15 July, 2022

 

डासाची उत्पत्ती  थांबवा, डेंग्यू मलेरिया, चिकुनगुनिया पासून बचाव करा

 

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून काही ठिकाणी पूर परिस्थिती उद्भभवली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र कुरुंदा, किन्होळा या ठिकाणी पूर परिस्थिती झाली होती. सध्या जिल्हा हिवताप कार्यालयातील शीघ्र पथकाद्वारे संपूर्ण गावात घरोघरी धूर फवारणी करणे चालू आहे. यामुळे डासावर आळा घालणे शक्य होईल व किटकजन्य आजार उद्भवणार नाही. यावेळी अतिरिक्त जिल्हा हिवताप अधिकारी सी. जी. रणवीर, मल्हारी चौफाडे, सतीश नलगे यांचे पथक, आरोग्य सहाय्यक सुनिल शिकारी, जी. डी. जाधव, गोपाळ हाके उपस्थित होते. यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.गणेश जोगदंड यांनी खालील प्रमाणे घ्यावयाची काळजीबाबत माहिती दिली. सध्या पावसाळ्याचे दिवस असून डबके, पाणी साचण्याच्या जागेत डासांची उत्पत्ती होते. यामुळे नागरिकांनी परिसर स्वच्छता, कोरडा दिवस पाळणे आणि घराजवळ पाणी साचण्याच्या जागा नष्ट कराव्यात, जेणेकरुन डासांची उत्पत्ती होणार नाही, याची काळजी घ्यावी.

आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासन हे डेंग्यू आजार होऊ नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील आहेत. एडीस एजिप्ती डासाची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होत असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांच्या गृहभेटीमध्ये प्रत्येक गावात घरांना भेटी देऊन कीटकशास्त्रीय सर्वेक्षण केले जाणार आहे. प्रत्येक घरातील वापरण्यासाठी भरण्यात येणारे पाणी साठे तपासले जाणार आहेत. पाणीसाठ्यात डेंग्यू डासाच्या अळ्या आढळून आल्यास ती भांडी रिकामी करावी लागतात. रिकामे करता न येणाऱ्या पाणी साठ्यामध्ये टेमिफॉस किंवा ॲबेटचे द्रावण टाकणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार यांनी दिली .

डेंग्यूबाबत माहिती :

डेंग्यू हा एक विषाणूमुळे होणारा आजार आहे. या विषाणूंचे चार उपप्रकार आहेत. एडिस इजिप्ती व एडिस अलेबोपिक्टस या डासांच्या चाव्यामुळे हा रोग पसरतो. संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर पाच-सहा दिवसानंतर मनुष्याला आजार होतो. डेंग्यू हा सामान्यत: आपोआप बरा होणारा रोग आहे. बहुतांश रुग्ण बरे होतात. डेंग्यू ताप, डेंग्यू रक्तस्रावी ताप, डेंग्यू शॉक सिंड्रोम अशा तीन प्रकारे होऊ शकते. डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप अधिक तीव्र स्वरुपाचा आजार असून यामुळे मृत्यू ओढवू शकतो. यासाठी आठवड्यातून एक दिवस (शनिवार) सर्वांनी कोरडा दिवस पाळावा. घरासमोर पाणी साचू देऊ नका, घर व परिसर स्वच्छ ठेवा. पाण्याचे टॅंक तथा बॅरेल स्वच्छ ठेवा, टॅंक उघडे ठेवू नका. सायंकाळी दरवाजे, खिडक्या बंद करुन ठेवाव्यात, खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात. झाडांच्या कुंड्यांत पाणी साचू देऊ नका, त्या ठिकाणी स्वच्छता ठेवा. घरातील फ्रिज, कुलरमधील पाणी वारंवार बदलावे.

डेंग्यू कसा ओळखाल :

सर्दी, ताप आणि वारंवार खोकला येतो. अंगावर लहान-लहान पुरळ येतात. जेवल्यावर अथवा जेवण केलेले नसतानाही उलट्या अन्‌ मळमळ होते. रक्तातील प्लेटलेट्‌स कमी होऊन अशक्त‌पणा जाणवतो.

घरासमोर झाडे लावल्यानंतर नागरिकांनी त्या कुंड्यांत पाणी साचू देऊ नये. डासांच्या बहुतेक अळ्या त्याच ठिकाणी आढळतात. आरोग्य विभागातर्फे उपाययोजना सुरु आहेत, परंतु नागरिकांनी खबरदारी म्हणून घर व परिसर स्वच्छ ठेवावा. पाणी उघडे ठेवू नये, असे आवाहन डॉ गणेश जोगदंड यांनी केले आहे.

                                                                                                - जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली

*****

No comments: