17 May, 2024
हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा
हिंगोली (जिमाका), दि. 17 : जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात सर्व शासकीय आरोग्य संस्था व जिल्हा हिवताप कार्यालयात राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा करण्यात आला.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या नेतृत्वात या दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जनतेमध्ये डेंग्यू आजाराची जनजागृती निर्माण व्हावी, प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलबजावणीसाठी जनतेचा सक्रिय सहभाग प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीने विविध उपक्रमाद्वारे राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा करण्यात आला. यावेळी साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश जाधव, सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी सी. जी. रणवीर व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती अभियान राबविण्यात आले. तसेच जिल्ह्यात गटाराच्या ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आले. विविध ठिकाणी डास आळी सर्वेक्षण करण्यात आले. तसेच जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड यांनी या वर्षीचे घोषवाक्य 'समुदायांच्या संपर्कात रहा, डेंग्यूला नियंत्रित करा' असे असल्याचे सांगून राष्ट्रीय किटकजन्य आजार व डेंग्यू या आजाराबाबत मार्गदर्शन केले.
जिल्ह्यात सन 2023 मध्ये 308 रक्तजल नमुने घेण्यात आले. त्यापैकी 2 रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे या वर्षात जिल्ह्यातील 104 गावामध्ये धूर फवारणी करण्यात आली. डेंग्यू या आजाराला आळा घालण्यासाठी जिल्ह्यामध्ये विशेष अबेट राऊंड मोहीम घेण्यात आल्या. यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर यांच्यामार्फत गृह भेटी देऊन किटक शास्त्रीय सर्वेक्षण करून डास आळी आढळून आलेल्या कंटेनरमध्ये अबेट टाकण्यात आले. तसेच आरोग्य शिक्षण दिल्यामुळे डासांच्या सायकलला आळा बसण्यास मदत झाली.
यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड यांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळण्यात यावा, असे आवाहन केले.
डेंग्यू आजाराची लक्षणे
एकदम जोराचा ताप चढणे, अंग दुखणे, स्नायू दुखणे, डोक्याचा पुढचा भाग जास्त प्रमाणात दुखणे, डोके दुखणे, डोळ्याच्या मागील भागात वेदना होणे, मळमळ होणे व उलट्या होणे, त्वचेवर व्रण येणे.
डेंग्यूचा प्रसार
डेंग्यूचा विषाणू संक्रमित एडीस डासाने दंश दिल्यास लोकांमध्ये पसरतो.जगात डेंग्यूचा धोका असलेल्या भागात नागरिक जास्त प्रमाणात राहत असल्यामुळे डेंग्यू हे आजाराचे प्रमुख कारण आहे.एडीस इजिप्ती संक्रमित मादी चावल्यास डेंग्यू होतो.
प्रतिबंधात्मक उपाय योजना
घर आणि घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. घराच्या अवती-भवती अथवा टेरेसवर पडलेल्या रिकाम्या कुंड्या, प्लास्टिकच्या वस्तू, टायर यासारख्या वस्तूमध्ये पाणी साचून त्यात डासाची उत्पत्ती निर्माण होते. त्यामुळे अशी ठिकाणी नष्ट करावीत. खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात. शौचालयाच्या वरच्या पाईपास जाळी बसवावी. अंगभर कपडे वापरावी. झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. आठवड्यातून एक दिवस म्हणून कोरडा दिवस पाळावा. पाण्यासाठी वापरण्यात येणारे भांडी संपूर्ण कोरडी करावी. जेणेकरून डासांनी घातलेली अंडी नष्ट होतील.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment