20 May, 2024

अति जोखमीच्या भागातील कामगारांची कुष्ठरोग तपासणी

हिंगोली (जिमाका), दि. 20 : यावर्षी हिंगोली जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत कुष्ठरोग मुक्त हिंगोली जिल्हा करण्यासाठी एप्रिल व मे महिन्यामध्ये अति जोखमीच्या भागातील कामगारांची कुष्ठरोग तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये वीटभट्टी, खडी क्रेशर व बांधकामावर जाऊन कुष्ठ रुग्णांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेत जिल्ह्यातील 87 वीटभट्टी मधील 1345 कामगारांची, 13 खडी क्रेशर केंद्रावरील 212 कामगारांची तसेच एका बांधकामावरील 27 कामगारांची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीतील खडी क्रेशर केंद्रावरील तपासणीमध्ये एक कुष्ठरुग्ण आढळून आला असून त्याला बहुविध औषधोपचार सुरू करण्यात आला आहे. या सर्वेक्षणासाठी जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचारी तसेच कुष्ठरोग कार्यालयातील अवैद्यकीय पर्यवेक्षक मंचक पवार, चंद्रकांत पाटील, अवैद्यकीय सहाय्यक जाधव, जटाळे तसेच पीएमडब्ल्यू जयश्री ठाकरे, श्रीमती नाझिया, मुळे, संजय भोकरे, पथरोड, कुष्ठरोग तंत्रज्ञ भालेराव यांनी मेहनत घेतली. कुष्ठरोगाची लक्षणे न खाजणारा व न दुखणारा बधिर चटा, कानाचा पाळा जड होणे, हातापायाला मुंग्या येणे, हातापायाला जखम होणे, हाताची बोटे वाकडी होणे, हातामध्ये कमजोरपणा येणे अशी लक्षणे आढळल्यास नजीकच्या शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये संपर्क साधावा. सर्व शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये कुष्ठरोगाचे सर्व औषधोपचार मोफत देण्यात येत आहेत, असे आवाहन सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ.सुनील देशमुख यांनी केले आहे. ******

No comments: