30 November, 2018

ग्रंथोत्सवामुळे वाचन संस्कृती वाढण्यास मदत - रूचेश जयवंशी · मसाप अध्यक्ष कौतीकराव ठाले पाटील यांच्या हस्ते हिंगोली ग्रंथोत्सवाचे उद्घाटन












ग्रंथोत्सवामुळे वाचन संस्कृती वाढण्यास मदत
                                                                         - रूचेश जयवंशी

·   मसाप अध्यक्ष कौतीकराव ठाले पाटील यांच्या हस्ते हिंगोली ग्रंथोत्सवाचे उद्घाटन
                          
        हिंगोली,दि.30: ग्रंथाचा महोत्सव खऱ्या अर्थाने प्रगत समाजाचे लक्षण आहे. ग्रंथोत्सवांमुळे समाजात वाचन संस्कृती वाढण्यास मदत होत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.
            च्च व तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्यामार्फत येथील नगर परिषदेच्या कल्याण मंडपम् येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘हिंगोली ग्रंथोत्सव-2018’ उदृघाटनाप्रसंगी जयवंशी बोलत होते. यावेळी मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतीकराव ठाले पाटील, प्रसिध्द समिक्षक प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे, सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनिल हुसे, जिल्हा ग्रंथालय संघ हिंगोलीचे अध्यक्ष खंडेराव सरनाईक, प्रा. विलास वैद्य, अशोक अर्धापुरकर, कुंडलिकराव अतकरे आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी मिलींद सोनकांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
            यावेळी जयवंशी पुढे म्हणाले की, राज्‍याला वाचन संस्‍कृतीचा मोठा वारसा लाभलेला आहे. आजच्या पिढीमध्ये ग्रंथ वाचनाची आवड कमी होत आहे. त्यामुळे भाषा जिवंत ठेवण्यासाठी सर्वांनी आवर्जुन पुस्तके वाचलीच पाहिजेत. समाजात वाचन संस्कृतीमुळे मराठी भाषा टिकून राहील. वाचन संस्कृती वाढावी यासाठी शासनाने सुरु केलेला ग्रंथोत्सव हा उपक्रम स्तुत्य आहे. युवा पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण करुन समाजात वाचन संस्कृती रुजविण्यासाठी व ती टिकून राहण्यासाठी ग्रंथोत्सवासारखे उपक्रम अतिशय महत्त्वाचे आहेत.
            ग्रंथोत्सवाचे उद्घाटक कौतीकराव ठाले पाटील म्हणाले की, समाज आणि राष्ट्र  उभारणीत ग्रंथांचे योगदान महत्तवाचे आहे. माहिती, ज्ञान आणि मनोरंजनाच्या अंगभूत गुणांमुळे ‘ग्रंथ हेच गुरु’ असे म्हटले जाते. ग्रंथाच्या वाचनामुळे विचारांना दिशा मिळते. वाचनामुळे लेखकाचे विचार सर्व स्तरापर्यंत जातात व हे विचार समाजाच्या विकासासाठी उपयुक्त ठरतात. सामाजिक, शैक्षणिक व सांस्‍कृतिक जीवन समृध्द करण्यासाठी तसेच वाचन संस्कृती वृध्दीगंत करण्यासाठी ग्रंथोत्सव सारख्या उपकम्राचे महत्‍त्वाचे योगदान आहे. यामध्ये शासकीय ग्रंथालयांची ही तितकीच महत्त्वाची भूमिका आहे. या ग्रंथालयांकडून वाचकांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी शासनामार्फत विशेष प्रयत्न केले जात असल्याचे ही ठाले पाटील यावेळी म्हणाले.
            प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे म्हणाले की, ज्या प्रकारे शिक्षक विद्यार्थ्यांवर संस्कार करतात, तसे ग्रंथ देखील मनावर संस्कार करतात. माणुस हा समाजशील प्राणी आहे हे जसे पुस्तकातून कळाले तसा तो हिंस्त्र आहे हे देखील पुस्कानेचे कळाले. ग्रंथ आम्हाला आपल्या वर्तनाचा पुन्हा-पुन्हा विचार करायला लावतात. ज्या वेळी मनुष्याच्या आशा मंदवतात त्या वेळी ग्रंथ हे त्याच्या जीवनात आशेचा नवा किरण निर्माण करतात. 
            प्रास्ताविकात सहाय्यक संचालक सुनिल हुसे यांनी ग्रंथोत्सव भरविण्यामागील शासनाचा उद्देश सांगुन, ग्रंथोत्सवानिमित्त्‍ हिंगोलीकरांसाठी कवी संम्मेलन, परिसंवाद आणि व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती दिली. यावेळी प्रा. विलास वैद्य यांनी ही समायोचित भाषण केले.
            प्रारंभी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते ग्रंथोत्सवानिमित्त आयोजित ग्रंथ विक्री व प्रदर्शनी चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी साहित्यिक, वाचन प्रेमी, नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अश्विनी आसेगावकर यांनी केले तर जिल्हा ग्रंथालय अधिकारी मिलींद सोनकांबळे यांनी उपस्थिताचे आभार मानले.

****

No comments: