28 May, 2024

जिल्ह्यात कापूस बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध स्थानिक विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करण्याचे कृषि विभागाचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 28 : जिल्ह्यात कापूस बियाण्याचा पुरेसा साठा उपलब्ध असून बियाणे शेतकऱ्यांना छापील किंमतीच्या मर्यादेत (एमआरपी) उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कृषि विभागाने नियोजन केले आहे. शेतकऱ्यांनी कुठल्याही एकाच वानाचा आग्रह धरु नये. त्यामुळे काळा बाजार आणि अनधिकृत साठेबाजीला चालना मिळते. अधिक उत्पादनासाठी बियाणे हा एकमेव घटक जबाबदार नसून शेतीतील वेळेवर करण्यात येणारी लागवड, आंतर मशागत, संतुलित खत वापर, किड नियंत्रण या बाबीचे काटेकोर नियोजन देखील महत्वाचे आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर कापूस बियाण्याचा पुरेसा साठा जिल्ह्यात उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी चिंताग्रस्त होऊन कुठल्याही अनाधिकृत व्यक्तीकडून कपासीचे बियाणे खरेदी करु नये. बियाणे हे अधिकृत परवानाधारक विक्रेत्याकडूनच खरेदी करुन बियाणे खरेदीची पक्की पावती घ्यावी. बियाणे पॉकेट व थोडेसे बियाणे जतन करुन ठेवावे. ग्रामीण भागात कपाशीचे बियाणे विक्री करणारे अनधिकृत व्यक्ती फिरत असल्यास अशा व्यक्तींची तक्रार कृषि विभागाच्या जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीस करावी. अनाधिकृत विक्रेते त्यांच्याकडील कपाशीचे वाणाचे अधिक उत्पादन येते, असे आमिश दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक करण्याची शक्यता असते. शेतकऱ्यांनी त्यांच्या अमिषाला बळी पडू नये. अशा अनाधिकृत विक्रेत्याकडून खरेदी केल्यानंतर पक्की पावती नसल्याने व दुकानदाराचा निश्चित पत्ता नसल्याने नंतर येणाऱ्या उगवण क्षमतेच्या व उत्पादकतेच्या तक्रारीचा पाठपुरावा करणे शक्य होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्याकडूनच बियाणे खरेदी करावेत. कृषि विभागाच्या भरारी पथकाने मौजे येळी ता.जि.हिंगोली येथे भेट दिली असता तेथील काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेजारील राज्यातून वेगवेगळ्या वाणांचे कापूस बियाणे एकत्रित रितसर पावतीद्वारे खरेदी केल्याचे आढळून आले आहे. परंतु सदर वाण हे स्थानिक बाजारपेठेत मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी स्थानिक परवानाधारक विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावे,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केलेआहे. *******

No comments: