27 May, 2024

मासिक पाळी स्वच्छता दिनाचे महत्त्व

आज मासिक पाळी स्वच्छता दिन. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात 'माता' बनविण्याची सुरुवात करणारा हा क्षण. पण याच काळात स्त्रियांनी आपली शारीरिक स्वच्छता घेणे आवश्यक आहे. या स्वच्छतेबाबतची माहिती देणारा हा लेखप्रपंच. माहिती देत आहेत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके जागतिक मासिक पाळी दिन दरवर्षी 28 मे रोजी साजरा केला जातो. महिला व मुलींना मासिक पाळीचे व स्वच्छतेचे महत्त्व सांगून आरोग्य शिक्षण देऊन आजारांपासून प्रतिबंध व आरोग्याचे समर्थन करणे, संवर्धन करणे, जनजागृती करणे हा महत्त्वाचा उद्देश आहे. आपल्याकडे 50 टक्केपेक्षा अधिक मुली व महिलांना मासिक पाळीच्या आरोग्याच्या समस्या भेडसावतात. मासिक पाळी स्वच्छता दिन-2024 यावर्षीचे जागतिक घोष वाक्य: "Together for a Period Friendly World" असे आहे. मासिक पाळी आणि त्यासंदर्भातील स्वच्छता याविषयी जागरूकता निर्माण करणे हा त्यामागचा हेतू आहे. महत्त्वाच्या बाबीवर महिला व मुलींना मासिक पाळीत व्यवस्थापन कसे करावे, याबाबत जागरूकता निर्माण व्हावी यासाठी आरोग्य शिक्षण देणे महत्त्वाचे ठरते.. मासिक पाळी या विषयावर गैरसमज व समाजातील जुन्या परंपरागत रुढी परंपरा यातून अनेक सामाजिक व आरोग्यविषयक प्रश्न दूर करणे महत्त्वाचे ठरते. शालेय शिक्षणापासूनच मुलींना होणारे बदल व त्याचा स्वीकार याविषयी आरोग्य शिक्षण देणे गरजेचे आहे. मासिक पाळीची सुरुवात ही एक नैसर्गिक क्रिया आहे. मुलींमधील भीतीचे व त्यांच्या मनातील संभ्रम दूर करणे आवश्यक आहे. शारीरिक, मानसिक व भावनिक बदलांविषयी मुलींमध्ये जनजागृती व्हावी. मासिक पाळीतील स्वच्छता सॅनिटरी पॅडचा उपयोग व घरगुती वापरण्यात येणाऱ्या कपडी घड्या योग्य निर्जंतुकीकरण व हाताळणे व याबाबत आरोग्य शिक्षण द्यावे. मुलींमध्ये होणारे किरकोळ त्रास आहार, विश्रांती व्यायाम याविषयी माहिती देण्यात यावी. मासिक पाळी स्वच्छता देणे महत्त्वाचे का ? गर्भाशयाच्या कर्करोगाचा आजार व प्रजनन संस्थांचे आजार यापासून प्रतिबंधक महत्त्वाचा ठरतो. मासिक पाळीविषयी आरोग्य शिक्षणातून मुलींमध्ये भावनिक आरोग्यविषयक सशक्तपणा निर्माण होतो. मासिक पाळी या विषयावर मोकळेपणाने आरोग्य शिक्षण व चर्चा झाल्यास मुलींच्या शंकांचे समाधान होते सामाजिक व आर्थिक लाभ प्राप्त होतो. मुलींमध्ये होणारे रक्तक्षयाचा प्रतिबंध गोळ्याचे वाटप करून भविष्याची निरोगी माता व निरोगी पिढी बनविण्यास मदत होते, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी दिली आहे. संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली ********

No comments: