06 May, 2024

सीड बँकेतून होणार वृक्ष लागवड - जिल्हाधिकारी

• यावर्षी 73 लाख 41 हजार 200 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट हिंगोली (जिमाका), दि.06: जिल्ह्यात यावर्षी 73 लाख 41 हजार 200 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून यावर्षी सद्यस्थितीत 13 लाख 60 हजार रोपे उपलब्ध आहेत. त्यामुळे विविध झाडाच्या बियांचे संकलन करुन सीड बँक तयार करावी व या सीड बँकेतून उपलब्ध बियांचा वापर करुन वृक्ष लागवड करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी दिल्या. जिल्हा नियोजन समिती सभागृहात वृक्ष लागवडीची आढावा बैठक जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक, समाधान घुटुकडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. जिल्ह्यात वृक्ष लागवडीसाठी वन विभाग 5 लाख 79 हजार, सामाजिक वनीकरण विभाग 1 लाख 66 हजार, रेशीम विभाग 6 लाख, नगर पालिका प्रशासन विभागाकडून 15 हजार याप्रमाणे 13 लाख 60 हजार रोपे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. उर्वरित वृक्ष लागवडीसाठी लागणाऱ्या आवश्यक बियांचे संकलन करण्यासाठी शिक्षण विभाग, वन विभाग, जिल्हा परिषद यांच्या अखत्यारीतील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, तलाठी, कृषि सहायक, आशाताई, शिक्षक, विद्यार्थी यांना बियांचे संकलन करण्यासाठी उद्दिष्ट ठरवून द्यावेत. यासाठी स्वयंसेवी संस्थां (एनजीओ)नाही सहभागी करून घ्यावे. वृक्ष लावगवडीसाठी जागानिश्चिती व खड्डे तयार करण्याचे काम वेळेत पूर्ण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिल्या. यावेळी बैठकीस वन विभाग, सामाजिक वनीकरण, महसूल, कृषि, रेशीम विभागासह संबंधित विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. जलयुक्त शिवार, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, पाणलोट विकास, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेचा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी घेतला आढावा यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जलयुक्त शिवार अभियान 2.0, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, पाणलोट विकास घटक 2.0, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेचा आढावा घेतला. यामध्ये प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना-पाणलोट विकास घटक 2.0 अंतर्गत प्रकल्प अहवालानुसार दिलेल्या प्रशासकीय मान्यतेनुसार कामाची सद्यस्थिती, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना अंतर्गत एमएसआरएलएम अंतर्गत उपजीविका उपक्रम घटकाचा प्रकल्पनिहाय खर्चाचा व शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करणे, माहिती अद्ययावत करणे, जलयुक्त शिवार 2.0 अंतर्गत प्रस्तावित कामाचा, झालेला खर्च याचा आढावा घेण्यात आला. तसेच गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत सन 2023 मधील झालेल्या कामाचा तसेच सन 2024 मध्ये तलावातील गाळ काढण्याबाबतचे नियोजन याबाबतचा सविस्तर आढावा घेतला. ********

No comments: