकासाकडे यशस्वी  वाटचाल सुरु आहे. परंतू हिंगोली जिल्ह्यात स्त्रोत कमी आणि आव्हाने अधिक आहेत. याकरीता सर्व विभागानी एकदूसऱ्याशी समन्वय ठेवत व सहकार्य करत जिल्ह्याच्या विकासकामासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी जिल्ह्याच्या विकासाची जी परंपरा सुरु केली आहे. ती अशीच आपण पुढे ही चालू ठेवू असे ही श्री. जयवंशी यावेळी म्हणाले.
            माजी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यावेळी म्हणाले की, हिंगोलीतील सुमारे सव्वादोन वर्षाच्या कार्यकाळात अनेक आव्हाने सामोरे होती. परंतू आपल्या सहकार्याने व समन्वयाने चर्चा करुत प्रत्येक आव्हान स्विकारत यशस्वी कामे करता आली. जलयुक्त शिवार, लिगो, राष्ट्रीय महामार्ग व रेल्वे मार्ग भूसंपादन, 7/12 संगणकीकरण, तलाठी यादी असे अनेक महत्वपूर्ण कामे करता आली. हिंगोली जिल्ह्यातील कार्यकाळ माझ्या जीवनातीत अविस्मरणीय क्षण असल्याचे ही श्री. भंडारी यावेळी म्हणाले.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार यांनी केले. तसेच यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, पोलिस अधिक्षक योगेश कुमार, उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर आदींची समयोचित भाषणे झाली.
            यावेळी जिल्ह्यातील विविध विभागाचे विभाग प्रमुख, कर्मचारी, पत्रकार, स्वयंसेवी स्ंसथांचे प्रमुख, विविध संघटनाचे प्रमुख यांनी पुष्प गुच्छ देत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचे स्वागत आणि माजी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांना निरोप दिला.
****

No comments: