31 May, 2024
हिवताप प्रतिरोध महिन्यात ‘एक दिवस एक कार्यक्रमा’तून जनजागृती
हिवताप प्रतिरोध महिन्यात ‘एक दिवस एक कार्यक्रमा’तून जनजागृती
हिंगोली (जिमाका), दि. 31: राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जून महिना हा हिवताप प्रतिरोध महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे. या महिन्यात हिवताप व ईतर किटकजन्य आजाराविषयी जनतेमध्ये जागृती निर्माण होऊन त्याचा प्रतिरोध उपाययोजनाच्या अंमलबजावणीमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
हिवताप प्रतिरोध महिन्यात एक दिवस एक कार्यक्रमातून ही जनजागृती घडवून आणण्यात येणार असून, त्या दृष्टीने प्रत्येक वर्षी विविध उपक्रमाव्दारे हिवताप प्रतिरोध महिना जून महिण्यात साजरा करण्यात येतो. या जनजागरण मोहिमेमध्ये गाव पातळीवर हिवतापाची लक्षणे, उपचार व हिवताप प्रतिरोधाच्या विविध उपाययोजनांची माहिती योग्य त्या माध्यमाव्दारे पोहचविणे आवश्यक आहे. डासोत्पती प्रतिबंध उपाययोजनांमध्ये सहभाग वाढविणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश असल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
यामध्ये पत्रकार परिषद, खाजगी वैद्यकिय व्यावसायिक सभा, जलद ताप रुग्ण सर्वेक्षण, हस्तपत्रिका वाटप, आशा बळकटीकरणासाठी कार्यशाळेचे आयोजन, कंटेनर सर्वेक्षण, ग्रामीण आरोग्य पोषण आहार समितीची सभा, सर्व स्तरावरून स्वच्छता मोहिमेचे आयोजन, स्वच्छता दिंडीचे आयोजन, डासोत्पत्ती स्थानात गप्पीमासे सोडण्याचा धडक कार्यक्रम, बचत गटाच्या सभा, शिक्षकांसाठी सामाजिक जाणीव, सर्व स्तरावरील फवारणी कार्यक्रमाचे अधिकाऱ्यांनी पर्यवेक्षण करणे व एक दिवस कोरडा पाळणे याविषयी जनजागृती निर्माण करण्यात येणार आहे. तरी हिंगोली जिल्हा अंतर्गत सर्व आरोग्य संस्थेचे अधिकारी व कर्मचारी, आशा वर्कर, ग्रामसेवक, अंगणवाडी ताई, स्थानिक प्रतिष्ठित नागरिकांचा लोकसहभाग वाढवून गावपातळीवरील हिवताप प्रतिरोध महिना साजरा करण्याचे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड यांनी केले आहे.
****
अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
हिंगोली,(जिमाका) दि.३१ : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपजिल्हाधिकारी समाधान घुटुकडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
***
30 May, 2024
शेतकऱ्यांनी कापूस बियाण्यांच्या ठराविक वाणांचा आग्रह धरु नये - विकास पाटील
हिंगोली (जिमाका), दि. 30 : महाराष्ट्र राज्यात कापूस बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. परंतु शेतकऱ्यांनी कापसाच्या विशिष्ट वाणांसाठी आग्रह धरु नये असेआवाहन कृषि संचालक (निविष्ठा व गुण नियंत्रण) विकास पाटील यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्यात कापूस पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र 40.20 लाख हेक्टर आहे. कृषि विद्यापीठाच्या शिफारशीनुसार प्रती हेक्टर 4.2 पाकिटे बियाण्याची आवश्यकता असते. या क्षेत्राकरिता 1 कोटी 70 लाख पाकीटाची आवश्यकता आहे. सर्व कंपन्यांचा आढावा घेतला असता साधारणपणे 1.75 कोटी पाकीटे उपलब्ध आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्यात कापूस बियाण्याची कमतरता नाही. महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांमध्ये कापसाच्या काही वाणांना विशेष मागणी आहे. परंतु त्याच बरोबर इतर कंपन्यांचे कापसाचे वाण सुध्दा अतिशय चांगले उत्पादन देत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस पिकाच्या ठराविक वाणांचीच मागणी करु नये, असे कृषि विभागामार्फत आवाहन करण्यात येत आहे.
केंद्र सरकारने खरीप 2024 साठी कापूस बीजी-II चा दर 864 रुपये निश्चित केला आहे. कापूस बियाणे जादा दराने विक्री करणाऱ्या कृषि सेवा केंद्र तसेच कापूस उत्पादक कंपनी यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. तसेच काही ठिकाणी कापूस जादा दराने विक्री केली असल्याचे निदर्शनास आल्यानंतर कृषि विभागातील स्थानिक कृषि सहाय्यक यांच्या मदतीने संबंधित कापूस बियाण्याचे वाटप कृषि विभागाच्या कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्याचे नियोजन संबंधित जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी केलेले आहे. कापूस बियाणे पाकीटांची जादा दराने विक्री केल्यामुळे जळगाव, धुळे व छत्रपती संभाजीनगर येथे विक्रेत्यांवर कृषि विभागामार्फत गुन्हे दाखल केले आहेत.
राज्यात एकूण एच.टी. बीटी कापूस बियाण्याबाबत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चार ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये 4568.30 किलो बियाणे साठा जप्त करण्यात आले असून त्याचे मूल्य 66.85 लाख रुपये इतके आहे. गडचिरोली जिल्ह्यात 55.32 किंमतीचे 30 क्विंटल बियाणे जप्त करण्यात आले. तसेच नंदूरबार व धुळे जिल्ह्यात तीन ठिकाणच्या कारवाईत 1807 एच.टी. बीटी कापूस बियाणे पाकीटे 37.96 लाख रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आलेला आहे. अमरावती विभागातील यवतमाळ जिल्ह्यात तीन ठिकाणी 113 बियाणे पाकीटे जप्त करण्यात आली असून त्याचे मूल्य 1.55 लाख रुपये इतके आहे. सर्व जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावर भरारी पथकांमार्फत मोहिम स्वरुपात तपासण्या करण्यात आल्या असून त्यानुषंगाने दोषींवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती कृषि संचालक (निवगुनि), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे-1 यांनी दिली आहे.
******
उन्हाळी शिबिरामध्ये बालगृहातील बालिकांना मार्गदर्शन
हिंगोली (जिमाका), दि. 30 : जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि मिरॅकल फाउंडेशन इंडियाच्या संयुक्त विद्यमाने येथील सरस्वती मुलींच्या निरीक्षणगृह व बालगृहात प्रवेशित बालिकांसाठी उज्वल इंग्लीश स्कूल हिंगोली येथे दिनांक 29 मे 2024 रोजी उन्हाळी शिबिराचेआयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये बालगृहातील बालिकांना मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर. आर. मगर हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून मानसशास्त्रज्ञ प्रमोद पडघान, बालकल्याण समितीचे अध्यक्ष सुधाकर इंगोले उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रमोद पडघान यांनी प्रथम देहबोली या विषयावर सखोल मार्गदर्शन करताना देहबोली म्हणजे आपल्या मनात सुरू असलेल्या विचारांचा आरसाच असतो. एखाद्याच्या मनातले जाणून घेण्यासाठी त्याची देहबोली वाचायला शिकले पाहिजे, असे उदाहरणासहित स्पष्ट केले.
बालकल्याण समितीचे अध्यक्ष सुधाकर इंगोले यांनी बालिकांना जीवन जगत असताना त्यांच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारच्या आलेल्या अडचणींना सामोरे जात असताना काय करावे आणि काय करू नये याबाबत मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी बालकांनी आपल्याला असलेले छंद जोपासत असताना त्याचा चांगल्या प्रकारे वापर कसा होईल हे पाहावे. जीवनात यशस्वी होण्यासाठी जिद्द व मेहनत असेल तर यश मिळवणे सोपे असल्याचे स्पष्ट केले.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर. आर. मगर यांनी उन्हाळी शिबिराच्या माध्यमातून बालिकांना त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी एक नवीन संधी उपलब्ध होणार आहे, असे सांगून उन्हाळी शिबिरातील बालिकांना तसेच इयत्ता दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व बालिकांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी बालकांसाठी उन्हाळी शिबिर का महत्त्वाचे आहे, उन्हाळी शिबिरामध्ये घेण्यात येणारे उपक्रम व कार्यक्रमाची रूपरेषा याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा बाल संरक्षण कक्षातील सामाजिक कार्यकर्त्या रेशमा पठाण यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी बालिकांच्या विविध कार्यक्रम घेण्यात आल्या.
या कार्यक्रमासाठी बालकल्याण समिती सदस्य परसराम हेंबाडे, किरण करडेकर, संगीता दुबे, सरस्वती मुलींचे निरीक्षण गृह व बालगृहातील शिक्षक शंकर घ्यार, काळजी वाहक वनिता पवार, संगीता भांदुर्गे, जिल्हा बाल संरक्षण कक्षातील कायदा व परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडित, समुपदेशक सचिन पठाडे, सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे, रेशमा पठाण, अनिरुध्द घनसावंत, चाईल्ड लाइ्नचे प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे, केसर वर्कर सुरज इंगळे इत्यादी उपस्थित होते.
*******
29 May, 2024
जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
हिंगोली (जिमाका), दि. 29 : जागतिक आरोग्य संघटनेकडून ३१ मे हा जागतिक तंबाखू नकार दिवस म्हणून साजरा केला जातो त्या निमित्ताने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, छत्रपती संभाजीनगर तर्फे महिनाभर विविध कार्यशाळा, स्पर्धा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
येथील जिल्हा रुग्णालयात दि. २८ मे रोजी विविध तंबाखू विरोधी पोस्टर स्पर्धा, निबंध स्पर्धा, स्वाक्षरी मोहीम घेण्यात आल्या व विजेत्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिपक मोरे यांच्या हस्ते पारितोषिक वितरीत करण्यात आले. या स्पर्धांच्या माध्यमातून जनतेमध्ये जनजागृती करण्यात आली आणि जिल्हा रुग्णालयातून तंबाखू विरोधी घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये अनेक अधिकारी, कर्मचारी, रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक यांनी स्वाक्षऱ्या करून तंबाखूच्या व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प केला. तसेच त्यानंतर उपस्थितांना तंबाखू विरोधी शपथ देण्यात आली.
या कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिपक मोरे, डॉ. माधवी घट्टे, डॉ. राजू नरवाडे, डॉ. मयूर पाठक, कविता भालेराव, वर्षा शेळके, कुलदीप कांबळे, कुलदीप केळकर, आनंद साळवे, मंगेश गायकवाड, प्रशांत गिरी, अर्चना पवार, येंगडे, अरबाज खान, अंकुश जगताप तसेच शासकीय नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
*******
जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त तंबाखू विरोधी जनजागृती व तंबाखू मुक्तीची शपथ घेण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 29 : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत संपूर्ण राज्य तंबाखू मुक्त करण्याच्या उद्देशाने राज्यस्तरावर राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबवला जातो. या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सर्व शाळा, महाविद्यालयामध्ये तसेच शासकीय कार्यालयामध्ये तंबाखू मुक्तीसाठी जनजागृती होणे गरजेचे आहे.
यावर्षी 31 मे, 2024 रोजी जागतिक आरोग्य संस्थेने प्रस्थापित केलेली थीम "तंबाखू उद्योगाच्या हस्तक्षेपापासून मुलांचे संरक्षण" ही आहे. त्यानुसार जिल्हाभरात जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून दि. 31 मे, 2024 रोजी विविध उपक्रमाच्या माध्यमातून सर्व आरोग्य संस्था, सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, सर्व शाळा, महाविद्यालये तसेच आपल्या अधिनस्त कार्यालयामध्ये तंबाखू विरोधी जनजागृती करावी व तंबाखू मुक्तीची शपथ घेण्यात यावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली यांनी केले आहे.
*******
28 May, 2024
जिल्ह्यात कापूस बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध स्थानिक विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करण्याचे कृषि विभागाचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 28 : जिल्ह्यात कापूस बियाण्याचा पुरेसा साठा उपलब्ध असून बियाणे शेतकऱ्यांना छापील किंमतीच्या मर्यादेत (एमआरपी) उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कृषि विभागाने नियोजन केले आहे. शेतकऱ्यांनी कुठल्याही एकाच वानाचा आग्रह धरु नये. त्यामुळे काळा बाजार आणि अनधिकृत साठेबाजीला चालना मिळते. अधिक उत्पादनासाठी बियाणे हा एकमेव घटक जबाबदार नसून शेतीतील वेळेवर करण्यात येणारी लागवड, आंतर मशागत, संतुलित खत वापर, किड नियंत्रण या बाबीचे काटेकोर नियोजन देखील महत्वाचे आहे.
खरीप हंगामाच्या तोंडावर कापूस बियाण्याचा पुरेसा साठा जिल्ह्यात उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी चिंताग्रस्त होऊन कुठल्याही अनाधिकृत व्यक्तीकडून कपासीचे बियाणे खरेदी करु नये. बियाणे हे अधिकृत परवानाधारक विक्रेत्याकडूनच खरेदी करुन बियाणे खरेदीची पक्की पावती घ्यावी. बियाणे पॉकेट व थोडेसे बियाणे जतन करुन ठेवावे. ग्रामीण भागात कपाशीचे बियाणे विक्री करणारे अनधिकृत व्यक्ती फिरत असल्यास अशा व्यक्तींची तक्रार कृषि विभागाच्या जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीस करावी. अनाधिकृत विक्रेते त्यांच्याकडील कपाशीचे वाणाचे अधिक उत्पादन येते, असे आमिश दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक करण्याची शक्यता असते. शेतकऱ्यांनी त्यांच्या अमिषाला बळी पडू नये. अशा अनाधिकृत विक्रेत्याकडून खरेदी केल्यानंतर पक्की पावती नसल्याने व दुकानदाराचा निश्चित पत्ता नसल्याने नंतर येणाऱ्या उगवण क्षमतेच्या व उत्पादकतेच्या तक्रारीचा पाठपुरावा करणे शक्य होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्याकडूनच बियाणे खरेदी करावेत.
कृषि विभागाच्या भरारी पथकाने मौजे येळी ता.जि.हिंगोली येथे भेट दिली असता तेथील काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेजारील राज्यातून वेगवेगळ्या वाणांचे कापूस बियाणे एकत्रित रितसर पावतीद्वारे खरेदी केल्याचे आढळून आले आहे. परंतु सदर वाण हे स्थानिक बाजारपेठेत मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी स्थानिक परवानाधारक विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावे,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केलेआहे.
*******
मतमोजणीसाठी नियुक्त सर्व पथक प्रमुखांनी दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडावी - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
हिंगोली (जिमाका), दि. 28 : सर्व पथक प्रमुखांनी 15-हिंगोली लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी नेमून दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.
हिंगोली लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या अनुषंगाने सर्व पथक प्रमुखांची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, समाधान घुटुकडे यांच्यासह सर्व पथक प्रमुख उपस्थित होते.
यावेळी मतमोजणीसाठी नियुक्त पर्यवेक्षक, सहायक, सूक्ष्मनिरीक्षकाचे कार्य, जबाबदारी आणि कर्तव्याबाबत तसेच मतमोजणीसाठी करावयाच्या कामकाजाबाबत उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी सादरीकरणाद्वारे सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी मतमोजणी केंद्रावर कायदा व सुव्यवस्था, मतमोजणीसाठी नियुक्त कर्मचारी, सरमिसळ प्रक्रिया, सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती, मतदान प्रतिनिधींची व्यवस्था, सीसीटीव्ही, व्हिडिओ चित्रीकरण, इटीपीबीएस, टपाली मतमोजणी, संपर्क कक्ष, माध्यम कक्ष, एन्कोअर, संगणक टीम, मतमोजणीची व्यवस्था, विद्युत पुरवठा, स्ट्राँग रुम आणि मतमोजणी केंद्रावरील व्यवस्था, आवश्यक साहित्य पुरवठा, पाणी, स्वच्छता गृह, जेवणाची व्यवस्था, वाहन व्यवस्था यासह विविध विषयाचा आढावा घेऊन सर्व संबंधित पथक प्रमुखांनी आपापली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडावी, अशा सूचना केल्या.
यावेळी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी कायदा व सुव्यवस्था याची माहिती दिली. तसेच उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे यांनी पथक प्रमुखनिहाय नेमून दिलेल्या कामाची माहिती दिली.
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडून मतमोजणी केंद्रावरील स्ट्राँग रुमची पाहणी
सर्व पथक प्रमुखांची आढावा बैठक झाल्यानंतर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मतमोजणी केंद्रावरील स्ट्राँग रुम व आवश्यक त्या सोयीसुविधांची माहिती घेतली. यावेळी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, विविध पथक प्रमुख उपस्थित होते.
******
मतमोजणीसाठी नियुक्त पर्यवेक्षक व सहायकाना दिले प्रशिक्षण
हिंगोली (जिमाका), दि. 28 : 15-हिंगोली लोकसभा मतदार संघाची मतमोजणी दि. 4 जून, 2024 रोजी होत आहे. या मतमोजणीसाठी नियुक्त सूक्ष्म निरीक्षक, पर्यवेक्षक व त्यांच्या सहायकांनी त्यांना मतमोजणीची देण्यात आलेली जबाबदारी चोखपणे पार पाडून निवडणूक प्रक्रिया यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.
हिंगोली लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या अनुषंगाने सूक्ष्म निरीक्षक, पर्यवेक्षक व सहाय्यकांचे द्वितीय प्रशिक्षण आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी सहायक जिल्हाधिकारी मेघना कावली, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, समाधान घुटुकडे यांच्यासह हिंगोली लोकसभा मतदार संघातील सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मतमोजणीसाठी नियुक्त पर्यवेक्षक, सहायक, सूक्ष्मनिरीक्षकाचे कार्य, जबाबदारी आणि कर्तव्याबाबत तसेच मतमोजणीसाठी करावयाच्या कामकाजाबाबत पीपीटीच्या साह्याने उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणास निुयक्त सूक्ष्म निरीक्षक, पर्यवेक्षक व त्यांचे सहायक उपस्थित होते.
*******
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
हिंगोली (जिमाका), दि. 28 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त उपजिल्हाधिकारी समाधान घुटुकडे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी किनवटच्या सहायक जिल्हाधिकारी मेघना कावली, नायब तहसीलदार डी. एस. जोशी, सचिन जोशी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
******
27 May, 2024
मासिक पाळी स्वच्छता दिनाचे महत्त्व
आज मासिक पाळी स्वच्छता दिन. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात 'माता' बनविण्याची सुरुवात करणारा हा क्षण. पण याच काळात स्त्रियांनी आपली शारीरिक स्वच्छता घेणे आवश्यक आहे. या स्वच्छतेबाबतची माहिती देणारा हा लेखप्रपंच. माहिती देत आहेत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके
जागतिक मासिक पाळी दिन दरवर्षी 28 मे रोजी साजरा केला जातो. महिला व मुलींना मासिक पाळीचे व स्वच्छतेचे महत्त्व सांगून आरोग्य शिक्षण देऊन आजारांपासून प्रतिबंध व आरोग्याचे समर्थन करणे, संवर्धन करणे, जनजागृती करणे हा महत्त्वाचा उद्देश आहे. आपल्याकडे 50 टक्केपेक्षा अधिक मुली व महिलांना मासिक पाळीच्या आरोग्याच्या समस्या भेडसावतात.
मासिक पाळी स्वच्छता दिन-2024 यावर्षीचे जागतिक घोष वाक्य: "Together for a Period Friendly World" असे आहे. मासिक पाळी आणि त्यासंदर्भातील स्वच्छता याविषयी जागरूकता निर्माण करणे हा त्यामागचा हेतू आहे. महत्त्वाच्या बाबीवर महिला व मुलींना मासिक पाळीत व्यवस्थापन कसे करावे, याबाबत जागरूकता निर्माण व्हावी यासाठी आरोग्य शिक्षण देणे महत्त्वाचे ठरते..
मासिक पाळी या विषयावर गैरसमज व समाजातील जुन्या परंपरागत रुढी परंपरा यातून अनेक सामाजिक व आरोग्यविषयक प्रश्न दूर करणे महत्त्वाचे ठरते.
शालेय शिक्षणापासूनच मुलींना होणारे बदल व त्याचा स्वीकार याविषयी आरोग्य शिक्षण देणे गरजेचे आहे. मासिक पाळीची सुरुवात ही एक नैसर्गिक क्रिया आहे. मुलींमधील भीतीचे व त्यांच्या मनातील संभ्रम दूर करणे आवश्यक आहे. शारीरिक, मानसिक व भावनिक बदलांविषयी मुलींमध्ये जनजागृती व्हावी. मासिक पाळीतील स्वच्छता सॅनिटरी पॅडचा उपयोग व घरगुती वापरण्यात येणाऱ्या कपडी घड्या योग्य निर्जंतुकीकरण व हाताळणे व याबाबत आरोग्य शिक्षण द्यावे. मुलींमध्ये होणारे किरकोळ त्रास आहार, विश्रांती व्यायाम याविषयी माहिती देण्यात यावी.
मासिक पाळी स्वच्छता देणे महत्त्वाचे का ?
गर्भाशयाच्या कर्करोगाचा आजार व प्रजनन संस्थांचे आजार यापासून प्रतिबंधक महत्त्वाचा ठरतो.
मासिक पाळीविषयी आरोग्य शिक्षणातून मुलींमध्ये भावनिक आरोग्यविषयक सशक्तपणा निर्माण होतो.
मासिक पाळी या विषयावर मोकळेपणाने आरोग्य शिक्षण व चर्चा झाल्यास मुलींच्या शंकांचे समाधान होते
सामाजिक व आर्थिक लाभ प्राप्त होतो.
मुलींमध्ये होणारे रक्तक्षयाचा प्रतिबंध गोळ्याचे वाटप करून भविष्याची निरोगी माता व निरोगी पिढी बनविण्यास मदत होते, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी दिली आहे.
संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली
********
24 May, 2024
सेनगाव तालुक्यात अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनावर धडक कारवाई • अंदाजे तीस लाखाचा मुद्देमाल जप्त
हिंगोली (जिमाका), दि. 24 : सेनगाव तालुक्यात अवैध रेतीची वाहतूक होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्यामुळे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी संपूर्ण तालुक्यामध्ये 24 तास फिरते पथक व लिंबाला तांडा आणि बरडा पिंपरी येथील शासकीय रेती डेपोवर कार्यरत वेळेमध्ये म्हणजे सकाळी सहा ते सायंकाळी सहापर्यंत बैठे पथकाची नियुक्ती केली आहे. या पथकामध्ये तहसील कार्यालय सेनगाव येथील तहसीलदार, नायब तहसीलदार, अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, तलाठी, महसूल सहायक, कोतवाल यांची नियुक्ती केली आहे.
पहिल्याच दिवशी दिनांक 23 मे रोजी फिरत्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एमएच-38-एक्स-1010 या क्रमांकाचा रेतीने भरलेला हायवा अवैध वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे जप्त करून पोलीस स्टेशन सेनगाव येथे जमा करण्यात आला आहे. या कार्यवाहीमध्ये प्रभारी तहसीलदार अनिल सरोदे, मंडळ अधिकारी घुगे, बोडखे, तलाठी पठाण, प्रशांत देशमुख, काळबांडे, दिनेश ढगे व कोतवाल गिरी यांचा समावेश होता. या कार्यवाहीत अंदाजे तीस लाखाचा मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशन सेनगाव यांच्या ताब्यात देण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी दिली आहे.
******
तोंडापूर येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये कृषी कौशल्य विकास अंतर्गत सेंद्रीय शेतकरी प्रशिक्षणाला सुरुवात
हिंगोली (जिमाका), दि. 24 : तोंडापूर येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये 22 मे ते 20 जून, 2024 या कालावधीत कृषी कौशल्य विकास योजनेअंतर्गत सेंद्रीय शेतकरी प्रशिक्षणाला सुरुवात झाली आहे. या प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. पी. पी. शेळके म्हणाले, या प्रशिक्षणाचा लाभ हिंगोली जिल्ह्यातील 25 प्रशिक्षणार्थींना होणार आहे. या प्रशिक्षण कालावधीत विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन प्रशिक्षणार्थींना भेटणार आहे. मार्गदर्शन करत असताना प्रशिक्षणार्थींनी आपल्या जीवनशैलीमध्ये नवीन उद्योग व सकारात्मक विविध कौशल्य विकासाच्या योजनेचा लाभ प्रशिक्षणार्थीना घ्यावा. प्रशिक्षणाचा प्रसार इतर प्रगतशील शेतकरी व नवयुवकांना जनजागृती करावी, असे सांगून सेंद्रीय शेतीचे विविध टप्पे व मार्गदर्शक तत्वे यावर प्रशिक्षणार्थींना सखोल मार्गदर्शन केले.
तसेच यावेळी अजयकुमार सुगावे विषय विशेषज्ञ (पीक संरक्षण), सौ. रोहिणी शिंदे विषय विशेषज्ञ (गृहविज्ञान), डॉ. अतुल मुराई विषय विशेषज्ञ (कृषी विस्तार), एस. पी. खरात विषय विशेषज्ञ( मृदाशास्त्र), डॉ. कैलास गीते कार्यक्रम सहाय्यक (पशु विज्ञान) यांनी आपापल्या विभागाचे सेंद्रीय शेतीबद्दल प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन केले.
उदघाटन समारंभाचे आभार प्रदर्शन डॉ.अतुल मुराई यांनी केले. या कार्यक्रमासाठी उपस्थित कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
*******
22 May, 2024
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची नियुक्ती
हिंगोली (जिमाका), दि. 22 : हिंगोली जिल्ह्यात 23 मे रोजी बुध्द पोर्णिमा साजरी करण्यात येणार आहे. या सण, उत्सव काळात जिल्ह्यात शांतता अबाधित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. या उत्सवानिमित्त जिल्ह्यात कँडल मार्चचे आयोजन करण्यात येते. परंतु या काळात शुल्लक कारणांवरून अशांतता निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अचानक निर्माण होते. या अचानक उद्भवलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीस तोंड देण्यासाठी बंदोबस्तातील अधिकाऱ्यांसोबत 13 विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची नियुक्ती जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 अन्वये केली आहे.
या कालावधीत शहरी व ग्रामीण भागातील हा प्रश्न हाताळण्यासाठी जिल्ह्यातील 13 पोलीस स्टेशनसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे 13 विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांना नियुक्त करण्यात आले आहे. हिंगोली शहर पोलीस स्टेशनसाठी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी उमाकांत पारधी, हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनसाठी हिंगोली उपविभागीय अधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार पी. एन. रुषी, नरसी नामदेव पोलीस स्टेशनसाठी नायब तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी नकुल पोळेकर, बासंबा पोलीस स्टेशनसाठी हिंगोली महसूल विभागाचे नायब तहसीलदार एम. एस. खंदारे, वसमत शहर पोलीस स्टेशनसाठी वसमतचे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांची नियुक्ती केली आहे.
वसमत ग्रामीण पोलीस स्टेशनसाठी वसमत उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे नायब तहसीलदार अशोक भोजने, हट्टा पोलीस स्टेशनसाठी वसमतचे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी शारदा दळवी, कुरुंदा पोलीस स्टेशनसाठी वसमतचे महसूल विभागाचे नायब तहसीलदार विलास तेलंग, कळमनुरी पोलीस स्टेशनसाठी कळमनुरीचे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी क्रांती डोंबे, बाळापूर पोलीस स्टेशनसाठी कळमनुरीच्या तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी सुरेखा नांदे यांची, औंढा नागनाथ पोलीस स्टेशनसाठी नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव यांची, सेनगाव पोलीस स्टेशनसाठी नायब तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी डी. के. गायकवाड यांची, गोरेगाव पोलीस स्टेशनसाठी सेनगाव येथील महसूल विभागाचे नायब तहसीलदार अनिल सरोदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नियुक्त दंडाधिकाऱ्यांची त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या कार्यक्षेत्राच्या हद्दीत जिल्ह्यात सकल मराठा आरक्षण आंदोलन काळात विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. तसेच उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांनी नेमून दिलेल्या पोलीस स्टेशनशिवाय त्यांच्या उपविभागावर दंडाधिकारी म्हणून नियंत्रण ठेवावे लागणार आहे. तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांनी त्यांना नेमून दिलेल्या पोलीस स्टेशनशिवाय त्यांच्या तालुक्यात कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नियंत्रण ठेवण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी श्री.पापळकर यांनी दिले आहेत.
*****
गावात चारा व पाणी टंचाईची समस्या भासल्यास संबंधित तहसीलदारांना माहिती द्यावी- जिल्हाधिकारी
हिंगोली (जिमाका), दि. २२ : दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने मा. मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार हिंगोली जिल्ह्यातील सर्व जनतेनी आपल्या गावामध्ये चारा टंचाई किंवा पाणी टंचाईची समस्या भासत असल्यास या बाबतची लेखी माहिती संबंधीत तहसीलदार यांच्याकडे सादर करावी. जेणे करुन प्रकरणात 5 दिवसात चौकशी करुन आवश्यक ती उपाययोजना करण्याकरीता निर्णय घेण्यात येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
***
21 May, 2024
किर्गिस्तानमध्ये असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधावा
हिंगोली (जिमाका), दि. 21 : किर्गिस्तानमधील पाकिस्तानी युवक आणि स्थानिक युवकांमध्ये वाद झाल्यानं हिंसाचार उफाळला आहे. भारतातून तसेच मुख्यतः महाराष्ट्रातून पाचशेहून अधिक विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी किर्गिस्थानमध्ये असून त्यांना हिंसाचाराच्या फटका बसण्याची शक्यता आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन घेण्याचा स्थानिक प्रशासनाचा निर्णय असून परीक्षेनंतर जूनमध्ये सर्व विद्यार्थी भारतात परतण्याचा अंदाज आहे. सर्व विद्यार्थी सुरक्षित असल्याची माहिती आहे.
हिंगोली जिल्ह्यातील विद्यार्थी किर्गिस्थानमध्ये असतील तर त्यांच्या पालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी भ्रमणध्वनी क्र. 9405408939 वर संपर्क साधावा. तसेच विद्यार्थ्यांबाबत काही अडचण असल्यास माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
*******
चालू शैक्षणिक वर्षापासून स्वाधार योजना ऑनलाईन
हिंगोली (जिमाका), दि. 21 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज शैक्षणिक वर्ष सन 2024-2025 पासून ऑनलाईन पध्दतीने सादर करण्यासाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, हिंगोली कार्यालयाकडून https://syh.mahasaamajkalyan.in/ हे ऑनलाईन संकेतस्थळ तयार करण्यात आलेले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी वरील संकेतस्थळावर भेट देऊन सन 2024-2025 हे शैक्षणिक सुरु झाल्यानंतर जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांनी सदर संकेतस्थळावर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.
******
जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त शपथ
हिंगोली (जिमाका), दि. 21 : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावरील दहशतवादी हल्ल्याचा विरोध म्हणून ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस’पाळण्यात येतो. या दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या उपस्थितीत शपथ घेण्यात आली.
यावेळी उपजिल्हाधिकारी समाधान घुटुकडे, नायब तहसीलदार डी. एस. जोशी, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक नागेश बोलके यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
*****
20 May, 2024
इयत्ता बारावीचा निकाल आज शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार निकाल
हिंगोली (जिमाका), दि. 20 : फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र, इयत्ता 12 वी परीक्षेचा निकाल 21 मे 2024 रोजी दुपारी 1.00 वाजता ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात येणार आहे. शिक्षण महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हे निकाल पाहता येणार आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेचा निकाल महामंडळाने अधिकृत केलेल्या संकेतस्थळांवर जाहीर होणार आहे. ही संकेतस्थळे खालील प्रमाणे आहेत.
1) mahresult.nic.in
2) http://hscresult.mkcl.org
3) www.mahahsscboard.in
4)https://results.digilocker.gov.in
5)www.tv9marathi.com
6)http://results.targetpublications.org
परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषय निहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवर उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आऊट) घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker app मध्ये डिजीटल गुणपत्रिका संग्रहीत करुन ठेवण्याची सोय उपलब्ध आहे.
यासोबतच mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल. गुण पडताळणीसाठी व उत्तर पत्रिका छायाप्रतिसाठी दिनांक 22 मे, 2024 ते 5 जून 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल, अशी माहिती विभागीय शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
*******
अति जोखमीच्या भागातील कामगारांची कुष्ठरोग तपासणी
हिंगोली (जिमाका), दि. 20 : यावर्षी हिंगोली जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत कुष्ठरोग मुक्त हिंगोली जिल्हा करण्यासाठी एप्रिल व मे महिन्यामध्ये अति जोखमीच्या भागातील कामगारांची कुष्ठरोग तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये वीटभट्टी, खडी क्रेशर व बांधकामावर जाऊन कुष्ठ रुग्णांची तपासणी करण्यात आली.
या मोहिमेत जिल्ह्यातील 87 वीटभट्टी मधील 1345 कामगारांची, 13 खडी क्रेशर केंद्रावरील 212 कामगारांची तसेच एका बांधकामावरील 27 कामगारांची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीतील खडी क्रेशर केंद्रावरील तपासणीमध्ये एक कुष्ठरुग्ण आढळून आला असून त्याला बहुविध औषधोपचार सुरू करण्यात आला आहे.
या सर्वेक्षणासाठी जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचारी तसेच कुष्ठरोग कार्यालयातील अवैद्यकीय पर्यवेक्षक मंचक पवार, चंद्रकांत पाटील, अवैद्यकीय सहाय्यक जाधव, जटाळे तसेच पीएमडब्ल्यू जयश्री ठाकरे, श्रीमती नाझिया, मुळे, संजय भोकरे, पथरोड, कुष्ठरोग तंत्रज्ञ भालेराव यांनी मेहनत घेतली.
कुष्ठरोगाची लक्षणे
न खाजणारा व न दुखणारा बधिर चटा, कानाचा पाळा जड होणे, हातापायाला मुंग्या येणे, हातापायाला जखम होणे, हाताची बोटे वाकडी होणे, हातामध्ये कमजोरपणा येणे अशी लक्षणे आढळल्यास नजीकच्या शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये संपर्क साधावा. सर्व शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये कुष्ठरोगाचे सर्व औषधोपचार मोफत देण्यात येत आहेत, असे आवाहन सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ.सुनील देशमुख यांनी केले आहे.
******
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी ऑनलाईन प्रस्ताव सादर करावेत
हिंगोली (जिमाका), दि. 20 : शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविण्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपूण्यपूर्ण कामगिरी केलेल्या 5 वर्षापेक्षा अधिक व 18 वर्षापर्यंतच्या मुलांना केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार दिला जातो.
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-2025 साठी दिनांक 31 जुलै, 2024 पर्यंत https://awards.gov.in या संकतेस्थळावर स्वत: मुले किंवा त्यांच्या वतीने राज्य सरकार, केंद्र शासित प्रदेश, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, पंचायत राज संस्था, नागरी स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था आदींनी ऑनलाईन प्रस्ताव सादर करावेत. पोर्टल व्यतिरिक्त प्राप्त होणारे नामनिर्देशन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. जिल्ह्यातील अशा प्रकारच्या जास्तीत जास्त मुलांचे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
*******
हट्टा येथील वेअर हाऊस व मशिनरी शेड बांधकामास स्मार्टच्या संचालकाची भेट
हिंगोली (जिमाका), दि. 20 : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प अंतर्गत वसमत तालुक्यातील हट्टा येथील हट्टावाला शेतकरी उत्पादक कंपनीच्या वेअर हाऊस व मशिनरी शेडच्या बांधकामास पुणे येथील संचालक तथा स्मार्टचे प्रमुख अंमलबजावणी कक्ष दशरथ तांभाळे यांनी भेट देउन पाहणी केली. तसेच कंपनीच्या संचालकांना मशिनरी व इतर कामांच्या निविदेची तात्काळ कार्यवाही करुन इतर कामे पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या.
यावेळी आत्माचे प्रकल्प संचालक तथा स्मार्ट प्रकल्पाचे प्रमुख जिल्हा अंमलबजावणी कक्ष बी. आर. वाघ, स्मार्टचे नोडल अधिकारी जी. बी. बंटेवाड, पुरवठा व मूल्य साखळी तज्ञ जी. एच. कच्छवे, जितेश नालट, वित्त प्रवेश सल्लागार व कंपनीचे संचालक झोयब सिद्दिकी यांच्यासह इतर संचालक उपस्थित होते.
*******
17 May, 2024
व्यवसाय प्रशिक्षणासाठी नोंदणीकृत संस्थांकडून 30 मेपर्यंत प्रस्ताव आमंत्रित
हिंगोली (जिमाका), दि. 17 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) हिंगोलीमार्फत मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीमधील विद्यार्थी व विद्यार्थिंनींना उपजीविकेचे साधन उपलब्ध व्हावे व महामंडळाचा उद्देश सफल व्हावा, यासाठी विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
महामंडळामार्फत विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता कार्यक्रमांतर्गत शासनाच्या स्कील इंडिया अभियानांतर्गत नोंदणीकृत संस्थांकडून 30 मेपर्यंत प्रस्ताव आमंत्रित करण्यात आले आहेत. हे प्रस्ताव जिल्हा कार्यालय साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, रिसाला बाजार, हिंगोली येथे कार्यालयीन वेळेत दाखल करावेत. यानंतर येणारे संस्थेचे प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत, असे जिल्हा व्यवस्थापक टी. आर. शिंदे यांनी कळविले आहे.
******
जिल्ह्यात शस्त्र व जमावबंदी आदेश लागू
हिंगोली (जिमाका), दि. 17 : मे महिन्यात विविध सण-उत्सव, स्पर्धा आणि महापुरुषांच्या जयंती, सभा, बैठका, धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात शस्त्र व जमावबंदी आदेश लागू करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.
दि.21 मे, 2024 रोजी श्री. नृसिंह जयंती, 23 मे रोजी बुद्ध पौर्णिमा, 28 मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू आहे. सध्या घडणाऱ्या राजकीय, सामाजिक घडामोडी, नागरिक, विविध संघटना, पक्ष यांच्या मागण्यासंदर्भात मोर्चे, धरणे, आंदोलने, रास्ता रोको, उपोषणे करीत असतात. अशा विविध घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे विविध प्रश्न हाताळण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात दिनांक 16 मे, 2024 रोजी मध्यरात्रीपासून ते दिनांक 30 मे, 2024 रोजी मध्यरात्रीपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) अन्वये शस्त्र व जमावबंदी आदेश लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.
त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्याजवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तूजवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटकद्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे, किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करुन ठेवणार नाही, किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भांडणे अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल, अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तू जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समूहाच्या भावना जाणून बुजून दुखावतील, या उद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तीं रस्त्यावर जमण्यास सक्त मनाई करण्यात आले आहे. हा आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही, असे जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
*******
परिवहन विभागाच्या 'सारथी प्रणाली 4.0' चे तांत्रिक कामकाज लवकरच पूर्ण • जिल्ह्यातील नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 17 : नागरिकांना अनुज्ञप्ती (लायसन्स) व अनुज्ञप्तीविषयक इतर सर्व कामकाजासाठी परिवहन विभागाच्या सारथी 4.0 प्रणालीवर अर्ज सादर करणे व शासकीय शुल्क भरणे आवश्यक असते. परंतु दि. 18 मे, 2024 पर्यंत सारथी 4.0 प्रणालीच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्याचे देखभाल व दुरुस्तीचे काम राष्ट्रीय सूचना केंद्रामार्फत सुरु आहे. त्यामुळे परिवहन विभागाची संगणकीय सारथी 4.0 प्रणाली बंद आहे. त्यामुळे अर्जदारांना अर्ज व इतर कामे करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत.
सारथीच्या सर्व्हरचे तांत्रिक कामकाज लवकर पूर्ण होणार असून त्यानंतर अर्जदारांना या प्रणालीवरुन अर्ज करणे सुलभ होईल. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी याची नोंद घेऊन परिवहन विभागास सहकार्य करावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी केले आहे.
******
हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा
हिंगोली (जिमाका), दि. 17 : जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात सर्व शासकीय आरोग्य संस्था व जिल्हा हिवताप कार्यालयात राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा करण्यात आला.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या नेतृत्वात या दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जनतेमध्ये डेंग्यू आजाराची जनजागृती निर्माण व्हावी, प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलबजावणीसाठी जनतेचा सक्रिय सहभाग प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीने विविध उपक्रमाद्वारे राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा करण्यात आला. यावेळी साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश जाधव, सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी सी. जी. रणवीर व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती अभियान राबविण्यात आले. तसेच जिल्ह्यात गटाराच्या ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आले. विविध ठिकाणी डास आळी सर्वेक्षण करण्यात आले. तसेच जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड यांनी या वर्षीचे घोषवाक्य 'समुदायांच्या संपर्कात रहा, डेंग्यूला नियंत्रित करा' असे असल्याचे सांगून राष्ट्रीय किटकजन्य आजार व डेंग्यू या आजाराबाबत मार्गदर्शन केले.
जिल्ह्यात सन 2023 मध्ये 308 रक्तजल नमुने घेण्यात आले. त्यापैकी 2 रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे या वर्षात जिल्ह्यातील 104 गावामध्ये धूर फवारणी करण्यात आली. डेंग्यू या आजाराला आळा घालण्यासाठी जिल्ह्यामध्ये विशेष अबेट राऊंड मोहीम घेण्यात आल्या. यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर यांच्यामार्फत गृह भेटी देऊन किटक शास्त्रीय सर्वेक्षण करून डास आळी आढळून आलेल्या कंटेनरमध्ये अबेट टाकण्यात आले. तसेच आरोग्य शिक्षण दिल्यामुळे डासांच्या सायकलला आळा बसण्यास मदत झाली.
यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड यांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळण्यात यावा, असे आवाहन केले.
डेंग्यू आजाराची लक्षणे
एकदम जोराचा ताप चढणे, अंग दुखणे, स्नायू दुखणे, डोक्याचा पुढचा भाग जास्त प्रमाणात दुखणे, डोके दुखणे, डोळ्याच्या मागील भागात वेदना होणे, मळमळ होणे व उलट्या होणे, त्वचेवर व्रण येणे.
डेंग्यूचा प्रसार
डेंग्यूचा विषाणू संक्रमित एडीस डासाने दंश दिल्यास लोकांमध्ये पसरतो.जगात डेंग्यूचा धोका असलेल्या भागात नागरिक जास्त प्रमाणात राहत असल्यामुळे डेंग्यू हे आजाराचे प्रमुख कारण आहे.एडीस इजिप्ती संक्रमित मादी चावल्यास डेंग्यू होतो.
प्रतिबंधात्मक उपाय योजना
घर आणि घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. घराच्या अवती-भवती अथवा टेरेसवर पडलेल्या रिकाम्या कुंड्या, प्लास्टिकच्या वस्तू, टायर यासारख्या वस्तूमध्ये पाणी साचून त्यात डासाची उत्पत्ती निर्माण होते. त्यामुळे अशी ठिकाणी नष्ट करावीत. खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात. शौचालयाच्या वरच्या पाईपास जाळी बसवावी. अंगभर कपडे वापरावी. झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. आठवड्यातून एक दिवस म्हणून कोरडा दिवस पाळावा. पाण्यासाठी वापरण्यात येणारे भांडी संपूर्ण कोरडी करावी. जेणेकरून डासांनी घातलेली अंडी नष्ट होतील.
*****
16 May, 2024
आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणांनी सतर्क राहावे- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
• शहरातील व ग्रामीण भागातील अनाधिकृत व धोकादायक होर्डींग तातडीने हटवावेत
हिंगोली (जिमाका),दि. 16 : आगामी मान्सूनमध्ये आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी पूर्वनियोजन करुन अधिक सतर्क, समन्वय व तत्परतेने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिल्या.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित मान्सून पूर्वतयारी बैठकीत श्री. पापळकर बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम यांची उपस्थिती होती.
यावेळी श्री. पापळकर म्हणाले की, मान्सूनमध्ये उद्भवणाऱ्या विविध आपत्तींचा आपणांस सामना करावा लागणार आहे. हे लक्षात ठेवूनच सर्व यंत्रणांनी पूर्वनियोजन करावे आणि सतर्क राहावे. यासाठी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करुन त्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार करावा. या आराखड्यात जिल्ह्यातील पूरप्रवण गावांचा सर्व नियोजनासह समावेश करावा. पोलीस प्रशासनाने पोलीस स्टेशननिहाय अधिकाऱ्यांचे नाव व भ्रमणध्वनी याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयास विहित नमुन्यात सादर करावी. तसेच तालुकानिहाय तयार करण्यात आलेले शोध व बचाव पथक अद्ययावत करुन नेहमी सतर्क ठेवावे, अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या.
जिल्ह्यातील सर्व शहरे व ग्रामीण भागातील अनाधिकृत होर्डींग्जचा सर्वे करावा व अनाधिकृत, धोकादायक असलेले होर्डींग्ज हटविण्याचे काम तातडीने करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिल्या.
तसेच पाटबंधारे विभागाने जिल्ह्यातील पूरप्रवण गावाला भेटी देऊन भविष्यात पूर येणार नाही, यासाठी उपाययोजनांची माहिती घेऊन तशा उपाययोजना कराव्यात. तसेच पूरप्रवण क्षेत्राबाबतचा नकाशा व माहिती तात्काळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षास सादर करावी. तसेच धरणामध्ये पाण्याची आवक व जावक याबाबत माहिती दररोज कळवावी. धरणातून पाणी सोडल्याने किती गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते याबाबतही तात्काळ कळविल्यास नागरिकांसह पशुंचे वेळेत संरक्षित ठिकाणावर स्थलांतर करणे सोईचे होईल. तसा इशारा दिल्यास तयारी करण्यास पुरेसा वेळ मिळेल, असेही यावेळी जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले.
जिल्ह्यात 70 पूरप्रवण गावे आहेत. पावसाळ्यात जिल्ह्यातून वाहणाऱ्या नदी काठावरील या गावांना संभाव्य महापुराबाबत सतर्क करणे, क्षेत्रीय अधिकाऱ्यांना वेळोवेळी संदेश देण्याची जबाबदारी संबंधित गावातील समितीवर सोपविण्यात यावी. त्यांच्या संपर्क क्रमांकाची यादी तयार करून ती जिल्हा मुख्यालयाला कळविण्यात यावी. आपत्ती काळात तात्काळ मदत व बचाव कार्य करण्यासाठी जिल्हा स्तरावर 24 तास आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. याच धर्तीवर सर्व विभागांनी सुरु करण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करावेत. विभागप्रमुखाने 24 तास हा कक्ष कार्यरत राहील, याबाबत दक्ष राहावे, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी दिले.
आपत्कालीन परिस्थितीमध्ये संपर्क आणि वाहतूक व्यवस्था या बाबी महत्वाच्या आहेत. त्यामुळे तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावरील आपत्कालीन कक्षांनी संपर्कात राहावे. ग्रामीण भागातील पुराची स्थिती हाताळण्यासाठी गटविकास अधिकारी यांनी सजग व्हावे. पूरपरिस्थितीबाबत कोतवाल आणि पोलिस पाटील यांच्याकडून दवंडी देण्यात यावी. पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी तालुकास्तरावर अंतर्गत बैठक घेण्यात यावी. तसेच प्रत्येक गावात ग्राम सुरक्षा समिती स्थापन करण्यात यावी. या समितीशी आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधता येईल. अतिवृष्टीच्या काळात वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील राहावे. पुराच्या काळात नागरिकांना स्थलांतरीत करण्याची आवश्यकता भासल्यास निवारा केंद्राच्या ठिकाणी आरोग्यविषयक तसेच इतरही सर्व सुविधा पुरविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच मान्सूनपूर्व काळात या सर्व साहित्याबाबत सर्व तहसीलदारांनी मॉक ड्रिल घेत साहित्य सुस्थितीत असल्याची खात्री करून घेण्याचे निर्देश दिले.
पूर परिस्थितीमध्ये पावसाच्या प्रमाणावर लक्ष ठेवण्यात यावे. त्यासाठी आंतरजिल्हा समन्वय ठेवण्यात यावा. नागरिकांना मदत करण्यासाठी आवश्यक साहित्य, लाईफ सेफगार्ड जॅकेट, बोटी, पुराच्या काळात जीवितहानी वाचविण्यासाठी आवश्यक दोरखंड उपलब्ध करावेत. पुराच्या काळात सार्वजनिक उद्घोषणेची व्यवस्था करण्यात यावी. वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावरील वाळलेली झाडे उन्मळून पडून घरे, वाहनांचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशी झाडे तोडण्यात यावी. धरण क्षेत्रात पाऊस जादा झाल्यास पाणी सोडण्यात येते, याची माहिती बाधित क्षेत्रातील नागरिकांना देण्यात यावी. पाणी सोडल्यामुळे शेती आणि घरांचे नुकसान होऊ नये, याची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी केले.
महावितरणने जिल्ह्यातील सर्व रोहित्रांची व लोंबकळणाऱ्या तारांची तपासणी करुन त्याची देखभाल दुरुस्ती करुन घ्यावी. तसेच यामुळे अपघात होणार नाही याची काळजी घ्यावी. पूर परिस्थितीत गावामध्ये पाणी शिरल्यास येथील विद्युत पुरवठा खंडीत करणे तसेच सुरळीत करणे याबाबत योग्य नियोजन करावे. नादुरुस्त विद्युत रोहित्र (ट्रान्सफार्मर) तात्काळ 48 तासात दुरुस्त अथवा बदलून द्यावेत. जलजीवन मिशन योजनेंतर्गत पाणी पुरवठा करण्यासाठी तात्काळ वीज जोडणी करुन द्यावी, अशा सूचना दिल्या.
आरोग्य विभागानेही नियंत्रण कक्ष स्थापन करुन आपत्ती व्यवस्थापनासाठी समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करुन अहवाल सादर करावा. पावसाळ्यात उत्पन्न होणाऱ्या साथीच्या रोगराईंना वेळीच थांबविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात मुबलकपणे औषधी आणि ब्लिचिंग पावडरची साठवणूक सुरक्षितपणे ठेवून त्याचा योग्य उपयोग करावा. जिल्हा परिषदेने आपल्या अंतर्गत येणाऱ्या आरोग्य विभागासह इतर संबंधित विभागांमध्ये समन्वय राखण्याचेही यावेळी जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी सांगितले.
नगरपालिका प्रशासनानेही नियंत्रण कक्ष कार्यान्वित करुन, अग्निशमन यंत्रणा सज्ज ठेवून आपत्ती व्यवस्थापनासाठी समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. तसेच शहरातील नालेसफाई इत्यादी बाबतची कामे करुन घ्यावी. शहरातील वस्तीमध्ये पाणी शिरणार नाही, यासाठी योग्य नियोजन करुन शहरातील नालेदुरुस्ती करावी जेणेकरुन शहरामध्ये पाणी तुंबणार नाही व पाण्याचा विसर्ग होण्यास मदत होईल, असे पहावे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने व जिल्हा परिषद बांधकाम विभागाने रस्ते दुरुस्ती करावी, रस्त्यावरील धोकादायक व वाळलेल्या झाडांपासून अपघात होणार नाही याबाबत योग्य नियोजन करावे. तसेच रेल्वे प्रशासन, राज्य परिवहन महामंडळ, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, पाटबंधारे विभाग, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, भारत संचार निगम लिमिटेड, राज्य राखीव पोलीस दल क्र. 12, गृहरक्षक दल, पंचायत समिती या बरोबरच आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित असणाऱ्या सर्व विभागांनी आपापल्या यंत्रणांची पूर्वतयारी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी यावेळी दिल्या.
यावेळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रोहित कंजे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अंनता जोशी, सर्व तहसीलदार, सर्व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्यासह जिल्हा प्रशासनातील पशुसंवर्धन, अन्न व औषध प्रशासन, कृषि, पाटबंधारे विभाग, महावितरण, आरोग्य विभाग, नगर पालिका, परिवहन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी सर्व विभागाचे अधिकारी या आढावा बैठकीला उपस्थित होते.
******
15 May, 2024
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी सर्व राष्ट्रीय कार्यक्रमासह आरोग्य विभागाचा घेतला आढावा
हिंगोली (जिमाका), दि. 15 : येथील सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा प्रशिक्षण संघामध्ये दि. 14 मे रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके व जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सुनिल देशमुख, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अभिजित बांगर यांनी सर्व तालुका आरोग्य अधिकारी, सर्व वैद्यकीय अधिकारी व जिल्हास्तरीय पर्यवेक्षक यांची आढावा बैठक घेऊन मार्गदर्शन केले.
यामध्ये प्रामुख्याने प्रौढ बीसीजी लसीकरण मोहीम सर्वेक्षण, सर्व राष्ट्रीय कार्यक्रमासह माता बाल संगोपन कार्यक्रमांतर्गत नियमित लसीकरण, गरोदर मातांची नोंदणी व तपासण्या, प्रसूती त्याच बरोबर माता मृत्यू व बालमृत्यू बाबत सखोल आढावा घेतला. RCH पोर्टल वर नियमितपणें नोंदी करणे, Uwin ॲप, प्री रजिस्ट्रेशन, प्रत्येक महिन्याच्या 9 तारखेला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान शिबिर आयोजित करण्यात यावे. शिबिरात HIv, Hbsag सिकलसेल, GDM, BP, HB, Urine, थायरॉईड, VDRL, या तपासण्या करण्यात याव्या, आशा सूचना देण्यात आल्या. तसेच कुष्ठरोग कार्यक्रम, प्रधान मंत्री मातृत्व वंदना योजना, साथरोगाबाबत नियमितपणे पाणी नमुने, ब्लीचिंग पावडर नमुने, रक्त नमुने, कीटक शास्त्रीय सर्वेक्षण, सिकलसेल अशा विविध विषयावर सविस्तर आढावा घेऊन मार्गदर्शन केले. तसेच साथरोग उद्भवणार नाही याची दक्षता घेण्याबाबत सूचना दिल्या. यावर्षीचे घोषवाक्य "समुदायांच्या संपर्कात रहा, डेंग्यूला नियंत्रित करा" हे असून दि. 16 मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन सर्व आरोग्य संस्थेत साजरा करण्याच्या सूचनाही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी दिल्या.
यावेळी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतीश रुणवाल, डॉ. संदीप काळे, डॉ सावंत, डॉ. अनुराधा गोरे, डॉ. मेश्राम, अमोल कुलकर्णी, मुनाफ, नाना पारडकऱ, अझर अली. नरेश पत्की, बापु सूर्यवंशी, ज्योती बांगर आदी जिल्हास्तरीय पर्यवेक्षक व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
******
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडून जलेश्वर तलावातील गाळ काढण्याच्या कामाची पाहणी
• शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त गाळ घेऊन जाण्याचे आवाहन
• जलेश्वर तलावाची शहराच्या वैभवात भर पडणार
हिंगोली (जिमाका), दि. 15 : ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजनेंतर्गत हिंगोली येथील जलेश्वर तलावातील गाळ काढण्याचे काम मागील दोन महिन्यापासून चालू आहे. या गाळ काढण्याच्या कामाची जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज पाहणी करून समाधान व्यक्त केले.
‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ या योजनेतंर्गत हिंगोली शहरालगत असलेल्या जलेश्वर तलावातील गाळ घेऊन जाणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना शासनाकडून कमाल 37 हजार 500 रुपये अनुदान देण्यात येत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी गाळ घेऊन जावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी केले आहे.
यावेळी तहसीलदार नवनाथ वगवाड, मुख्याधिकारी अनंत जवादवार, जलसंधारणचे उपअभियंता प्रफुल्ल खिराडे, नगर अभियंता रत्नाकर अडसिरे, उप अभियंता प्रतीक नाईक, विद्युत अभियंता वसंत पुतळे, प्रशासकीय अधिकारी शाम माळवटकर, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर आदी उपस्थित होते.
गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेतंर्गत हिंगोली शहरालगत असलेल्या जलेश्वर तलावातील गाळ काढण्याचे काम सुरु आहे. या गाळ काढणे कामाला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, शेतकरी टिप्पर, टॅक्टर आदि विविध वाहनांमधून आपापल्या शेतामध्ये गाळ घेऊन जात आहेत. मागच्या शंभर वर्षात या तलावातील गाळ काढलेला नव्हता, त्यामुळे या तलावामध्ये साठलेला गाळ हा अत्यंत सुपिक असा उच्च प्रतीचा असून शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी यावेळी सांगितले.
गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेतून अल्पभूधारक शेतकऱ्यांनी गाळ नेल्यास त्यांना 37 हजार 500 अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी गाळाचे योग्यरित्या मोजमाप झाले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. हिंगोली शहराचे वैभव असलेल्या जलेश्वर तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर झाला आहे. सध्या संरक्षक भिंतीचे काम सुरु झाले असून, या तलावात येणारे घाण पाणी रोखण्यासाठी नाली बांधकामाचे व पाणी वळविण्याचे काम पावसाळ्यापूर्वी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी नगर परिषदेला दिल्या आहेत.
तलावात येणारे अशुध्द पाणी रोखल्यामुळे जलेश्वर मंदिर व तलावाचे पावित्र्य जपले जाणार आहे. या तलावाला चांगले पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार आहे. या तलावात बोटींग, ॲम्पीथिएटर, सेल्फी पॉईंट, ओपन जीम, पार्कींग, फुड प्लाझा आदीची सोय उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यामुळे हिंगोली शहरातील व परिसरातील नागरिकांची पर्यटनाची सोय होणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी सांगितले.
जलेश्वर तलाव सुशोभिकरणाच्या पहिल्या टप्प्यात संरक्षक भिंत, रस्ता व विद्युतीकरणाचे काम सुरु आहे. तर दुसऱ्या टप्यात बोटींग, ॲम्पीथेटर, सेल्फी पॉईंट, ओपन जीम, पार्कींग, फुड प्लाझा, पाणी शुध्दीकरण यंत्र आदी कामे करण्यात येणार आहेत. या कामाची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी घेतली. तसेच तलावात छोटे बेट करुन सुशोभिकरण करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी वरील सर्व कामे करण्यासाठी आवश्यक निधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असल्याची माहिती नगर अभियंता रत्नाकर अडसिरे यांनी दिली. यावेळी जलसंधारण विभागाचे उप अभियंता प्रफुल्ल खिराडे यांनी जलसंधारण विभागाच्या योजनेंतर्गत आतापर्यंत 2 लाख 50 हजार घनमीटर इतका गाळ काढण्यात आला आहे. त्यासाठी रात्रंदिवस 18 पोकलेन व जेसीबी चालू असून जवळपास 100 ट्रॅक्टर व हायवाद्वारे हे काम चालू असून जून अखेर 4 लाख 50 हजार घनमीटर गाळ काढण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.
******
14 May, 2024
जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन
हिंगोली (जिमाका), दि. 14 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, नायब तहसीलदार डी. एस. जोशी, सचिन जोशी, गणेश जिडगे, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक नागेश बोलके, रंजना कोठाळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनीही छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
********
11 May, 2024
जलेश्वर तलाव सुशोभिकरण कामाशी संबंधित वाहनचालक व वाहन मालकांना नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जाहीर आवाहन
हिंगोली(जिमाका), दि.११ : येथील सर्वे न. 03/अ. मधील तलाबकट्टा जलेश्वर तलाव सुशोभिकरणाचे अनुषंगाने तलावाचे रुंदीकरण, खोलीकरण व गाळ काढण्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहनचालक, वाहनमालक व कामाशी संबधित सर्वांना तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, हिंगोली यांनी खालीलप्रमाणे जाहीर आवाहन केले आहेत.
वाहनाची सर्व कागदपत्रे, विमा प्रमाणपत्र, प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्र इत्यादी वैध असावेत. वाहन चालकाकडे चालवत असलेल्या संवर्गातील वाहनाची वैध अनुज्ञप्ती असावी. वाहन सुस्थितीत असावे. वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र वैध असावे. रहदारीतून वाहन चालवताना वाहनाचा वेग नियंत्रित असावा. दारु पिऊन किंवा कुठल्याही अमली पदार्थाच्या नशेत वाहन चालकाने वाहन चालवू नये. धोकादायक पध्दतीने वाहन चालवु नये. वाहन चालवताना मोबाईलचा वापर करु नये. राँग साईडने वाहन चालवू नये. वाहनाचे सर्व लाईटस, हेडलाईट, टेल लाईट, ब्रेक लाईट, सर्व इंडिकेटर्स सुस्थितीत असणे आवश्यक आहे. क्षमतेपेक्षा जास्त भार ओवरलोड मालाची वाहतूक करु नये. अल्पवयनांनी वाहन चालवू नये. सायंकाळी 6 नंतर वाहतूक करु नये, असे आवाहन तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
**********
10 May, 2024
शेतकऱ्यांना दर्जेदार कृषि निविष्ठांचा पुरवठा करण्याचे निर्देश
हिंगोली (जिमाका), दि. 10 : हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2024 मध्ये दर्जेदार, गुणवत्तापूर्ण, आवश्यक त्या प्रमाणात, एमआरपी दराने व वेळीच कृषि निविष्ठांचा पुरवठा करण्याचे निर्देश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी आज येथे दिले. जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित कृषि निविष्ठा उत्पादक कंपन्यांचे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी, घाऊक विक्रेते, वितरकांचा समन्वय साधण्यासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी श्री. कदम बोलत होते.
या बैठकीला उपविभागीय कृषि अधिकारी, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी, सर्व तालुका कृषि अधिकारी, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक, मोहिम अधिकारी आणि सर्व पंचायत समितीचे गुण नियंत्रण निरीक्षक तथा कृषि अधिकारी उपस्थित होते.
कृषि निविष्ठेचा व्यवसाय हा कायद्याने निश्चित करुन दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार करावा. कायदेशीर तरतुदीचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी. कृषि निविष्ठा उत्पादक कंपनीचे कृषि निविष्ठांचे घाऊक विक्रेते, वितरक यांच्याकडे ते व्यवसाय करीत असलेल्या उत्पादक कंपनीचे बियाणे, खते, किटकनाशके इत्यादी कृषि निविष्ठांच्या उत्पादनांच्या उगम प्रमाणपत्रांचा त्यांच्या परवान्यामध्ये कायद्याने समावेश आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्यांची विशिष्ट वाणाची मागणी असलेल्या कापूस बियाणांची विक्री कृषि विभागाच्या निगराणीखाली करण्यात येणार असून शेतकऱ्यांना जादा दराने कापूस बियाणांची विक्री केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, अशा सूचना या बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. कदम यांनी दिल्या.
या व्यतिरिक्त रासायनिक खत उत्पादक कंपन्यांनी हिंगोली जिल्ह्यास मंजूर आराखड्याप्रमाणे रासायनिक खतांचा पुरवठा करावा. रासायनिक खतांचा पुरवठा करतांना जिल्ह्यातील पाचही तालुक्यामध्ये आवश्यकतेनुसार समतोल राखावा. रासायनिक खतांसोबत इतर अनावश्यक उत्पादनांची रासायनिक खते उत्पादक कंपन्यांनी घाऊक विक्रेत्यांना, त्यांनी किरकोळ विक्रेत्यांना आणि किरकोळ विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना खरेदीसाठी सक्ती करु नये, अशा सूचना दिल्या.
किटकनाशके हाताळणी करताना विषबाधा होऊ नये याबाबत क्षेत्रीय स्तरावर शेतकरी मेळावे आयोजित करुन शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावे. किटकनाशके उत्पादक कंपन्यांनी किटकनाशके विक्रेत्यांच्या दुकानात लिफलेट, पाँम्पलेट, पोस्टर, बॅनर, ऑडिओ-व्हिडिओ जाहिराती इत्यादी प्रसार माध्यमांचा वापर करुन जनजागृती करावी. तसेच किटकनाशके उत्पादक कंपन्यांनी शेतकऱ्यांना सेफ्टी किटचे विनामूल्य वाटप करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
किरकोळ विक्रेत्यांना देखील याबाबत प्रशिक्षण देण्यासाठी दि. 13 मे रोजी सकाळी 11 वाजता औंढा नागनाथ येथे, दुपारी 3 वाजता वसमत, दि. 16 मे रोजी सकाळी 11 वाजता कळमनुरी येथे व दि. 17 मे रोजी सकाळी 11 वाजता सेनगाव येथे, दुपारी 3 वाजता हिंगोली येथे तालुकानिहाय बैठकांचे आयोजन करण्याच्या सूचनाही जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी दिल्या आहेत.
******
पोलीस अधिकारी-अंमलदारांच्या गोळीबार सरावासाठी मौजे वगरवाडी येथील क्षेत्र उपलब्ध
हिंगोली (जिमाका), दि. 10 : महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 22 अन्वये व मुंबई पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 33 (1) (ख) व (प) नुसार औंढा नागनाथ तालुक्यातील मौजे वगरवाडी येथील फायरींग रेंज सर्वे नं. 25 व 29 या परिसरात दि. 12 मे ते 31 मे, 2024 या कालावधीत राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 12 हिंगोली यांच्या आस्थापनेवरील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचा सन 2023-24 मधील वार्षिक शीट रिमार्क व नक्षल बंदोबस्त गोळीबाराचा सराव घेण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी परवानगी दिली आहे.
या कालावधीत पुढील अटीवर गोळीबार सरावासाठी मैदान उपलब्ध करुन देण्यात येत आहे. हे ठिकाण धोकादायक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. परिसरात गुरांना न सोडणे व कोणत्याही व्यक्तीने त्या क्षेत्रात प्रवेश करु नये, अशा सूचना पोलीस अधिकारी यांनी दवंडीद्वारे व ध्वनीक्षेपकाद्वारे संबंधित गावी सर्व संबंधितांना द्याव्यात. तसेच तहसीलदार औंढा नागनाथ व पोलीस स्टेशन हट्टा यांनी मौ. वगरवाडी फायरींग बट परिसरात दवंडीद्वारे व ध्वनीक्षेपकाद्वारे या आदेशाची प्रसिध्दी करावी, असे जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
******
राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 10 : राज्यात राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय डेंग्यू दिन 16 मे रोजी साजरा केला जातो. यानिमित्त डेंग्यूविषयी जनतेमध्ये जनजागृती निर्माण होऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी त्यांना सक्रियपणे सहभागी करून घेण्यात येते. विविध उपक्रमांद्वारे नागरिकांपर्यत माहिती पोहचवणे, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. डेंग्यू दिवस जिल्हा अंतर्गत सर्वत्र साजरा करण्यात येतो.
राज्यात हवामानात बदल तसेच जिल्ह्यामध्ये दुष्काळग्रस्त परिस्थतीमुळे पाण्याचा तुटवडा असल्याने लोकांची पाणी साठवण्याची वृत्ती आढळून येते. त्या अनुषंगाने अशा साठवलेल्या पाण्यात एडीस एजिप्टाय डास अंडी घालून डासोत्पती होते. या डासाची उत्पती कमी करणे, नियंत्रणात ठेवणे यासाठी जनतेस आरोग्य शिक्षण देणे आवश्यक आहे. आजाराचे नियंत्रण करण्यासाठी या मोहिमेमध्ये जनतेचा सहभाग आवश्यक आहे. केंद्र शासनाने डेंग्यू या विषयावर India Fights Dengu हे मोबाईल व अँड्रॉईड ॲप्लीकेशन तयार केले आहे. ते प्ले स्टोअरमध्ये जाऊन ते डाऊनलोड करुन घ्यावे. यामध्ये डेंग्यूविषयी सर्व माहिती उपलब्ध आहे.
हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रीय डेंग्यू दिन यशस्वी होण्यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड यांनी आवाहन केले आहे.
जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थेचे अधिकारी, कर्मचारी, आशा वर्कर, ग्रामसेवक, अंगणवाडी ताई, स्थानिक प्रतिष्ठित नागरिक यांचा लोकसहभाग घेऊन गावपातळीवरही राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये पत्रकार परिषद, खाजगी वैद्यकीय व्यवसायिक सभा, जलद ताप रुग्ण सर्वेक्षण, तालुकास्तर सभा, सर्व स्तरावर रॅलीचे आयोजन, ग्रामसभेचे आयोजन, बाजाराच्या ठिकाणी प्रदर्शनाचे आयोजन, हस्त पत्रिका वाटप, आशा बळकटीकरणासाठी कार्यशाळेचे आयोजन, कंटेनर सर्वेक्षण, सर्व स्तरावर स्वच्छता मोहिमेचे आयोजन, दिंडीचे आयोजन, डासोत्पती स्थानात गप्पी मासे सोडण्याचा धडक कार्यक्रम, सर्व स्तरावरील फवारणी कार्यक्रमाचे पर्यवेक्षण, एक दिवस कोरडा दिवस पाळणे याविषयी जनतेमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.
डेंग्यू,चिकुनगुनिया बाबतची लक्षणे : एडीस एजिप्टाय डासाच्या संक्रमणात्मक चाव्यानंतर पाच ते सहा दिवसानंतर डेग्यूंची लागण होते. डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्त्रावात्मक हा ताप अधिक तीव्र स्वरुपाचा असून त्यामुळे मृत्यू ओढावू शकतो. लहान मुलांमध्ये शक्यतो सौम्य स्वरुपाचा ताप येतो. मोठ्या माणसामध्ये अधिक तीव्रपणे तापासोबत डोके, डोळे दुखणे, अंगदुखी, अंगावर लाल रंगाचा चट्टा येऊ शकतो.
उपचार : सर्व शासकीय रुग्णालयात मोफत उपचार होतो.
उपाय योजना : डेंग्यू ताप हा विशिष्ट विषाणूमुळे होतो. डेंग्यूचा प्रसार हा एडीस एजिप्टाय नावाच्या डासामुळे होतो. या डासाची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते. कोणतेही पाणी 8 दिवसापेक्षा जास्त साठवून ठेवल्यास त्यामध्ये डास अंडी घालून अंड्याचे रुपांतर डासात होते. त्यानुषंगाने कोणतेही साठवलेले पाणी 8 दिवसापेक्षा जास्त ठेवू नये, ही खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
डासोत्पती नियंत्रणासाठी गप्पी माशांची उपयुक्तता, परिसर स्वच्छता, व्यक्तीगत सुरक्षेअंतर्गत मच्छरदाण्यांचा वापर, डासांच्या चाव्यापासून रक्षणासाठी विविध उपाय करण्यासाठी कोरडा दिवस पाळून किटकजन्य आजार डेंग्यू, चिकुनगुनिया आजारावर नियंत्रण ठेवण्यास जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड यांनी केले आहे.
*******
जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा बसवेश्वर यांना जयंतीनिमित्त अभिवादन
हिंगोली (जिमाका), दि. 10 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी नायब तहसीलदार डी. एस. जोशी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनीही महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
********
07 May, 2024
अक्षय तृतीयेच्या दिवशी होणारे बालविवाह थांबवावेत - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
हिंगोली (जिमाका), दि.07 : अक्षय तृतीयेच्या दिवशी मोठ्या प्रमाणात विवाह होतात. दि. 10 मे, 2024 रोजी अक्षय तृतीया असल्याने या दिवशी होणारे संभाव्य बालविवाहाच्या घटना रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी खबरदारी घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी होणारे बालविवाह थांबवावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, 2006 संपूर्ण राज्यात लागू करण्यात आलेला आहे. तसेच त्याबाबतचे नियम महाराष्ट्र बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2022 देखील लागू करण्यात आलेला आहे. या नियमानुसार बालविवाह आयोजित करणे अजामीनपात्र गुन्हा आहे. बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 नुसार बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना शहरी भागासाठी तर ग्रामीण भागासाठी ग्रामसेवकांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. तसेच ग्रामीण भागासाठी अंगणवाडी सेविका व शहरी भागासाठी पर्यवेक्षिका यांना सहाय्यक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.
हिंगोली जिल्ह्यात अक्षय तृतीया या दिवशी बालविवाह होऊ शकतात. यास प्रतिबंध म्हणून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतात. त्यानुसार एखाद्या पुरुषाने अल्पवयीन बाल वधुशी विवाह केल्यास त्या पुरुषाला दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद आणि एक लाख रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. जाणीवपूर्वक बालविवाह ठरविणाऱ्यास, त्यासाठीचा सोहळा पार पाडणाऱ्यास किंवा प्रोत्साहन देणाऱ्यास दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद आणि एक लाख रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. बालविवाह झाल्यास संबंधित वर व वधु यांचे आई-वडील किंवा पालक, अन्य नातेवाईक मित्र परिवार, विवाह विधी पार पाडणारे संबंधित व्यक्ती, फोटोग्राफर, प्रिंटींग प्रेस, वाजंत्री, सभागृह व्यवस्थापक, कॅटरिंग अशा बालविवाह घडविण्यास मदत करणाऱ्या सर्वांना दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद आणि एक लाख रुपयापर्यंत दंड होऊ शकतो. तसेच ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका यांनी जन्म दाखल्याची खोटी नोंद केल्यास त्यांच्यावरही कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.
********
06 May, 2024
सीड बँकेतून होणार वृक्ष लागवड - जिल्हाधिकारी
• यावर्षी 73 लाख 41 हजार 200 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट
हिंगोली (जिमाका), दि.06: जिल्ह्यात यावर्षी 73 लाख 41 हजार 200 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून यावर्षी सद्यस्थितीत 13 लाख 60 हजार रोपे उपलब्ध आहेत. त्यामुळे विविध झाडाच्या बियांचे संकलन करुन सीड बँक तयार करावी व या सीड बँकेतून उपलब्ध बियांचा वापर करुन वृक्ष लागवड करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी दिल्या.
जिल्हा नियोजन समिती सभागृहात वृक्ष लागवडीची आढावा बैठक जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक, समाधान घुटुकडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
जिल्ह्यात वृक्ष लागवडीसाठी वन विभाग 5 लाख 79 हजार, सामाजिक वनीकरण विभाग 1 लाख 66 हजार, रेशीम विभाग 6 लाख, नगर पालिका प्रशासन विभागाकडून 15 हजार याप्रमाणे 13 लाख 60 हजार रोपे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. उर्वरित वृक्ष लागवडीसाठी लागणाऱ्या आवश्यक बियांचे संकलन करण्यासाठी शिक्षण विभाग, वन विभाग, जिल्हा परिषद यांच्या अखत्यारीतील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, तलाठी, कृषि सहायक, आशाताई, शिक्षक, विद्यार्थी यांना बियांचे संकलन करण्यासाठी उद्दिष्ट ठरवून द्यावेत. यासाठी स्वयंसेवी संस्थां (एनजीओ)नाही सहभागी करून घ्यावे. वृक्ष लावगवडीसाठी जागानिश्चिती व खड्डे तयार करण्याचे काम वेळेत पूर्ण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिल्या.
यावेळी बैठकीस वन विभाग, सामाजिक वनीकरण, महसूल, कृषि, रेशीम विभागासह संबंधित विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
जलयुक्त शिवार, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, पाणलोट विकास, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेचा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी घेतला आढावा
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जलयुक्त शिवार अभियान 2.0, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, पाणलोट विकास घटक 2.0, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेचा आढावा घेतला. यामध्ये प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना-पाणलोट विकास घटक 2.0 अंतर्गत प्रकल्प अहवालानुसार दिलेल्या प्रशासकीय मान्यतेनुसार कामाची सद्यस्थिती, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना अंतर्गत एमएसआरएलएम अंतर्गत उपजीविका उपक्रम घटकाचा प्रकल्पनिहाय खर्चाचा व शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करणे, माहिती अद्ययावत करणे, जलयुक्त शिवार 2.0 अंतर्गत प्रस्तावित कामाचा, झालेला खर्च याचा आढावा घेण्यात आला. तसेच गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत सन 2023 मधील झालेल्या कामाचा तसेच सन 2024 मध्ये तलावातील गाळ काढण्याबाबतचे नियोजन याबाबतचा सविस्तर आढावा घेतला.
********
ग्रामीण भागाला मुबलक पाणीपुरवठ्यासाठी उपाययोजना करा - जिल्हाधिकारी
• जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडून पाणीटंचाईचा आढावा
हिंगोली (जिमाका), दि. 06 : जिल्ह्यात सद्यस्थितीत दोन गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, जिल्ह्यात इतरत्र कुठेही टँकरने पाणीपुरवठा केला जात नाही. ही समधानाची बाब असली तरीही संबंधित यंत्रणेने नागरिकांना वेळेत आणि नियमित पाणी मिळेल, या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे दिले.
जिल्हा नियोजन समिती सभागृहात पाणीटंचाई आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. पापळकर बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक, समाधान घुटुकडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
जल जीवन मिशन योजनेची कामे पूर्ण केली आहेत. त्यानुसार विहीर अधिग्रहणाची प्रक्रिया राबविण्यात येईल. त्यापूर्वी तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी संयुक्त पाहणी करून घ्यावी. ही पाहणी केल्यानंतर त्यांनी त्याबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करूनच पुढील कार्यवाही करण्यात यावी. ग्रामीण भागाला मुबलक पाणीपुरवठा करताना पाण्याचे नियमित स्त्रोतांची तपासणी करूनच विहीर अधिग्रहणाची प्रक्रिया राबवावी. त्यासाठी गावातील नादुरुस्त हातपंपाची तपासणी, किरकोळ दुरुस्ती असल्यास ती प्राधान्याने करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी दिल्या.
इंधन विहिरींची तपासणी करून त्या ठिकाणावरून गावाला पाणीपुरवठा करता येत असल्यास त्याला प्राथमिकता देण्याबाबतच्या सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्हा परिषद, पंचायत समिती स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करून पाणीटंचाईबाबत नागरिकांच्या तक्रारीची नोंद घेण्यात यावी. पाणीपुरवठा योजनांची अर्धवट कामे तात्काळ पूर्ण करुन घेण्यात यावीत. तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर ही कामे पूर्ण होतील, याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. लोकसभा निवडणुकीची सर्व कामे जवळपास संपली असून, आता नागरिकांसाठी उन्हाळ्यात मुबलक पाणी उपलब्ध करून देण्याकडे विशेष लक्ष देण्याचे जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी सांगितले. भूजल सर्वेक्षणाचे काम भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने तात्काळ करावे. पाणीटंचाईमुळे गावामध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण होत असेल, तर त्यावर उपाययोजना तात्काळ करण्यात यावी. या कामाला सर्व संबंधित यंत्रणेने प्राधान्य देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी पाणी टंचाई २०२२-२३ च्या निवारण कार्यक्रमांतर्गत घेतलेल्या उपाययोजनांचा व खर्चाचा आढावा घेतला. तसेच जिल्हा ग्रामीण पाणी टंचाई कार्यक्रम, विहीर अधिग्रहण टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, नळ योजना विशेष दुरुस्ती, तात्पुरती पूरक नळ योजना, सार्वजनिक विहीर खोल करणे, गाळ काढणे तसेच उन्हाळ्यात नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिल्या.
पाणी टंचाई निवारणार्थ तहसील व पंचायत समितीस्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना
पाणी टंचाईच्या समस्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी पाणी टंचाई निवारणार्थ तहसील व पंचायत समिती स्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. आपल्या गावात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्यास तहसील व पंचायत समिती स्तरावरील नियंत्रण कक्षास संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी केले आहे.
जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, क्रांती डोंबे, तहसीलदार नवनाथ वगवाड, श्रीमती सुरेखा नांदे, गटविकास अधिकारी, सर्व संबंधित विभाग प्रमुख या बैठकीला उपस्थित होते.
******
शेतकऱ्यांना उच्च प्रतिचे बियाणे मिळण्यासाठी विशेष प्रयत्न करा - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
• जिल्हाधिकाऱ्यांचे संबंधित विभागांना निर्देश
• भरारी पथकांमार्फत कृषि निविष्ठा केंद्रांवर लक्ष ठेवणार
हिंगोली (जिमाका), दि. 06 : येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना अधिक नफा मिळवून देणारी पिके घेण्यासाठी प्रवृत्त करावे. यासाठी त्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक असून, त्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडून बियाणे खरेदी करावे. शेतकऱ्यांची बोगस बियाण्यातून फसवणूक होऊ नये, यासाठी भरारी पथकांमार्फत कृषि निविष्ठा केंद्रांवर लक्ष ठेवणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामपूर्व आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, उपजिल्हाधिकारी (सामान्य) समाधान घुटुकडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात हळदीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असून हळद, ऊस व तूर आदी उत्पादनावर प्रक्रिया करणारे लघु उद्योग सुरु करावेत. तसेच जिल्ह्यात सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी जलसंधारणाच्या विविध योजना राबवाव्यात आणि रेशीम, मध संशोधन उद्योगाला चालना देण्यासाठी कृषि, रेशीम विभागाने विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
गेल्या खरीप हंगामात सोयाबीन आणि कापूस पिकाकडे शेतकऱ्यांचा कल अधिक होता. यावर्षी शेतकऱ्यांना नफा मिळवून देणारी पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करावे. यासाठी त्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावेत. शेतकऱ्यांना बोगस बियाणे विक्री होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडून बियाणे खरेदी करावे, बियाणे खरेदीची पावती, पिशवी आदी सांभाळून ठेवण्याचे सांगावे. तसेच विक्रेत्यांची नावे आणि पत्ते जिल्ह्याच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करावेत. कोणत्याही परिस्थितीत बोगस बियाणे विक्री होऊ नये, यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करावी. यासोबतच रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्यात यावा. जिल्ह्यात सोयाबीन आणि कापूस पिकांवर शेतकऱ्यांची अवलंबितता अधिक आहे. या शेतकऱ्यांवर अरिष्ट ओढविल्यास त्यांची परिस्थिती बिकट होते. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदेशीर आणि त्यांची उत्पादकता वाढणारी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी केले.
जिल्ह्यात पावसाचे आगमन उशीरा होणे, पावसाचे निर्गमन लवकर होणे तसेच पावसाचे आगमन व निर्गमन वेळेवर परंतु पिक कालावधीध्ये दीर्घ कालावधीचा खंड पडणे, संततधार व अतिवृष्टी होणे अशा अनिश्चित पावसासाठी पर्यायी आपत्कालीन परिस्थितीत कोणती पिके घ्यावीत व कोणती घेऊ नयेत याचे नियोजन करावे. नैसर्गिक आपत्तीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे अनुदान ईकेवासी नसल्याने प्रलंबित आहेत. त्यामुळे ईकेवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांना सांगण्यात यावे. यासोबतच अपघात विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळण्यासाठी प्रकरणे तातडीने निकाली काढावीत. कृषि निविष्ठा गुणवत्तेचे उद्दिष्ट पूर्ण करावे. शेतकऱ्यांना आधुनिक शेती करताना चांगले वाण आणि कमी पाण्यात चांगली उत्पादकता देणारी, तसेच शेतीमधील नवीन बाबींची माहिती देण्यात यावी. नवीन संशोधनाची माहिती देऊन शेती संरक्षित करणे गरजेचे आहे. शेती सुकररित्या करण्यासाठी यांत्रिकीकरण आणि इतर योजनांचा लाभ देण्यात यावा. एकात्मिक पद्धतीने शेती करण्यासोबतच त्यांचा शेतकरी उत्पादक कंपनीशी समन्वय साधून द्यावा.
पिक विम्यामुळे शेतकऱ्यांना आपदग्रस्तावेळी मदत मिळण्यास मदत होते. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. लवकरच दुसऱ्या टप्याचे काम सुरु होणार आहे. शेतकऱ्यांना मदतीसाठी पिक कर्ज महत्वाचे आहे. यावर्षी सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्ज मिळावे, यासाठी प्रयत्न करावेत. बँकांनी कर्ज प्रक्रिया करण्यासाठी विशेष यंत्रणा तयार करावी. शेतकऱ्यांना मदतीसाठी नवीन वाणांची पिके देण्यात यावी. हळद, ओवा सारखी पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करावे. तसेच फळ पिके, बांबू लागवड आणि वैरण विकासाची कामे करण्यात यावी. तसेच शेतकऱ्यांना ज्या योजनांमधून लाभ मिळणार आहे, अशा योजनांमध्ये त्यांचा सहभाग वाढविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी केले.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम यांनी पर्जन्यमान माहिती, पीकनिहाय क्षेत्र उत्पादन, पिक विविधीकरण, आपत्कालीन पीक नियोजन, नैसर्गिक आपत्तीने बाधित शेतकऱ्यांना मदत वाटपासाठी ईकेवायसी प्रलंबितबाबतची सद्यस्थिती, खरीप हंगामासाठी बियाणे मागणी, पुरवठा व विक्री बाबतचा अहवाल, कृषि निविष्ठा गुणवत्ता नियंत्रण अहवाल, रासायनिक खताच्या संरक्षित साठ्याचे उद्दिष्ट आणि नियोजन, मंजूर आवंटन, सोयाबीन ग्रामबिजोत्पादनाचा इष्टांक, विशिष्ट वाणांची मागणी असलेल्या वाणनिहाय कापूस बियाणांची मागणी, भरारी पथकाची स्थापना, मृद आरोग्य व सुपिकता तपासणी कार्यक्रम, प्रधानमंत्री पिक विमा योजना, फळ पिकविमा, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांचा आढावा, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, आत्मा अंतर्गत केंद्र व राज्य पुरस्कृत योजना, फळबाग लागवड योजना, महावितरण मार्फत शेतकऱ्यांना दिलेल्या वीज जोडणी, पीक कर्ज वाटप, रेशीम शेती नियोजन, मधोत्पादन यासह विविध योजनांची सविस्तर माहिती सादरीकरणारे दिली.
यावेळी कृषि विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या सोयाबीन बियाणे उगवण क्षमता तपासणी व बीज प्रक्रिया मोहिम या विषयावर तयार करण्यात आलेल्या घडीपत्रिकेचे तसेच गोगलगाय प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयावर तयार करण्यात आलेल्या भित्तीपत्रिकेचे विमोचन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
******
02 May, 2024
आहरण व संवितरण अधिका-यांनी ई-कुबेरवरील तपशिल जुळल्याची खात्री करावी - जिल्हा कोषागार अधिकारी माधव झुंजारे
हिंगोली, दि. 02 (जिमाका): केंद्र आणि राज्य शासन व सार्वजनिक बँकाचे जमा व प्रदान व्यवहाराकरीता 'ई-कुबेर' ही सर्वसमावेशक व एकसमान संगणक प्रणाली भारतीय रिझर्व्ह बँकने विकसित केली आहे. ही प्रणाली राज्य शासनाच्या 'ट्रेझरीनेट' संगणकीय प्रणालीसोबत संलग्न करून यापुढे सर्व कोषागार कार्यालयातील प्रदाने (VPDAS व I-PLA वगळता) या प्रणालीमार्फत करण्यात येणार आहेत. प्रदानाचे इतर सर्व पर्याय आर्थिक वर्ष 2024-2025 च्या प्रदानाकरिता दि. 01 एप्रिल 2024 पासून बंद करण्यात येणार आहेत. त्यानुसार या कोषागारातून होणारी सर्व प्रकारची प्रदाने ई-कुबेर प्रणालीद्वारे जमा करण्यात यावीत, अशा सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत.
त्यानुसार सर्व आहरण व संवितरण अधिका-यांनी दि. 01 मेपासून या कोषागारातून होणारी सर्व प्रकारची प्रदाने ((VPDAS व I-PLA वगळता)) ई-कुबेर प्रणालीद्वारे होणार असल्याने वेतन बचत खाते तपशिल व सेवार्थ Database मधील उपलब्ध तपशिल जुळत असल्याची खात्री करून घ्यावी. व तसे प्रमापणपत्र या जिल्हा कोषागार कार्यालयास सादर करावे. तसेच ई-कुबेर Activate करण्यासाठी विहित नमुन्यातील माहितीसुद्धा तात्काळ या कार्यालयास सादर करावी. माहे एप्रिल 2024 च्या वेतन देयकाचे प्रदान ई-कुबेर प्रणालीमार्फत अदा करणे सोईचे होईल. तसेच देयके पारीत झाल्यानंतर 10 दिवसांच्या आत सदरील पारीत देयकास मंजुरी देणे आवश्यक आहे, असेही जिल्हा कोषागार अधिकारी माधव झुंजारे यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.
*****
01 May, 2024
हिंगोली येथे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण
जिल्ह्याची चौफेर प्रगती करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करु या
- पालकमंत्री अब्दुल सत्तार
• महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्या जनतेला शुभेच्छा
हिंगोली (जिमाका), दि. 01 : विकासाकडे झेपावणारा आपला हिंगोली जिल्हा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती करीत आहे. जिल्ह्याची चौफेर प्रगती व्हावी यासाठी जागरुक नागरिक म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करु या, असे प्रतिपादन राज्याचे अल्पसंख्याक विकास, औकाफ व पणन मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.
येथील संत नामदेव कवायत मैदानावर पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, राज्य राखीव पोलीस बलाच्या समादेशक पोर्णिमा गायकवाड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपजिल्हाधिकारी समाधान घुटुकडे, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, गणेश वाघ, यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. अब्दुल सत्तार म्हणाले, महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी योगदान व बलिदान देणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात, महान विभूतींना मी सर्वप्रथम अभिवादन करतो. 1 मे, 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. तेंव्हा पासूनच राज्याने सर्वच क्षेत्रामध्ये विकासाची मोठी भरारी घेऊन विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. त्याचबरोबर राजकीय, सामाजिक, साहित्य-संस्कृती या क्षेत्रातही अभूतपूर्व प्रगती करीत देशाच्या विकासामध्ये नेहमीच सिंहाचा वाटा उचलला आहे. त्यामुळेच आज आपले राज्य देशातील अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जाते. आज आपण आंतरराष्ट्रीय कामगार दिन ही साजरा करीत असून, देशाला प्रगतीपथावर आणण्यामध्ये कामगार बांधवांचा महत्वाचा वाटा आहे.
सध्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारा आपला हिंगोली जिल्हा दिनांक 1 मे, 1999 रोजी निर्माण झाला. आज आपल्या जिल्ह्याच्या स्थापनेचा देखील वर्धापन दिन आहे. विकासाकडे झेपावणारा आपला हिंगोली जिल्हा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती करीत आहे, असे सांगून महाराष्ट्र राज्याचा 64 वा वर्धापन दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त आज येथे जमलेल्या ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, खासदार-आमदार, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी, कामगार बंधू, विद्यार्थी, आणि पत्रकार यांना पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पंडीत अवचार यांनी केले. यावेळी पोलीस, राज्य राखीव दल, होमगार्ड पथक तसेच बँक पथकाने परेडचे शानदार संचालन केले. याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नितीन तडस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मुणगल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कैलास शेळके, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ.राजेंद्र कदम यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
****
महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण
हिंगोली (जिमाका), दि. 01 : जिल्हाधिकारी कार्यालयात आज महाराष्ट्र राज्याच्या 64 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी उपजिल्हाधिकारी समाधान घुटुकडे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी बारी सिध्दीकी, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार नवनाथ वगवाड यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते आदर्श तलाठी पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
****
Subscribe to:
Posts (Atom)