31 May, 2024
हिवताप प्रतिरोध महिन्यात ‘एक दिवस एक कार्यक्रमा’तून जनजागृती
हिवताप प्रतिरोध महिन्यात ‘एक दिवस एक कार्यक्रमा’तून जनजागृती
हिंगोली (जिमाका), दि. 31: राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जून महिना हा हिवताप प्रतिरोध महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे. या महिन्यात हिवताप व ईतर किटकजन्य आजाराविषयी जनतेमध्ये जागृती निर्माण होऊन त्याचा प्रतिरोध उपाययोजनाच्या अंमलबजावणीमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
हिवताप प्रतिरोध महिन्यात एक दिवस एक कार्यक्रमातून ही जनजागृती घडवून आणण्यात येणार असून, त्या दृष्टीने प्रत्येक वर्षी विविध उपक्रमाव्दारे हिवताप प्रतिरोध महिना जून महिण्यात साजरा करण्यात येतो. या जनजागरण मोहिमेमध्ये गाव पातळीवर हिवतापाची लक्षणे, उपचार व हिवताप प्रतिरोधाच्या विविध उपाययोजनांची माहिती योग्य त्या माध्यमाव्दारे पोहचविणे आवश्यक आहे. डासोत्पती प्रतिबंध उपाययोजनांमध्ये सहभाग वाढविणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश असल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
यामध्ये पत्रकार परिषद, खाजगी वैद्यकिय व्यावसायिक सभा, जलद ताप रुग्ण सर्वेक्षण, हस्तपत्रिका वाटप, आशा बळकटीकरणासाठी कार्यशाळेचे आयोजन, कंटेनर सर्वेक्षण, ग्रामीण आरोग्य पोषण आहार समितीची सभा, सर्व स्तरावरून स्वच्छता मोहिमेचे आयोजन, स्वच्छता दिंडीचे आयोजन, डासोत्पत्ती स्थानात गप्पीमासे सोडण्याचा धडक कार्यक्रम, बचत गटाच्या सभा, शिक्षकांसाठी सामाजिक जाणीव, सर्व स्तरावरील फवारणी कार्यक्रमाचे अधिकाऱ्यांनी पर्यवेक्षण करणे व एक दिवस कोरडा पाळणे याविषयी जनजागृती निर्माण करण्यात येणार आहे. तरी हिंगोली जिल्हा अंतर्गत सर्व आरोग्य संस्थेचे अधिकारी व कर्मचारी, आशा वर्कर, ग्रामसेवक, अंगणवाडी ताई, स्थानिक प्रतिष्ठित नागरिकांचा लोकसहभाग वाढवून गावपातळीवरील हिवताप प्रतिरोध महिना साजरा करण्याचे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड यांनी केले आहे.
****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment