24 May, 2024

तोंडापूर येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये कृषी कौशल्य विकास अंतर्गत सेंद्रीय शेतकरी प्रशिक्षणाला सुरुवात

हिंगोली (जिमाका), दि. 24 : तोंडापूर येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये 22 मे ते 20 जून, 2024 या कालावधीत कृषी कौशल्य विकास योजनेअंतर्गत सेंद्रीय शेतकरी प्रशिक्षणाला सुरुवात झाली आहे. या प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. पी. पी. शेळके म्हणाले, या प्रशिक्षणाचा लाभ हिंगोली जिल्ह्यातील 25 प्रशिक्षणार्थींना होणार आहे. या प्रशिक्षण कालावधीत विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन प्रशिक्षणार्थींना भेटणार आहे. मार्गदर्शन करत असताना प्रशिक्षणार्थींनी आपल्या जीवनशैलीमध्ये नवीन उद्योग व सकारात्मक विविध कौशल्य विकासाच्या योजनेचा लाभ प्रशिक्षणार्थीना घ्यावा. प्रशिक्षणाचा प्रसार इतर प्रगतशील शेतकरी व नवयुवकांना जनजागृती करावी, असे सांगून सेंद्रीय शेतीचे विविध टप्पे व मार्गदर्शक तत्वे यावर प्रशिक्षणार्थींना सखोल मार्गदर्शन केले. तसेच यावेळी अजयकुमार सुगावे विषय विशेषज्ञ (पीक संरक्षण), सौ. रोहिणी शिंदे विषय विशेषज्ञ (गृहविज्ञान), डॉ. अतुल मुराई विषय विशेषज्ञ (कृषी विस्तार), एस. पी. खरात विषय विशेषज्ञ( मृदाशास्त्र), डॉ. कैलास गीते कार्यक्रम सहाय्यक (पशु विज्ञान) यांनी आपापल्या विभागाचे सेंद्रीय शेतीबद्दल प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन केले. उदघाटन समारंभाचे आभार प्रदर्शन डॉ.अतुल मुराई यांनी केले. या कार्यक्रमासाठी उपस्थित कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. *******

No comments: