21 July, 2022

 

हर घर तिरंगा उपक्रमात स्वंयस्फुर्तीने सहभाग घ्यावा

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

  • 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा अभियान


            हिंगोली, (जिमाका) दि. 21 : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याने देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष साजरा करण्यात येत आहे. या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त येत्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून हर घर तिरंगा उपक्रम जिल्ह्यात व्यापक प्रमाणात राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला या अमृत महोत्सवी वर्षाचा आनंद घेता यावे यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. या उपक्रमात स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.

आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख, उद्योजक, व्यापारी व इतर प्रतिनिधींची बैठक बोलाविण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, अपर जिल्हाधिकारी पांडूरंग बोरगावकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ.विशाल राठोड, ए.एल. बोंद्रे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी, अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त भोसले. नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ.अजय कुरवाडे आदी उपस्थित होते.

या बैठकीत देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमानसात रहावी, या उद्देशाने आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत दिनांक 13 ऑगस्ट, 2022 ते दिनांक 15 ऑगस्ट, 2022 या कालावधीमध्ये केंद्र शासनाच्या सूचनेनुसार हर घर तिरंगा हा उपक्रम संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात साजरा करण्यात येणार आहे. दिनांक 13 ते 15 ऑगस्ट, 2022 या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांच्या घरावर तसेच सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी, संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वंयस्फुर्तीने करणे अपेक्षित आहे. तिरंगाच्या निर्धारित केलेल्या किमतीमध्ये प्रत्येक घराने ध्वज खरेदी करावा. झेंडा खरेदीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत https://harghartirangahingoli.in  संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर पुरवठादारांनी व नागरिकांनी आपली नोंदणी करावी. झेंडा विक्रीसाठी प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये वितरण केंद्र तयार करण्यात येणार आहे. या मोहिमेत जास्तीत जास्त सहभाग घेऊन आपले योगदान द्यावे, असे आवाहनही  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.

भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे तिरंगा हा 20:30 इंच साईजमध्ये 25 ते 30  रुपयांमध्ये पुरवठादाराकडून प्राप्त करुन घ्यावा. प्रत्येक नागरिकाने तिरंगा झेंडा संहितचे पालन करावे. तिरंगा झेंडा फडकावितांना केशरी रंग वरच्या बाजूने असावा. तिरंगा झेंडा उतरवितांना काळजीपूर्वक सन्मानाने उतरवावा. दिनांक 13 ते 15 ऑगस्ट, 2022 या कालावधीत हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत लावण्यात आलेले झेंडे अभियान कालावधीनंतर प्रत्येकांनी सन्मानाने व सुरक्षित ठेवावे. तसेच या कालावधीत आरोग्य शिबीर, सांस्कृतिक कार्यक्रम व विविध उपक्रम राबवावेत, आवाहनही  यावेळी केले.

******

No comments: