08 July, 2022

 

‘‘हर घर झेंडा’’ मोहिम यशस्वी करण्यासाठी अडीच लाख झेंड्याचे नियोजन करावे

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 


हिंगोली (जिमाका), दि. 08 :  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक नागरिकांच्या मनात भारतीयत्वाची भावना वृद्धींगत व्हावी, नवीन पिढी पर्यंत स्वातंत्र्य लढ्याचे मोल पोहचावे या उद्देशाने हर घर झेंडा मोहीम प्रभावीपणे राबवावी. यासाठी जिल्ह्यातील सर्व स्थानिक संस्था, जिल्हा परिषद, सेवाभावी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या सहभागातून संपूर्ण जिल्ह्यासाठी अडीच लाख झेंड्याचे नियोजन करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.  

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात हर घर झेंडा मोहिमेची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, अपर जिल्हाधिकारी पांडूरंग बोरगावकर, उप मुख्य कार्यकारी डॉ.विशाल राठोड यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर म्हणाले, हर घर झेंडा ही मोहिम दि. 11 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट, 2022 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यात अडीच लाख झेंडे लावावयाचे आहेत. यासाठी जिल्ह्यातील पाचही तालुक्यातील प्रत्येकी 50 हजार याप्रमाणे झेंडा तयार करणे व खरेदीचे नियोजन करावे. याची मागणी सोमवार पर्यंत नोंदवावी. झेंडे तयार करण्यासाठी बचतगटाला प्रोत्साहित करावेत. त्यांच्यासाठी प्रशिक्षण ठेवावेत. या बचत गटाकडून बनविलेले झेंडे खरेदीसाठी मागणी नोंदवावी. तसेच या कालावधीत शासन निर्देशानुसार राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना देण्यासाठी जनजागृतीचे कार्यक्रम घ्यावेत. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी ऑनलाईन नोंदणीसह तिरंगा उत्पादक, विक्रेते, जे लोक उत्स्फूर्तपणे राष्ट्रध्वज दान देऊ इच्छितात अशा दात्यांची निवड करावी. अडीच लाख राष्ट्रध्वजाच्या निर्मितीसाठी जिल्ह्यातील बचतगट, खाजगी उत्पादक, खादी भांडार, ॲमेझॉन आदींशी समन्वय साधावा. ज्या इच्छुकांना गरीब घरांसाठी राष्ट्रध्वज दान करण्याची इच्छा आहे अशा व्यक्ती, संस्थांचीही यात मदत घ्यावी, अशा सूचना दिल्या.

तसेच भारतीय स्वांतत्र्यांचा अमृत महोत्सवानिमित्त ‘स्वराज्य महोत्सवा’चे आयोजन करण्यात येत आहे. हा उपक्रम जनतेच्या मनात स्वांतत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल भावना कायम स्वरुपी मनात राहावी व त्याचे संस्मरण व्हावे या उद्देशाने दि. 9 ते 17 ऑगस्ट, 2022 या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या निर्देशानुसार या कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात यावेत, अशा सूचनाही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सर्व संबंधित यंत्रणेला दिल्या.

******

No comments: