06 May, 2024

ग्रामीण भागाला मुबलक पाणीपुरवठ्यासाठी उपाययोजना करा - जिल्हाधिकारी

• जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडून पाणीटंचाईचा आढावा हिंगोली (जिमाका), दि. 06 : जिल्ह्यात सद्यस्थितीत दोन गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, जिल्ह्यात इतरत्र कुठेही टँकरने पाणीपुरवठा केला जात नाही. ही समधानाची बाब असली तरीही संबंधित यंत्रणेने नागरिकांना वेळेत आणि नियमित पाणी मिळेल, या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे दिले. जिल्हा नियोजन समिती सभागृहात पाणीटंचाई आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. पापळकर बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक, समाधान घुटुकडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. जल जीवन मिशन योजनेची कामे पूर्ण केली आहेत. त्यानुसार विहीर अधिग्रहणाची प्रक्रिया राबविण्यात येईल. त्यापूर्वी तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी संयुक्त पाहणी करून घ्यावी. ही पाहणी केल्यानंतर त्यांनी त्याबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करूनच पुढील कार्यवाही करण्यात यावी. ग्रामीण भागाला मुबलक पाणीपुरवठा करताना पाण्याचे नियमित स्त्रोतांची तपासणी करूनच विहीर अधिग्रहणाची प्रक्रिया राबवावी. त्यासाठी गावातील नादुरुस्त हातपंपाची तपासणी, किरकोळ दुरुस्ती असल्यास ती प्राधान्याने करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी दिल्या. इंधन विहिरींची तपासणी करून त्या ठिकाणावरून गावाला पाणीपुरवठा करता येत असल्यास त्याला प्राथमिकता देण्याबाबतच्या सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्हा परिषद, पंचायत समिती स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करून पाणीटंचाईबाबत नागरिकांच्या तक्रारीची नोंद घेण्यात यावी. पाणीपुरवठा योजनांची अर्धवट कामे तात्काळ पूर्ण करुन घेण्यात यावीत. तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर ही कामे पूर्ण होतील, याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. लोकसभा निवडणुकीची सर्व कामे जवळपास संपली असून, आता नागरिकांसाठी उन्हाळ्यात मुबलक पाणी उपलब्ध करून देण्याकडे विशेष लक्ष देण्याचे जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी सांगितले. भूजल सर्वेक्षणाचे काम भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने तात्काळ करावे. पाणीटंचाईमुळे गावामध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण होत असेल, तर त्यावर उपाययोजना तात्काळ करण्यात यावी. या कामाला सर्व संबंधित यंत्रणेने प्राधान्य देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. यावेळी जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी पाणी टंचाई २०२२-२३ च्या निवारण कार्यक्रमांतर्गत घेतलेल्या उपाययोजनांचा व खर्चाचा आढावा घेतला. तसेच जिल्हा ग्रामीण पाणी टंचाई कार्यक्रम, विहीर अधिग्रहण टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, नळ योजना विशेष दुरुस्ती, तात्पुरती पूरक नळ योजना, सार्वजनिक विहीर खोल करणे, गाळ काढणे तसेच उन्हाळ्यात नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिल्या. पाणी टंचाई निवारणार्थ तहसील व पंचायत समितीस्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना पाणी टंचाईच्या समस्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी पाणी टंचाई निवारणार्थ तहसील व पंचायत समिती स्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. आपल्या गावात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्यास तहसील व पंचायत समिती स्तरावरील नियंत्रण कक्षास संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी केले आहे. जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, क्रांती डोंबे, तहसीलदार नवनाथ वगवाड, श्रीमती सुरेखा नांदे, गटविकास अधिकारी, सर्व संबंधित विभाग प्रमुख या बैठकीला उपस्थित होते. ******

No comments: