28 May, 2024

मतमोजणीसाठी नियुक्त सर्व पथक प्रमुखांनी दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडावी - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

हिंगोली (जिमाका), दि. 28 : सर्व पथक प्रमुखांनी 15-हिंगोली लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी नेमून दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले. हिंगोली लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या अनुषंगाने सर्व पथक प्रमुखांची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, समाधान घुटुकडे यांच्यासह सर्व पथक प्रमुख उपस्थित होते. यावेळी मतमोजणीसाठी नियुक्त पर्यवेक्षक, सहायक, सूक्ष्मनिरीक्षकाचे कार्य, जबाबदारी आणि कर्तव्याबाबत तसेच मतमोजणीसाठी करावयाच्या कामकाजाबाबत उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी सादरीकरणाद्वारे सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी मतमोजणी केंद्रावर कायदा व सुव्यवस्था, मतमोजणीसाठी नियुक्त कर्मचारी, सरमिसळ प्रक्रिया, सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती, मतदान प्रतिनिधींची व्यवस्था, सीसीटीव्ही, व्हिडिओ चित्रीकरण, इटीपीबीएस, टपाली मतमोजणी, संपर्क कक्ष, माध्यम कक्ष, एन्कोअर, संगणक टीम, मतमोजणीची व्यवस्था, विद्युत पुरवठा, स्ट्राँग रुम आणि मतमोजणी केंद्रावरील व्यवस्था, आवश्यक साहित्य पुरवठा, पाणी, स्वच्छता गृह, जेवणाची व्यवस्था, वाहन व्यवस्था यासह विविध विषयाचा आढावा घेऊन सर्व संबंधित पथक प्रमुखांनी आपापली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडावी, अशा सूचना केल्या. यावेळी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी कायदा व सुव्यवस्था याची माहिती दिली. तसेच उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे यांनी पथक प्रमुखनिहाय नेमून दिलेल्या कामाची माहिती दिली. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडून मतमोजणी केंद्रावरील स्ट्राँग रुमची पाहणी सर्व पथक प्रमुखांची आढावा बैठक झाल्यानंतर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मतमोजणी केंद्रावरील स्ट्राँग रुम व आवश्यक त्या सोयीसुविधांची माहिती घेतली. यावेळी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, विविध पथक प्रमुख उपस्थित होते. ******

No comments: