29 November, 2018

ग्राहकांकडून वाहनांच्या नोंदणीसाठी विहित शुल्का व्यतिरिक्त कोणतेही ज्यादा शुल्क न आकारता येणार नाही


ग्राहकांकडून वाहनांच्या नोंदणीसाठी विहित शुल्का
व्यतिरिक्त कोणतेही ज्यादा शुल्क न आकारता येणार नाही
                               
        हिंगोली,दि.29: वाहन विक्री करताना वितरक हँडलिंग चार्जेस म्हणून ग्राहकांकडून अतिरिक्त रक्कम वसूल करतात याबाबत वर्तमानपत्रामध्ये बातमी प्रसिध्द झाली होती. त्याअनुषंगाने वाहनांच्या नोंदणीसाठी ग्राहकांकडून विहित शुल्का व्यतिरिक्त कोणतेही ज्यादा शुल्क न घेण्याबाबत परिपत्रकानुसार शासनाच्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत. त्यानुसार वाहनांच्या नोंदणीसाठी ग्राहकांकडून शुल्क आकरताना काही सूचनांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी.
            नव्याने होणाऱ्या दुचाकी / चारचाकी वाहनांकरिता शासनाने वेळोवेळी विहित केलेले नोंदणी शुल्क व कर या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येऊ नये. वाहन नोंदणीसाठी शासनाने वेळोवेळी विहित केलेले नोंदणी शुल्क व कर याबाबतची माहिती प्रत्येक वितरकाने शोरुम मधील दर्शनी भागामध्ये प्रदर्शित करावे. तसेच ‘या शो रुम मध्ये मोटार वाहन नोंदणी शुल्क व कर या व्यतिरिक्त कोणतेही शुल्क आकारले जात नाहीत. सदर बाबतीत आपली तक्रार  असल्यास विक्री व्यवस्थापक यांचेशी संपर्क साधावा. आपले समाधान न झाल्यास संबंधित प्रादेशिक, उप प्रादेशिक  परिवहन अधिकारी यांचेकडे लेखी, समक्ष, टपालाद्वारे, ई-मेलद्वारे किंवा या पोर्टलवर तक्रार दाखल करावी. तसेच आवश्यकता भासल्यास ग्राहक संरक्षण मंचाशी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.’, असा फलक शोरुम मधील दर्शनी भागामध्ये प्रदर्शित करण्यात यावा. या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी न करणाऱ्या संबंधित वाहन वितरक यांचे विरुध्द फौजदारी कारवाई करण्यात येईल. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे.
****



No comments: